भारतीय संघाच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर सत्ताधारी व विरोधकांची राजकीय टोलेबाजी,चिमटे,हशा….!

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ (ICC Champions Trophy 2025)जिंकल्याने सोमवारी विधान परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला असता भारतीय संघाच्या विजयाचा उत्सव साजरा करतानाच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकीय टोलेबाजी, चिमटे काढण्यात आल्याने  संपूर्ण सभागृह हास्यकल्लोळात बुडाले. कारण तब्बल १२ वर्षांनी दुबई(Dubai) मध्ये झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडवर (New Zealand)४ विकेट्सनी विजय मिळवत चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपले नाव कोरले.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनीही, “हा प्रत्येक भारतीयासाठी आनंदाचा सोनेरी क्षण असल्याचे सांगितले.तब्बल १२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारताला हे यश मिळाले. संघ म्हणून एकत्र येऊन काम केले, तर दैदीप्यमान यश मिळते. कारण आम्हीही नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत असेच संघ म्हणून काम केले आणि निर्णायक विजय मिळवला,” असे म्हणत विरोधकांना डिवचले.त्यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही मग आपसुकच महायुती सरकारला मार्मिक शब्दात बोलत चिमटे काढत प्रत्युत्तरही दिले.
“भारतीय संघाने ज्या पद्धतीने खेळ केला, तो अभिमानास्पद आहे.मात्र हे करताना त्यांनी कोणतेही फेरफार,पैसे वाटप किंवा ईव्हीएम मॅनेज न करता सर्व सामने जिंकले!”असे सांगतच मोठा हशा पिकला.तसेच,”संघातील सर्व खेळाडूंना विधानभवनात बोलावून त्यांचा सत्कार करा. आणि जर राज्याची आर्थिक स्थिती चांगली असेल, तर त्यांना प्रत्येकी ₹१ कोटी बक्षीसही जाहीर करा,” अशी मागणीही त्यांनी केली.
मग सभागृहातले खेळते वातावरण पाहता कॉंग्रेसचे आमदार भाई जगताप यांनीही या चर्चेत उडी घेतली आणि भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने प्रत्येक सामन्यात नाणेफेक हरली तरीही संघाने विजय मिळवला,हे लक्षात घेत,”नाणेफेक हरली म्हणून त्यांनी हिंमत सोडली नाही,” असा मार्मिक शब्दात महायुतीला चिमटा काढला. त्यावर प्रत्युत्तर देताना सत्ताधाऱ्यांनीही मग लागलीच “नाणेफेकीवर प्रश्न विचारण्यापेक्षा चांगला खेळ करण्यावर भर दिला.त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे,” असा प्रतिटोला लगावला.यावेळी भारतीय संघाच्या विजयाचे कौतुक करताना दोन्ही बाजूने जोरदार राजकीय आरोप-प्रत्यारोपांचे फटाके उडाले.तर सत्ताधारी आणि विरोधकांमधील ही शाब्दिक चकमक सभागृहात चांगलीच रंगतदार झाली आणि उपस्थित सदस्यांसाठी एक करमणुकीचा क्षणही ठरला. मात्र त्याचवेळी सभागृहात भारतीय संघाच्या सत्कारासाठी विशेष कार्यक्रम घ्यावा, त्यांना रोख बक्षीस द्यावे,अशी मागणी विरोधकांनी केली. मात्र यावर आता सरकार कोणता निर्णय घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Social Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *