मुंबई : भारतीय जनता पक्ष युतीचे सरकार भ्रष्ट मंत्र्यांची टोळी बनली आहे. शेतकऱ्यांच्या नावावर माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी भ्रष्टाचार करताना सर्व मर्यादा सोडल्याचे उघड झाले आहे. आता माणिकराव कोकाटे यांना बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. या दोघांना मंत्रीमंडळातून बरखास्त करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ(Harsh Vardhan Sapkal) यांनी केली आहे.
संदर्भात प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ(Harsh Vardhan Sapkal) म्हणाले की, धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांनी कृषी मंत्री असताना केलेल्या घोटाळ्याचा दररोज पर्दाफाश होत आहे. मुंडे यांच्या भ्रष्ट कारभाराने महाराष्टाच्या नावाला कलंक लागला आहे. आता माणिकराव कोकाटे(Manikrao Kokate) यांना बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी २ वर्षांची शिक्षा आणि ५० हजारांच्या दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्या प्रकरणी माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली आहे. यातून काही बोध घेऊन तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी कोकाटेंना बरखास्त करायला हवे. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने केली जात आहे परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) व उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्यात धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची धमक नाही.
भारतीय जनता पक्ष युतीचे सरकार भ्रष्टाचार करुन जनतेच्या पैशाची लुट करत आहे. एकीकडे राज्यातील शेतकरी शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून आत्महत्या करत असताना राज्यातील मंत्री मात्र कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करत आहेत, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला शोभणारे नाही. मुंडे व कोकोटे हे दोन्ही मंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत पण उपमुख्यमंत्री अजित पवार या भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालत असल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता तरी हिम्मत दाखवून भ्रष्ट मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवावा. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना एका बोगस प्रकरणात दोन वर्षाची शिक्षा झाली होती तेव्हा वायुवेगाने चोवीस तासांच्या आत त्यांची खासदारकी रद्द केली व घर काढून घेतले होते त्याच वेगाने कोकाटे यांच्यावर कारवाई कधी होणार असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.