श्रीमन्महागणाधिपतयेनमः! श्रीसरस्वत्येनम:! श्री गुरुभ्यो नमः!
आज गणेश चतुर्थी| भाद्रपद(Bhadrapada) महिन्यात येणारा हा सर्वांसाठीचा अत्यंत महत्त्वाचा आणि फलदायी असा सण. श्री गणेशाच्या उपासनेत गणेश चतुर्थी(Ganesh Chaturthi) हा दिवस विशेष महत्वाचा मानतात. उपनिषदामध्ये श्रीगणेशाच्या पूजा आराधनेस पहिले स्थान आहे. श्री गणेशांना कारण ब्रह्म आणि कार्य ब्रह्म असं सुद्धा उपनिषदात म्हटलेलं आहे. वेदकाळापासून “गणेश स्तवनाला” अत्यंत महत्त्व आहे.
व्यंकटेशस्तोत्राची सुरवात सुद्धा, ॐ नमोजी हेरंबा, सकळादि तू प्रारंभा| आठवूनि तुझी स्वरूप शोभा, वंदन भावे करीतसे|| अशीच झाली आहे.
देवर्षी नारदांनी गणपती स्तोत्राची (Ganapati Stotra)रचना केली आहे. त्यात त्यांनी गणपतीची बारा विविध अवतारांच्या काळात गणपतीच्या अंगी प्रगट झालेल्या विविध गुणांची गुंफण सुंदर पद्धतीनं केली आहे. याला संकटनाशनस्तोत्र असे म्हटले आहे. श्री गणेशायनम:|| नारद उवाच, “प्रणम्यं शिरसा देव गौरीपुत्रं विनायकम । भक्तावासं: स्मरैनित्यंमायु:कामार्थसिद्धये ॥
मराठी मध्ये त्याचा सरलार्थ, “साष्टांग नमन हे माझे, गौरी पुत्राविनायका| भक्तीने स्मरता नित्य, आयु:कामार्थ साधती”|. चौदा विद्या आणि चौसष्ठ कलांचा अधिपती श्री गणराय आपल्या सर्वांचं आराध्य आहे.
गणक ऋषींनी रचलेले गणपती अथर्वशीर्ष, अनेकांना मुखोद्गत आहे. त्याची सुरवातच “ॐ नमस्ते गणपतये ॥ त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि”॥ अशी आहे. शांती पाठ ते फलश्रुती अशा दहा भागात चौदा ऋचांची अर्थपूर्ण रचना केली आहे. यांतील “ॐ गं गणपतये नं:” हा बीज मंत्र सर्वश्रुत आहे.
ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीचा(Dnyaneshwari) प्रारंभ आत्मतत्त्वाला नमस्कार करून केला आहे. ते म्हणतात, “श्री गणेशाय नम:| ॐनमोजी आद्या वेदप्रतिपाद्या| जय जय स्वयंवेद्या| आदिरूपा देवा तूचि गणेशु, सकलार्थ मति प्रकाशु, म्हणे निवृत्तीदासु, अवधारिजो जे ।।. ज्ञानेश्वर(Dnyaneshwar) माऊलींनी गणरायांना “शब्दब्रह्म” म्हणून गौरविले आहे. सर्व शब्द वैभवाचे सार म्हणजे गजानन-गणपती. म्हणूनच आपण गणरायांना बुद्धीची देवता म्हणतो. ज्ञानदेवांच्या काळात गणेश भक्ती ही अधिक प्रमाणात होती.
देवतांमध्ये सद्गुरु दिसतात. संत हे खरे सद्गुरु भक्त असतात. संत एकनाथ महाराजांनी “ॐकार स्वरूपा सद्गुरू समर्था, अनाथांच्या नाथा तुझं नमो” असे म्हटले आहे. या रचनेत एकनाथ महाराज(Eknath Maharaj) सद्गुरूंना
ॐकार रूपात पाहतात. गजानन (Gajanan)हे ओंकाराचे रूप आहे. गजाननाचे नाव हे मंगलदायी आहे. गजाननाचे रूप ओंकाराच्या विविध रूपात दिसते.
गणपती आपले भक्तांना हवे ते देतात. ते देवतांना सुद्धा वंद्य आहेत. त्यांचे चिंतन केले असता सर्व प्रकारच्या चिंता दूर होतात. विघ्ने नष्ट होतात. गणपती हा सुखाचा सागर आहे. सद्गुरूंनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे श्री गजाननाची आराधना केली तर जीवनाचे सार्थक होईल. उपासक कोणीही असो प्रारंभी गणेशालाच वंदन केलं जातं. कार्य कुठलंही असो, शुभारंभ गणेश पूजनानेच केला जातो. लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा सुरुवात “श्री गणेशाय नमः” असं लिहून केली जाते.
समर्थ रामदास(Samarth Ramdas) हे रामभक्त, हनुमान भक्त पण त्याचप्रमाणे ते गणेश भक्तही होते. समर्थांनी गणरायाच्या स्तुती पर विविध रचना केल्या आहेत. त्यात आरती, ओव्या, श्लोक, अभंग यांचा समावेश आहे. समर्थांनी श्री गणेश नृत्याचे वर्णन केलेल आहे. “लंबोदर नाचे सुंदर, मंगलाचरण आरंभीला|.
