३८ हजार नोकऱ्या निर्माण करणाऱ्या प्रकल्पांना मंत्रिमंडळ उपसमितीची मंजुरी
रत्नागिरी : रत्नागिरी(Ratnagiri) तालुक्यात एमआयडीसी (MIDC)क्षेत्रांमध्ये दोन प्रमुख प्रकल्पांसाठी मंत्रिमंडळाच्या उपसमितीने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांमुळे कोकणात २९ हजार ५५० कोटींची गुंतवणूक होणार असून, सुमारे ३८ हजार नोकऱ्यांची निर्मिती होणार आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नांमुळे सिलिकॉन वेफर्स आणि चिप्सच्या निर्मितीत अग्रेसर असलेल्या वेल्लोर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पार्क प्रा. लि. तसंच रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि.(Reliance Infrastructure Limited) या कंपन्यांनी गुंतवणुकीसाठी रत्नागिरी जिल्ह्याची निवड केली आहे.
उच्च तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प(Projects based on high technology)
वेल्लोर इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी पार्क प्रायव्हेट लिमिटेड (VITPARK) वेल्लोर इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी पार्क (VITPARK) हा उच्च तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प असून, सिलिकॉन वेफर्स आणि चिप्सचे उत्पादन जागतिक स्तरावर करणार आहे. बंद पडलेल्या स्टरलाइट कंपनीच्या ५५० एकर जागेचा वापर करून हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. ज्यामुळे औद्योगिक पुनरुज्जीवन होईल. “मेड इन इंडिया”(Made in India) या अंतर्गत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताचे स्थान अधिक मजबूत करण्याचा या प्रकल्पाचा उद्देश आहे. या प्रकल्पामध्ये एकूण १९,५५० कोटी रूपयांची भांडवली गुंतवणूक होणार असून ५६२० प्रत्यक्ष तर २८ हजार अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. सेमीकंडक्टर क्षेत्रात भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकारचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. त्या अनुषंगाने रत्नागिरी मध्ये येत असलेला हा प्रकल्प गेमचेंजर ठरणार आहे.
४५०० प्रत्यक्ष रोजगारनिर्मिती(4,500 direct job creation)
मंत्रिमंडळाच्या उपसमितीने रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर(Reliance Infrastructure) लिमिटेडच्या संरक्षण क्षेत्राशी निगडीत प्रकल्पालाही मान्यता दिली आहे. भारताच्या संरक्षणसिद्धतेच्या दृष्टीकोनातून महत्वाचा असलेला हा प्रकल्प रत्नागिरीत होत असल्याने कोकणाच्या अर्थव्यवस्थेलाही गती मिळणार आहे. संरक्षण क्षेत्राला लागणाऱ्या शस्त्र-शस्त्रास्त्रांची निर्मिती करणाऱ्या या प्रकल्पासाठी दहा हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे, तर ४५०० प्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होणार आहे.
कोकणात (Konkan)नाविन्यपूर्ण उद्योग यावेत यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत(Uday Samant) यांनी जगभरात मोठी मोहीम केली होती. मेक इंडिया मोहीमेला बळ देण्यासाठी भारतीय उद्योजकांना ही मोठ्या गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण दिले पाहिजे असं धोरण स्विकारून उदय सामंत यांनी रणनिती आखली होती. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून सलग दोन वर्षे महाराष्ट्र देशी-विदेशी गुंतवणुकीत क्रमांक एकचं राज्य ठरले आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये समप्रमाणात उद्योग गेले पाहिजेत यासाठी शासनाने यंदा जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत, त्या अनुषंगाने पहिल्यांदाच गडचिरोली सारख्या जिल्ह्यातही मोठी गुंतवणूक पाहावयास मिळाली.
कोकणातील बंद पडलेल्या स्टरलाइट इंडस्ट्रीजच्या(Sterlite Industries) ५५० एकर जागेचा योग्य उपयोग होऊन रोजगारनिर्मिती व्हावी यासाठी प्रयत्नरत असलेल्या उदय सामंत यांनी स्टरलाइट ची जागा ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला होता. उद्योगांची निर्मिती सोबत वादात सापडलेल्या उद्योगांच्या समस्यांचा निपटारा करण्यावर उदय सामंत यांनी भर दिल्याने अनेक मोठे उद्योग महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी पुढे येत आहे. सेमीकंडक्टर आणि संरक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपन्यांनी राज्यात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतल्याने या नवीन क्षेत्रातही महाराष्ट्राचा(Maharashtra) दबदबा तयार होईल असा विश्वास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे.