हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस महाराष्ट्रात पुन्हा गतवैभव प्राप्त करेल : रमेश चेन्नीथला.

मुंबई : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष मोठा विजय मिळवून राज्यात पहिल्या क्रमांकाच पक्ष बनला पण विधानसभा निवडणुकीत मात्र यश आले नाही. विरोधकांनी मतांची चोरी करून सरकार बनवले. आता पुन्हा नव्याने पक्ष संघटना मजबूत करण्यावर लक्ष केंद्रीत करा, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्तीत जास्त जागी विजय मिळवा. नाना पटोले यांनी चार वर्षात पक्षासाठी चांगले काम केले. आता हर्षवर्धन सपकाळ(Harsh Vardhan Sapkal) यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात मजबूत बनेल, असा विश्वास प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला.

नवनियुक्त काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा पदग्रहण सोहळा बिर्ला मातोश्री सभागृहात संपन्न झाला. यावेळी काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, ज्येष्ठ नेते काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात,
गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, मुंबई काँग्रेस अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान, राज्यसभा सदस्य चंद्रकांत हंडोरे, ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे, माजी मंत्री अमित देशमुख, यशोमती ठाकूर, अस्लम शेख, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी बी.एम. संदीप, कुणाल चौधरी, बी. व्ही. व्यंकटेश, प्रदेश कार्याध्यक्ष खा. प्रणिती शिंदे, कुणाल पाटील, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, गणेश पाटील, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते.

रडायचे नाही लढायचे, काँग्रेस विचार घराघरात पोहोचवून सत्ता आणू व काँग्रेसचा मुख्यमंत्री बनवू: हर्षवर्धन सपकाळ.

नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या भाषणाची सुरुवात शायरीने केली, ”सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है, असे म्हणत त्यांनी भाषणला सुरुवात केली, ते म्हणाले की, विरोधी पक्ष भाजपा सक्षम नाही म्हणूनच त्यांनी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडले, काँग्रेसमधील नेत्यांना भाजपात प्रवेश दिला. आपल्याला संघटना बांधायची आहे, आपल्याकडे नेतृत्व आहे पण कार्यकर्त्यांची एकएक कडी जोडायची आहे, कार्यकर्ता कार्यकुशल बनवायचा आहे. लढाईतील आयुधे बदलली आहेत, रस्त्यावर उतरून लढावे लागेल. आता रडायचे नाही तर लढायचे दिवस आहेत. आपण पुढील काळात राज्यात काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यावर भर देणार असून काँग्रेसचा विचार घराघरात पोहचवायचा आहे. पुढील निवडणुकीत राज्यात काँग्रेसची सत्ता आणून काँग्रेसचा मुख्यमंत्री बनवायचा आहे, असा निर्धार हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला.

विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले की, २०१४ साली मोदी लाटेत काँग्रेसने विधानसभेला ४२ जागी विजय मिळवला तर २०१९ साली अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही ४४ जागी विजयी झालो, २०२४ च्या लोकसभेत मोठा विजय मिळवला पण विधानसभेत मात्र काँग्रेसला अपयश आले. आता पुन्हा जोमाने काम करावे लागणार आहे. संख्याबळ महत्वाचे नाही तर लढण्याची इच्छाशक्ती लागते आणि काँग्रेस पक्ष कधीच संपणारा नाही. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराने जोमाने काम करून काँग्रेस पक्षाला पुनर्वैभव आणू, असे वडेट्टीवार म्हणाले.

ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, हर्षवर्धन सपकाळ यांच्या रुपाने एका नव्या पर्वाला सुरुवात होत आहे. लोकसभेतील पराभवाची कारणमिमांसा करू व पक्ष पुन्हा उभा करण्याचे काम करू. हर्षवर्धन सपकाळ हे कार्यकर्त्यांसाठी सदैव उपलब्ध असतात. काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर अनेक जबाबदा-या दिल्या त्याला त्यांनी योग्य न्याय दिला आहे. गुजरातमध्ये त्यांनी पक्षासाठी जोमाने काम करून मोठे यश मिळवून दिले. मध्य प्रदेशातही त्यांनी पक्षाला यश मिळवून दिले आहे. सर्वोदयी तत्वज्ञान, गांधी विचाराने ते काम करतात. संविधानाच्या प्रास्ताविकेचे जे तत्वज्ञान आहे तोच काँग्रेसचा विचार आहे. राज्यातील गावागावात शिबीरे घेऊन विचाराचे वादळ उठवू आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली नव्याने काँग्रेस संघटन उभे करू.

लोकांची कामे करा, महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष पुन्हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उभा राहिल: नाना पटोले.

यावेळी बोलताना नाना पटोले(nana-patole) म्हणाले की, चार वर्षात संघटनेला बळ देण्याचे काम केले, पोटनिवडणुकांसह अनेक निवडणुका जिंकल्या. विधानसभेला काँग्रेसला ८०-८५ जागी विजय मिळेल असे चित्र होते पण भाजपाने मतांची चोरी करून सत्ता आणली. काँग्रेसने ईव्हीएमवर आक्षेप घेतला नाही पण मतदान वाढले कसे याचे उत्तर निवडणूक आयोग देऊ शकले नाही. आपल्या पूर्वजांनी स्वातंत्र्याची लढाई लढली आता आपल्याला पुढची लढाई लढाईची आहे. अफवांना बळी फडू नका, लोकांची कामे करा, महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष पुन्हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उभा राहिल असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.

यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशिलकुमार शिंदे, माजी मंत्री अमित देशमुख, वसंत पुरके, नसीम खान, वर्षा गायकवाड यांनी भाषणे केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांनी केले.

त्याआधी हर्षवर्धन सपकाळ यांनी सकाळी गेट वे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले, त्यानंतर हुतात्मा स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले. मणिभवनला भेट दिली व त्यांनतर दादर येथील चैत्यभूमीला भेट देऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले तसेच सिद्धीविनायक मंदीराला भेट देऊन गणपतीचे दर्शन घेतले. दुपारी त्यांनी काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे मावळते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली.

हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नवनियुक्त काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा पदग्रहण सोहळा थाटात संपन्न.

Social Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *