नूडल्स(noodles) म्हणजे अनेकांच्या अतिशय आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय. अगदी २ मिनीटांत होणारे आणि पोटभरीचे असे हे नूडल्स(noodles) काही जण नियमित खातात. मोठमोठ्या कंपन्याही त्याची आकर्षक पद्धतीने जाहिरात करतात आणि आपले उत्पादन खरेदी करण्यास ग्राहकांना भरीस पाडतात. मॅगीसारखे नूडल्स(noodles) तर अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच जण आवडीने खातात. यामध्ये चीज, भाज्या, बटर असे घालून याची चव आणखी वाढवली जाते. तर चायनिज पदार्थ(Chinese Foods) आवडणारेही आपल्या आजुबाजूला असंख्य जण असतात आणि हे लोक आवडीने शेजवान नूडल्स किंवा तत्सम वेगवेगळ्या फ्लेवरचे नूडल्स खातात. मात्र हे नूडल्स एकतर मैद्यापासून तयार झालेले असतात आणि त्यामध्ये इतरही हानिकारक घटक असल्याने ते आरोग्यासाठी म्हणावे तितके फायदेशीर नसतात. त्यामुळे नूडल्स खाणे टाळलेले केव्हाही चांगले.
पाहूयात नूडल्स खाणे का धोक्याचे असते याविषयी (How Bad are Instant Noodles to Your Health)…..
१. सोडीयमचे जास्त प्रमाण…
नूडल्समध्ये(noodles) सोडीयमचे प्रमाण जास्त असते. यामुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. रक्तदाब वाढला की त्याचा हृदय आणि इतर अवयवांवर परीणाम होतो आणि परीणामी शरीराचे कार्य बिघडते.
२. प्रिझर्व्हेटीव्हचे प्रमाण जास्त…
फळं, भाज्या, दूध, डाळी, धान्य यांसारख्या नैसर्गिक पदार्थांचा आहारात समावेश असायला हवा असे वारंवार सांगण्यात येते. पॅकेट फूड म्हणजेच प्रिझर्वेटीव्ह(Preservatives) असणारे पदार्थ शक्य तितके टाळायला हवेत असे सांगितले जात असताना आपण आहारात जास्तीत जास्त पॅकेट फूडचा समावेश करतो. मॅगी किंवा नूडल्स दिर्घ काळ टिकावेत यासाठी त्यामध्येही प्रिझर्वेटीव्ह जास्त प्रमाणात घालण्यात येतात. ते आरोग्यासाठी चांगले नसल्याने शक्यतो टाळायला हवेत.
३. अनावश्यक फॅटचे प्रमाण जास्त…
आपल्याला अन्नातून चांगले फॅटस आणि वाईट फॅटस असे २ प्रकारेच फॅटस मिळतात. नूडल्समध्ये वाईट प्रकारच्या फॅटसचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी वाढण्याची शक्यता असते. कोलेस्टेरॉल(cholesterol) वाढले तर हृदयरोगाचा त्रास होऊ शकतो.
४. मेटाबॉलिक समस्या…
नूडल्समुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे, वजन वाढणे, रक्तदाब वाढणे अशा समस्या उद्भवतात. या समस्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याने शक्यतो आहारात नूडल्ससारखे पदार्थ टाळलेले केव्हाही चांगले.
५. पोषक घटकांची कमतरता…
नूडल्समध्ये शरीराला आवश्यक असणारे विशेष कोणतेच घटक नसतात. यामध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते, मात्र यात प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन्स, खनिजे यांचे प्रमाण खूपच कमी असते. त्यामुळे हे खाऊन शरीराला काहीच फायदा होत नसल्याने आहारात या घटकांचा समावेश टाळलेला चांगला.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)