मनाचे श्लोकांची सुरुवातच, “गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा|” अशी केली आहे. तर दासबोधाच्या आरंभी, ॐ नमोजी गणनायका” असे 30 ओव्यांचे गणेश स्तवन त्यांनी रचिले आहे. सुखकर्ता दुखहर्ता ही आरती समर्थांचीच.
श्री गणेश हे हिंदूंचे दैवत असून कार्यारंभी त्यांचं पूजन केलं जातं. गणपती ही केवळ ज्ञान, बुद्धी, कला, संगीत यांचीच नाही तर शौर्याची देखील देवता आहे. सज्जनांच्या रक्षणासाठी, असुरांच्या नाषासाठी आणि धर्माच्या संस्थापनेसाठी गणरायांनी विविध अशी अवतार किंवा रूप घेतलेली आहेत.
सामान्यतः सर्वच स्तोत्रांची सुरुवात “श्री गणेशायनमः” या वाक्याने होते.
संत नामदेवांनी(Saint Namdev) आपल्या अभंग गाथा सांगताना, “प्रथम नमन करू गणनाथा, उमाशंकराचीया सूता, चरणावरी ठेवूनी माथा, साष्टांगी आता दंडवत” असंच म्हटलं आहे. पुढे एका ओवीत नामदेव महाराज म्हणतात, “गाणे जरी म्हणो, तरी गणेश शारदा| आणिक नाही दुजा, यावाचोनी”. संत नामदेवांनी अध्यात्मिक मार्गात प्रेम आणि भक्तीचे मार्ग सांगितले.
तुकाराम महाराजांनी गणेशाचे केलेले स्तवन आगळेवेगळे आहे. “ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान”| संत तुकाराम महाराज (Tukaram Maharaj)म्हणतात, “प्रथम नमन तुज एकदंता। रंगीं रसाळ वोडवीं कथा। मति सौरस करीं प्रबळता। जेणें फिटे आतां अंधकार”. पुढे जावून महाराज म्हणतात, “नमिला गणपती, माऊली शारदा| आता गुरुराजा दंडवत||”. गुरुचे बळ मिळवायचं असेल, त्यांची कृपा साधून घ्यायची असेल तर, “तो गणराज गणपती, आधी मन घेई हाती| मन इंद्रियांचा राजा, त्याची सर्व भावे पूजा”|| असं त्यांनी म्हटलेलं आहे.
लोककलेत ही श्री गणेशाचे रूप बघायला मिळतं. विघ्न येऊ नयेत म्हणून लोककलावंतांद्वारे, विघ्नहर्त्याची पूजाच बांधली जाते. लोककलेतील गणेशाचे रूप खरोखरीच लोभस आहे.
“हे शिवशंकर गिरीजा तनया, गणनायका प्रभुवरा..” ही श्री अण्णासाहेब देऊलगावकरांची रचना “गण” म्हणून प्रसिद्ध आहे.
“तूच सुखकर्ता, तूच दुःख हर्ता, अवघ्या दीनांच्या नाथा, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवीतो माथा|” श्री नरेंद्र जाधव यांच्या या गीताचे, गायक श्री प्रल्हाद शिंदे. या गीताचे गारुड लोकमानसावर आजही अधिराज्य करत आहे.
प.प.श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींनी सुद्धा गणपतीचे भजन रचिले आहे.
“पार्वतीच्या नंदना गणपती मोरया गजानना| पशुपतिच्या नंदना मूषकवाहना गजानना|
कश्यपमुनिनंदना विघ्नच्छेदना भयहरणा| अदितीसतीनंदना असुरनाशना सुखसदना| भक्तजनाल्हादना गणपति मोरया गजानना||
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या काव्यात म्हणतात, “रे गणराया ! नमितो मी आधी तुला ।।धृ0।।
सर्व अंगि शेंदूर चर्चुनी, बेंबी हिरा माखला ।।१।।“
ॐ नमिला गणपती| माता वंदिली पार्वती| मायामूढ मी अल्पमति|, गणेशगौरव गाईन|| महाराष्ट्रातील कविवर्य ग. दि. माडगूळकर यांनी अष्टविनायक गणेश स्तोत्राची सुरुवातच मुळात, ॐ नमिला गणपती अशी केलेली आहे.
आपल्या महाराष्ट्राच्या कविवर्या शांता शेळके यांची प्रासादिक रचना म्हणजेच, “गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया”||. लतादीदींनी गायिलेल्या या गीताने वातावरण भारावून जातं. संगीत कलेला वरदान देणारी ही गणेश देवता आहे. श्री गणेशाला वंदन केलं की काव्यप्रतिभेला अनेक कंगोरे फुटतात. गणपती म्हणजे पवित्रकांचा स्वामी. गणपती स्तवनाने अध्यात्मिक फायदा होतो.
ब्राम्हदिकांसारखे ज्यांची आराधना करतात, अशा गणपती, मोरया, गजाननाला वंदन करून एवढच मागणं मागुया..” अपराध माझे कोट्यानुकोटी। मोरेश्वरा बा तू घाल पोटी।. मंगलमूर्ती मोरया, सर्वांना सद्बुद्धी द्या।
श्रीकांत भास्कर तिजारे
भंडारा ९४२३३८३९६६