घर एक मंदिर आहे…

प्रारंभी विनती करू गणपती विद्यादयासागरा | अज्ञानत्व हरोनी बुद्धी मति दे आराध्य मोरेश्वरा||
चिंता क्लेश दरिद्र दु:ख अवघे देशांतरा पाठवी| हेरंभा गणनायका गजमुखा भक्तां बहु तोषवी||
असं म्हणतात, सुखाचे क्षण उन्हात पडणाऱ्या गारांप्रमाणे असतात. क्षणात वेचले गेले नाही तर ते विरून जातात.
चार दिवसांपूर्वी एक लहानसाच पण सुखद प्रसंग घडला. आणि ते आनंदाचे क्षण सर्वांसोबत अनुभवावे असे वाटले. म्हणून हा लेखन प्रपंच.
मी एका इलेक्ट्रिक दुकानात display Unit संबंधी चौकशी करीत होतो. मंदिरामध्ये गर्भगृहाच्या द्वारावर असलेली स्तोत्र किंवा नावांची इलेक्ट्रिक पट्टी. चौकशी झाली. दुकानदाराने, काय लिहायचं हे विचारलं. मी दोन तीन नाव सांगितली. दुकानदाराने औत्सुक्याने विचारले, “कौनसे मंदिरमे देणा है?”. मी म्हणालो, “कुठल्याच मंदिरात नाही. घरच्यासाठी हवे”. मी, मला हवी असलेले “गजर” लिहून दिलेत. थोड्यावेळाने पुन्हा त्याचा प्रश्न, ”आपके घर मे मंदिर है क्या जी?”. मी सहज म्हणालो. “हमारे घर मे तो मंदिर नही है| लेकीन हमारा घर ही एक मंदिर है?”. दुकानदार खूपच गोड हसला. मलाही हसू आलं. Display Board चं पक्क केलं, आणि घरी आलो.
दुकानात सहज निघालेले शब्द खरेच “आपसुकच” निघाले असतील का? मन भूतकाळात गेलं.
तसं आमचं बालपण खेड्यात भाड्याच्या घरात गेलेलं. पुढे शिक्षणासाठी भंडारा शहरात राहण्याचा योग आला आणि आमच्या “बाबांच्या” सेवानिवृत्ती नंतर भंडारा शहरात एक दुमदार घर, १९८८ ला बांधल्या गेल. घरात आम्ही चारच जण. पुढे चारचे दहा झाले. लहान भाऊ त्याच्या नोकरी निमित्ताने कुटुंबासह नागपूरला रहायला गेला.
वडिलांचा शिक्षकीपेशा असल्यामुळे, जात-पात, उच्च-नीच, धर्म याला मुळातच थारा नव्हता. सामाजिक समरसतेच बाळकडू आम्हाला आमच्या घरातूनच मिळालं. कृतीतून मिळालं.
असं असलं तरी घरात मात्र सुरवातीपासूनच अध्यात्मिक वातावरण आहे. पूजा-पाठ, स्तोत्र पठन हे नित्याचेच. त्यामुळे घरातील वातावरण कायम सात्विक आणि प्रसन्न. १९९१ ची गोष्ट आठवते. एकदा त्या काळातील माझे अधिकारी श्री ए के दास, यांच्या आई त्यांचे सोबत रहायच्या. त्याचं आमच्याकडे बरेचदा येणे असायचे. त्यां अनेकदा “मुझे आपके यहा आनेसे, मंदिर आये जैसा लगता है|” असं म्हणायच्या. आम्हाला खूप कौतुक वाटायचं, आमच्या आई-बाबांचं. त्यांचीच ही पुण्याई|.
कवी विमल लिमये यांच्या “घर” या काव्यात म्हटल्याप्रमाणे, “घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती|
इथे असावा प्रेम-जिव्हाळा, नकोत नुसती नाती|
परस्परांवरील अतूट प्रेमासोबतच, प्रत्येकाच्या मनात आपल्या समाजाप्रती आदर, प्रेम, जिव्हाळा या घरातील प्रत्येकाच्या हृदयात भरून राहिला आहे, हे अभिमानाने सांगावेसे वाटते. ही अतिशयोक्ती नाही.
