संवेदना! एक अत्यंत भाव गर्भित असा शब्द. मनातील भावना म्हणजे संवेदना.
नुकताच ग्रामायण प्रतिष्ठान नागपूर या समाजसेवी संस्थेने भटक्या व विमुक्त समाजाच्या विकासासाठी काम करणाऱ्या संस्थांना आवश्यक साहित्य वितरित करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजीत केला होता. नाव होतं, संवेदना – एक हात मदतीचा…
वर्षानुवर्ष गावाबाहेर लांबवर दोन चार झाडांच्या आडोशाने माळराणावर असलेली ही भटक्यांची वस्ती. छोट्या छोट्या पालामध्ये मांडलेले मोडकेतोडके संसार. हे विश्वची माझे घर या ध्येयाने भटकंती करणार्याो या समाज बांधवांना ना सांगायला गाव, ना माथ्यावर छप्पर. अनिकेत, अकिंचन, असहाय्य असा हा समाज. स्वातंत्र्ययोद्धा आणि संस्कृती रक्षक असा ज्यांचा पूर्वेतिहास असला तरी, पोटाला कोरभर तुकडा मिळविण्यासाठी दगड फोडणारे, नाचणारे गाणारे, कसरत करणारे, अर्धनग्न अवस्थेत असणारे पुरुष आणि त्यांच्या पायाला घोटणारी, खांद्यावरच्या झोळीत लटकणारी कुपोषित बालकं.
आज स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आपण साजरा करतोय. परंतु आजही या समाज बांधवांना ना रहायला घर, ना नागरी सुविधांचा लाभ.
नेहमीच उपेक्षित अशा या समाजाला मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक होते. गेली अनेक वर्ष समाजापासून दुरावलेल्या, कधी काळी चोर लुटेरे म्हणून हिणवल्या गेलेल्या, दुखावल्या गेलेल्या, आपल्याच समाज बांधवांना सन्मानाचे जगणे मिळवून देण्यासाठी भटके-विमुक्त विकास परिषदेची पायाभरणी १९९१ साली झाली. या परम पवित्र भारत मातेला जर वैभवाच्या शिखरापर्यंत न्यायचं असेल तर भटक्या विमुक्तांसह अवघा हिंदू समाज संघटीत झाला पाहिजे. या समाजातला प्रत्येक घटक बलशाली झाला पाहिजे.
भटके-विमुक्त विकास परिषद परिषदेच्या स्वयंसेवकानी स्वत:ला या कार्यात झोकून दिले आहे. भटके विमुक्त बांधवांची आणि त्यांच्या विकासाची कास धरलेल्या स्वयंसेवकांनी संपर्क, भेटीगाठी, रक्षाबंधन, भाऊबीज, अशा लहान-लहान कार्यक्रमांमधून भटक्यांच्या पालावर राबता वाढविला, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, त्यांना मदतीचा हात दिला आहे.
हे कार्य करत असताना प्रत्येक वेळी स्वयंसेवकांच्या मनात हाच भाव आहे की, पाल टाकून उघड्यावर राहणारी “ही माणसं” माझी आहेत, आमच्या कुटुंबाचा एक घटक आहेत. हा भाव समोर ठेवून आज कार्य प्रगतिपथावर आहे.
“सब समाज को लिये साथ मे, आगे है बढते जाना”, हे “सिद्ध” करण्यासाठी “बंधुभाव हाच धर्म” हे ब्रीद घेऊन वाटचाल करणारी विदर्भातील, “भटके विमुक्त कल्याणकारी संस्था”. विदर्भात वीस भटक्या जाती जमातीचे समाज बांधव वेगवेगळ्या ठिकाणी गावकुसाबाहेर आपापली पालं टाकून वास्तव्याला आहेत. पारंपारिक व्यवसाय आता लोप पावत आहे. जात प्रमाणपत्र हा मोठ्ठा अडसर आजही “आ” वासून आहे. या समाज बांधवांचे जगणे माणसासारखे कसे होईल यासाठी स्वयंसेवक/कर्ते प्रयत्न करताहेत. अडचणींच निराकरण हळूहळू होत आहे.
