गुरुपौर्णिमा

गुरूब्रम्हा गुरर्विष्णु, गुरू र्देवो महेश्वर:
गुरू साक्षात परब्रम्हः, तस्मै श्री गुरूवे नम:

‘गुरूपौर्णिमा’ (Guru-Purnima)हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला गुरूपौर्णिमा साजरी केली जाते. भारतीय संस्कृतीत गुरूला देवाप्रमाणे मानले जाते. म्हणूनच गुरूपौर्णिमेला गुरूपूजनदेखील केले जाते. भारतात अनेक शाळा, कॉलेज आणि संप्रदायांमध्ये गुरूपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि श्रद्धापूर्वक साजरी केली जाते.

गुरुपौर्णिमा – इतिहास(Guru Purnima – History)

गुरूपौर्णिमेला व्यासपौर्णिमा(Guru Purnima) असंही म्हणतात. कारण महर्षी व्यासांनी वेदांचे ज्ञान जगासमोर उघड केले. व्यासांना भारतीय संस्कृतीमध्ये आद्यगुरू समजले जाते. व्यासांनी महाभारत हा अलौकिक ग्रंथ लिहीला. महाभारतातून व्यासांनी सांगितलेल्या धर्मशास्त्र, नितीशास्त्र, मानसशास्र आणि व्यवहारशास्त्राचे दर्शन घडते. तिथीनुसार हा दिवस महर्षी व्यासांचा जन्मदिवस असल्यामुळे या दिवसाला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच गुरूपौर्णिमेला व्यासपूजन देखील केले जाते.

पूर्वीच्या काळी शिष्य गुरूकडे आश्रमात राहत असत. त्याकाळी शिष्य स्वतःचे घर सोडून गुरूगृही राहत असत. ज्ञानसंपादनासाठी शिष्याला सुखवस्तू जीवनाचा त्याग करावा लागत असे. ज्ञानप्राप्तीनंतर गुरूला गुरूदक्षिणा देण्यासाठी गुरूपौर्णिमा साजरी केली जात असे. आता मात्र गुरूकुल परंपरा कमी झाली आहे. मात्र गुरूकडून ज्ञान घेण्याची प्रथा आजही तशीच आहे. त्याचप्रमाणे जीवनातील चांगल्या अथवा कठीण प्रसंगी आजही आपल्या गुरूकडून मार्गदर्शन घेण्यासाठी आजही शिष्य आपल्या गुरूंची भेट घेतात.

गुरुपौर्णिमा – उद्दिष्ट(Guru Purnima – Objective)

गुरू म्हणजे ‘मार्गदर्शक’ आणि ‘पौर्णिमा’ म्हणजे प्रकाश. गुरू कडून मिळालेल्या ज्ञानाने जीवन प्रकाशमय होते. गुरूबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. प्रत्येकाच्या आयुष्यात कोणीतरी गुरू हा असतोच. सर्वांच्या आयुष्यातील प्रथम गुरू म्हणजे ‘आई’. कारण सर्वात पहिली संगत आपल्याला आईची लाभते.

आई आपल्याला चालायला, बोलायला आणि जगायला शिकवते. जगातील प्राथमिक ज्ञान आपण आपल्या प्रथम गुरू म्हणजेच आईकडून घेतो. एवढंच नाहीतर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आई आपली मार्गदर्शक असते. आई प्रमाणेच वडील आणि पुढे अनेक शिक्षक, मित्र, चांगली पुस्तके आपली गुरू असू शकतात. गुरूची महती थोर असते म्हणूनच लहानपणापासून आपल्याला ‘आचार्य देवो भवः’ ही शिकवण दिली जाते. गुरू अथवा शिक्षक हा देवाप्रमाणे असतो या शिकवणीमुळेच भारतात गुरूपौर्णिमा आजही मनापासून आणि श्रद्धापूर्वक साजरी केली जाते.

गुरुपौर्णिमा – महत्व(Guru Purnima – Significance)

शाळा, कॉलेज, व्यवसायक्षेत्रातील शिष्य या दिवशी आपल्या गुरूंची कृतज्ञता व्यक्त करतात. वर्षभर अथवा आयुष्यभर गुरूनी दिलेल्या ज्ञान आणि मार्गदर्शनामुळे शिष्य जीवनात यशस्वी होत असतात. गुरू हे ईश्वराचे रूप असून प्रत्यक्ष भगवंत गुरू रूपाने आपल्या जीवनाचे सारथ्य करत आहे अशी ज्या शिष्याची भावना असते. त्या शिष्याची जीवनात लवकर प्रगती होते. शिक्षक अथवा गुरूंनी शिकवलेले ज्ञान आत्मसात करून त्याप्रमाणे आचरण करण्याचा ते प्रयत्न करत असतात. आयुष्यात चांगला गुरू मिळणं हे भाग्याचं लक्षण समजलं जातं. कारण ज्याच्या आयुष्यात गुरू असतो त्याला त्याच्या गुरूकडून जीवनात चांगल्या वाईट सर्वच गोष्टींना सामोरं जाण्याचं आत्मबळ मिळत असत.

