मुंबई, दि. 29 जुलै : देशभरात सर्वाधिक कोरोनाचा कहर पाहणा-या मुंबईकरांच्या प्रतिकारशक्तीबाबत आता एक दिलासादायक बाब समोर येत आहे. सेरो सर्वेक्षणातून समोर आलेल्या माहितीनुसार मुंबईकरांची सामूहिक रोगप्रतिकारक शक्ती हर्ड इम्युनिटी वाढल्याने त्यांना कोरोनाचा धोका कमी झाला आहे. याला ‘हर्ड इम्युनिटी’ म्हटले जाते. सर्वाधिक रुग्णसंख्या वाढीचा वेग असणाऱ्या मुंबईत परिस्थिती नियंत्रणात येताना दिसत आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या ‘सेरो सर्वेक्षणा’तून अनेक तथ्य समोर येत आहेत.
मुंबई महापालिकेच्या उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या सर्वेक्षणात झोपडपट्टी भागात राहणाऱ्या साधारण ५७ टक्के नागरिकांना कोरोनाची लागण होऊन गेल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामध्ये वडाळा, मानखुर्द, दहिसर, बोरिवली या भागातील नागरिकांचा सर्वाधिक समावेश आहे. या व्यतिरिक्त बिगर झोपडपट्टी भागातील सरासरी सुमारे १६ टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज (प्रतिजैविके) तयार झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुंबईकरांसाठी अतिशय चांगली बातमी आहे. मुंबईच्या झोपडपट्टी भागामधील ५७ टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्यामुळे त्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता फार कमी असल्याचे ते म्हणाले. परिणामी या नागरिकांना कोरोनापासून मुक्ती मिळाली असली तरीही त्यांनी अधिक काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. ज्यामध्ये दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर राखणे, मास्क लावणे, स्वच्छता राखणे या प्राथमिक गोष्टींवर काकाणी यांनी भर दिला.
सुरुवातीपासूनच्या संशोधनाचा संदर्भ देत आयुक्तांनी महिलांमध्ये कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण कमी असल्याची बाब अधोरेखित केली. महिलांची रोगप्रतिकारक शक्ती तुलनेने चांगली असल्याचे त्यांनी सांगितले.