शिक्षण हे अत्यावश्यक आहे. हा समाज शिकला तरच पुढे जाऊ शकतो. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. अगदी हाच धागा धरून २०१७ पासून भटके विमुक्त कल्याणकारी परिषदेतर्फे “पालावरची शाळा” हा समाजाभिमुख उपक्रम एक पथदर्शी प्रकल्प म्हणून विदर्भात राबविला जातो.
पालावरची शाळा प्रकल्प म्हणजे समाज विकासाच्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल आहे. भविष्यात ही पालावरची शाळा एक शक्ती केंद्र व्हावे, ही त्यामागची संकल्पना. भंडारा, गोंदिया, नागपूर जिल्ह्यात आज १४ पालावरच्या शाळां मधून भटक्या समाजातील बालकांना, त्यांच्याच वस्तीत जावून दगडाचा फळा करून शिक्षित आणि संस्कारित करण्याचा यशस्वी प्रयत्न केला जातो. शाळेत जाणारी, न जाणारी मुलं, अशांना एकत्र करून त्यांना संस्कारित करण्याचा प्रयत्न. पालावरच्या शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांना “आचार्य” असं संबोधलं जातं. शाळेमध्ये संस्कारयुक्त गोष्टी शिकवणे, खेळ, आरोग्य शिक्षण, पर्यावरणाचे ज्ञान, त्यांच्या शाळेमध्ये घेतलेला अभ्यास इत्यादी बाबी लक्षात घेतल्या जातात. शाळेला पक्की इमारत नाही. ती भरते खुल्या आसमंतात, झाडाखाली, कधी रस्त्याशेजारी, तर पावसाळ्यात कुणाच्यातरी झोपड्यात. स्थानिक व्यक्तींना नेतृत्व देऊन त्यांच्या माध्यमातून समाज बांधवांची मोट बांधणे आणि त्यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणे ही भटके-विमुक्त कल्याणकारी संस्थेची भूमिका. शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पूर्ण काळजी घेतली जाते. त्यांच्या शारीरिक स्वच्छतेवर भर दिला जातो. प्रत्येक शाळेत एक संस्कार पेटी असते. या पालावरच्या शाळेमधून विविध उपक्रम राबविले जातात. पारंपारिक नृत्य, गाणी, कथा, तसेच मुलांच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना कसं विकसित करता येईल यावर भर दिला जातो. राष्ट्रीय कार्यक्रम म्हणजे १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, थोर पुरुषांच्या जयंती, विविध उत्सव, सहल यासारखे कार्यक्रम पालावरच्या शाळेत राबवले जातात.
ग्रामायन प्रतिष्ठान नागपूरच्या वतीने “प्रकल्प दर्शन “हा उपक्रम राबविला जातो.
“सेवा हे यज्ञकुंड, समिधा सम हम जले”. कुठल्याही फळाची आशा न बाळगता जेव्हा एखादी व्यक्ती किंवा संस्था निस्पृहपणे आपल्या कार्यात मग्न असते आणि त्यात समर्पण देत असते, त्यावेळी आपसूकच साऱ्यांच्या नजरा आकर्षित होतात आणि अशातूनच ओळख होते ती त्यांच्या सेवाकार्याची.
दिनांक २६ जून २०२२ ला भंडारा जिल्हा प्रकल्प दर्शन आयोजीत केले होते. विविध प्रकल्पांसोबतच, भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे बेलदार वस्तीवर असलेला “पालावरची शाळा” हा प्रकल्प बघण्याची संधी, ३३ प्रकल्प दर्शीना मिळाली. प्रकल्प भेटीतून संवेदनविश्व जागृत होतं, ही मानवी जीवनातील महत्वपूर्ण बाब आहे.
पालावरच्या शाळेतील वातावरण, विद्यार्थ्यांचा उत्साह, विद्यार्थी-पालकांची तळमळ हे सर्वांनी प्रत्यक्ष अनुभवलं. या समाज बांधवांचा संक्षिप्त इतिहास त्यांना कळला. आणि निश्चय झाला तो “आपण यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे”.
विचारांना, कृतीची जोड मिळाली. ग्रामायण प्रतिष्ठातर्फे यासाठी सोशल मीडियावरून नागरिकांना आवाहन करण्यात आले. त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला.