गुरुपौर्णिमा – गुरूंचे स्वरूप(Guru Purnima – The Nature of the Guru)

आई, वडील आणि शिक्षकांप्रमाणे माणसाला जीवनात आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी आध्यात्मिक गुरूंची देखील गरज असते. खरे गुरू तेच असतात जे शिष्याला त्याचे जीवन आणि संसार सुखाचा करण्यासाठी योग्य आणि अचूक मार्गदर्शन करतात. अशा गुरूंना शिष्य सदगुरूंचा मान देतात. मात्र आजकाल गुरू मार्ग दाखविण्याऐवजी व्यवहार करून शिष्यांची फसवणूक करतानाच जास्त दिसतात. त्याच प्रमाणे स्वतःजवळील अपूऱ्या ज्ञानातून शिष्याचा बुद्धीभेद करणारे गल्लाभरू गुरू गल्लोगल्ली निर्माण झाले आहेत. अशा प्रकारच्या गुरूंची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे खरे गुरू अथवा सदगुरू ओळखणे कठीण झाले आहे. यासाठी शिष्याने गुरूची ओळख पटविण्यासाठी भोळसट भावापेक्षा तर्कशुद्ध बुद्धीचा वापर करावा.

गुरुपौर्णिमा – गुरूचे कार्य

गुरूचे कार्य हे एक महान कार्य आहे. आपल्या शिष्यांच्या भल्याचा विचार करून त्यांना आपल्याजवळील ज्ञान आणि अनुभव निरपेक्षपणे आणि प्रामाणिकपणे देणे हे गुरूचे खरे कार्य असते. ज्ञान देताना गुरूची भावना ही अहंकाराची नसावी. या ज्ञानाने आपल्या शिष्याच्या जीवनाचे कल्याण होणार आहे अशी भावना गुरूकडे असावी. कारण जेव्हा गुरूने दिलेल्या ज्ञानाने शिष्याची प्रगती होते तेव्हा ती प्रगती पाहून जर गुरूला आनंद आणि समाधान झाले तरच तो खरा गुरू जाणावा. शिष्याला जितकी गुरूची गरज असते तितकीच गुरूला देखील शिष्याची गरज असते. जर शिष्यच नसेल तर गुरू आपले ज्ञान कोणाला देणार. म्हणूनच गुरूने देखील आपल्या शिष्याबद्दल कृतज्ञ असावे.

गुरुपौर्णिमा – शिष्याची वागणूक
गुरूकडून मिळालेले ज्ञान नम्रपणे स्विकारतो त्या शिष्याला गुरूकडून मिळालेले ज्ञान जसेच्या तसे मिळते. कारण ज्ञान ग्रहण करताना शिष्याकडे नम्रपणा नसेल तर गुरूकडे शिष्याबद्दल प्रेम आणि आपलेपणा असूनही शिष्याला समजावणे गुरूला कठीण जाते. कारण ज्ञानप्राप्तीमध्ये शिष्याचा अंहकार अडथळा निर्माण करत असतो. यासाठीच शिष्याची गुरूवर मनापासून श्रद्धा असणं गरजेचं आहे. त्याचसोबत गुरूकडून मिळवलेलं ज्ञान आपल्या जीवनात आचरणात आणण्याचा शिष्याने तंतोतंत प्रयत्न करणे देखील गरजेचे आहे. असे केल्यास शिष्याच्या पाठी गुरूच्या ज्ञानाचे बळ आणि साधना निर्माण होते आणि त्याची आयुष्यात प्रगती होत जाते.

गुरुपौर्णिमा – गुरू-शिष्याचे आदर्श उदाहरण

भारतात प्राचीन काळापासून गुरू-शिष्य परंपरा आहे. कृष्ण-अर्जुन, अर्जून- द्रोणाचार्य, एकलव्य- द्रोणाचार्य, चाणक्य- चंद्रगुप्त अशी अनेक उदाहरणे पुराणात सापडतात. असं म्हणतात की, अर्जुन कृष्णाचा इतका मोठा भक्त होता की त्याच्या अंगातील केसांमधून देखील कृष्णाच्या नामाचा जप ऐकू येत असे. कृष्णाच्या मार्गदर्शनानुसार अर्जुनाने आचरण केल्यामुळे महाभारतात पांडवांचा विजय झाला. रामकृष्ण परमहंस – स्वामी विवेकानंद, रामदास स्वामी- शिवाजी महाराज ही उदाहरणे देखील गुरू-शिष्यासाठी प्रसिद्ध आहेत.

त्याच प्रमाणे अलीकडच्या काळातील सचिन तेंडूलकर आणि आचरेकर सर ही गुरू शिष्याची जोडी देखील फार लोकप्रिय आहे. क्रिकेटप्रेमी सचिनला क्रिकेटचा देव मानतात. मात्र सचिनच्या व्यक्तिमत्त्वाला खरे पैलू त्याच्या गुरूंमुळे मिळाले. रमाकांत आचरेकर सरांनी दिलेल्या प्रशिक्षणामुळे सचिन तेंडूलकर हे नाव लोकप्रिय झाले. आजही असे अनेक प्रसिद्ध लोक आहेत ज्यांच्या गुरूंमुळे ते प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचू शकले. कलेच्या क्षेत्रात तर अनेक वर्षांची साधना गुरू आपल्या शिष्यासाठी पणाला लावत असतो. गायन क्षेत्रातही अनेक गायकांच्या गुरूंवरून त्यांच्या गाण्याचे घराणे ठरत असते. व्यवसायात देखील गुरूच्या मार्गदर्शनाप्रमाणे उद्योगधंद्यात प्रगती करणारे अनेक लोक आहेत. थोडक्यात जीवनात गुरूशिवाय तरणोपाय नाही हेच यावरून सिद्ध होते.

 

Social Media