आई वडिलांसोबत राहण्याची मौज काही ओरच असते. आमच्या बाबांनी जवळ जवळ चौदा वर्षे “ श्रीराम जय राम जय जय राम” अशा “श्री रामनामा” च्या हजारो वह्या सुंदर हस्ताक्षरात लिहून काढल्यात. बाबांचं अत्यंत आवडीच गाणं म्हणजे “काम करो, काम करो, काम करो काम..” त्याची महती आम्ही जाणून आहोत. वडिलांच्या शेवटच्या काळात त्यांचे सोबत घालविलेले क्षण कधी कधी विसरू शकणार नाही.
आमचं कुलदैवत गणपती. आमच्या आईने तर “श्री गजाननाची” एक हजार एकशे अकरा नावे (११११) संकलित करून, ती लिहून काढलीत. ती दैनिक तरुण भारत, नागपूर या वृत्तपत्रात प्रकाशीत झालीत. त्याच्या अनेक प्रती वाटल्यात. या “घरा”ला हा असा वारसा लाभला आहे.
आजही आम्हाला बाहेरून घरी येण्यास जरासुद्धा उशीर झाला तरी आईच्या जीवाची होणारी तगमग आम्ही जाणतो. जिव्हाळा हा घराचा कळस आहे. आमच्या आई-बाबानी “अध्यात्म आणि विज्ञान यांची योग्य सांगड घालीत, जीवन सुकर” करता येते याचा परिपाठ आमचे समोर मांडला आहे.
“मन समाधानी असू द्या”, आई बाबांनी दिलेला हा मंत्र आमच्यासाठी वेद मंत्रांहून वंद्य आहे.
आमच्या या वास्तुत गेली वीस वर्षे, “श्री स्वामी समर्थ” नामाचा गजर “विद्युत घोष यंत्रातून” अखंडपणे (विद्युत अडथळा झाल्यास जो काही खंड पडत असेल तेवढाच) सुरु आहे.
जीवनात येणाऱ्या कठीण प्रसंगांना धैर्याने सामोरे जात, सत्याची कास धरून, सकारात्मक भाव जागृत ठेवून मार्गक्रमण करीत राहिल्यास प्रवास सुकर होतो, हे आम्ही याच घरात राहून अनुभवले आहे.
कितीही त्रागा झाला/मनस्ताप झाला तरी, आमच्या मुखातून कधीही, कुठल्याही प्रकारची शिवीगाळ झाल्याचं, मला तरी स्मरत नाही. आताशा, अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत बोलला जाणारा, परवलीचा शब्द “अरे, यार..|”. मला आठवत नाही आम्ही कधी कुणाला तरी “अरे, यार..” म्हटले असेल. कुणी म्हणत असेल तर त्याला समज मात्र देतो. (हो, अगदी आमचा नातू सुद्धा सहजपणे “अरे यार..” म्हणून जातो).
आत्मविश्वास हेच घरातील देवस्थान आहे. सद्गुरूंची पूर्ण कृपादृष्टी आमच्या कुटुंबावर आहे हे वेगळं सांगण्याची गरजच नाही.
अगदी आज, आत्ताच घडलेला प्रसंग नमूद केल्या वाचून राहवत नाही. माझ्या वैयक्तिक कामानिमित्ताने एका अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी त्यांचे घरी गेलो. परिचय नव्हता. बोलणे आटोपले.
त्यांचे कडे श्रीपाद श्रीवल्लभांच्या ग्रंथाचे पारायण सुरु होते. दर्शन घेतले. पिठापूर येथून आलेला प्रसाद मला प्राप्त झाला. श्री गणरायांच्या आगमनासोबतच, श्री दत्तगुरूंचे पहिले अवतार “श्रीपाद श्री वल्लभ स्वामी” महाराज. त्यांची सुद्धा आज जयंती. तसबिरीच्या रुपात महाराजांच आगमन आमच्याकडे आज झालं. हा योगायोगच म्हणायचा.
गणरायाच्या आगमनाने, दत्तप्रभूंच्या पदस्पर्शाने, घर अधिकच सजले|
भाव मनीचे निर्मळ अवचित, ओठांवर आले||
मंदीर स्वरूपी घराचे घरपण असेच वृद्धिंगत होत रहावे आणि मातृ-पितृ ऋणासोबतच समाज ऋण फेडण्याची सद्बुद्धी आम्हाला द्यावी हीच “बाप्पां”च्या चरणी नम्र प्रार्थना.

श्रीकांत भास्कर तिजारे
९४२३३८३९६६ / ७०३८८३९७६२


संवेदना: एक हात मदतीचा…

‘मैत्री’ जीवनातील कमी…

Social Media