विदर्भात भटक्या समाज बांधवांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांची माहिती घेतली गेली. त्यातून चार संस्थाना मदत करण्याचे ठरले. त्यांना आवश्यक असलेल्या साहित्यांची/ वस्तूंची माहिती मागविण्यात आली. जमलेल्या रकमेतून साहित्य खरेदी झाली. आणि ७ ऑगष्ट २०२२ ला नागपूर येथील दीक्षाभूमी जवळच्या अंध विद्यालयाच्या “नवदृष्टी” सभागृहात एका देखण्या समारंभात, हे साहित्य समाजातील गणमान्य उद्योजक बंधू प्रशांत आणि श्रीकांत धोंडरीकर, सेंट्रल इंडिया पब्लिक स्कूलचे संचालक प्रवीण तिवारी, पारधी समाजातील कार्यकर्ते सुभाष भोसले, यांचे हस्ते वितरीत करण्यात आले.
भंडारा येथील भटके – विमुक्त कल्याणकारी संस्था, अमरावती येथील प्रज्ञा प्रबोधिनी आणि दीनदयाल सेवा प्रतिष्ठान यवतमाळच्या विवेकानंद छात्रावास व नागपूर येथील सोनुताई अग्निहोत्री मुक बधीर विद्यालय या संस्थांना समाजातील व्यक्तींकडूनं मिळालेल्या सज्ञयोगातून विद्यार्थ्यांसाठी सायकली, साउंड सिस्टीम, इन्व्हर्टर, व्हाईट बोर्ड, नोटीस बोर्ड आदि साहित्य देण्यात आले. जमलेल्या रकमेतून दीड लाख रुपयांच्या वस्तू आणि दोन संस्थांना पन्नास हजार रुपयाचे चेक नअशी मदत यावेळी करण्यात आली.
नाथजोगी समाजातील पदवीधर युवक कार्तिक वडस्कर, ज्याने पालावरच्या शाळेत आपल्याच समाज बांधवांना शिकविलं आणि शिक्षणाचं महत्व पटवून दिलं तो आपलं मनोगत व्यक्त करताना म्हणाला की, आमचा समाज आजही विकासात खूप मागे आहे. आरोग्य आणि शिक्षणाच्या सोईंपासून खूप दूर आहे. समाजातील मागास रूढी-परंपरा यात गुरफटला आहे. मला योग्य मार्गदर्शन मिळाले म्हणून मी सुधारलो. समाजाची अशीच मदत मिळाली तर आमच्या समाजातील इतरही लोक सुधारतील, त्यांच्यातही क्षमता आहे. यासाठी विकसित समाजाने आम्हाला आपले समजून मदतीचा हात पुढे करण्याची गरज आहे. समाजाने आमच्याबद्दलचे गैरसमज मनातून काढून टाकावेत, आम्हालाही विकासाची संधी द्यावी. कार्तिकचं मनोगत हे या समाजबांधवांचं प्रातीनिधिक स्वरुप आहे. आजही या समाज बांधवांना समजून घेवून, त्यांना सन्मानाचे जीवन जगण्यास मदत करणे गरजेचे आहे. आपले राष्ट्र उन्नत करण्यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक आहे.
भंडारा जिल्ह्यातील देवखमारी येथे, वस्तीवरील बांधवांनी पाल टाकून सुंदर “पालावरची शाळा” उभारली. त्याचे लोकार्पण दिनांक ११ ऑगस्ट २०२२ रोजी भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री संदीपजी कदम यांचे हस्ते झाले. ग्रामायणने दिलेले साहित्य शाळेच्या आचार्यांना सुपूर्द करण्यात आले.
संवेदनशील मनांची संवेदना ही सकारात्मकतेला धरून असते. विधायक कार्याला पूरक अशी असते.
ग्रामायण प्रतिष्ठान, “संवेदना-एक हात मदतीचा..” या उपक्रमाच्या माध्यमातून, भटके-विमुक्त समाजाबांधवांना दिलेल्या मदतीसाठी आभार व्यक्त करताना, एकेकाळी “स्वातंत्र्य योध्ये”, संस्कृती रक्षक” परंतु अजूनही मुलभूत सुविधांपासून दूर असलेल्याना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या दैवी, शुद्ध व सामाजिक कार्यात तन, मन, धनाने आपणही सहभागी होऊ या.
कारण “न हिंदू पतितो भव”.
जय हिंद!
श्रीकांत भास्कर तिजारे
भंडारा ९४२३३८३९६६
दिनांक : १२ ऑगस्ट २०२२