पणजी : केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत गोव्यात सुरु असलेल्या इफ्फी 52 मध्ये घेण्यात आलेल्या ‘उद्याचे 75 सर्जनशील व्यक्ती’ या स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार केला.
“भारतात कौशल्य आणि प्रतिभेची अजिबात कमतरता नाही. या प्रतिभावंत युवकांना फक्त एक संधी हवी होती आणि त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी आणि येत्या काळात त्यांना चित्रपट उद्योगाचे नेतृत्व करता यावे, यासाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवातील भारत@75 यापेक्षा योग्य व्यासपीठ कोणते होते” , असे अनुराग ठाकूर यावेळी म्हणाले.
75 युवा सर्जनशील नवोदित प्रतिभा या इफ्फीमध्ये हजर आहेत, हे सर्व युवा कलाकार, अत्यंत भाग्यवान आहेत कारण त्यांना चित्रपट क्षेत्रातील सर्वोत्तम कलाकारांशी चर्चा करण्याची, त्यांच्याकडून काही शिकण्याची संधी मिळणार आहे, असेही अनुराग ठाकूर यावेळी म्हणाले. अनेक नवोदित कलाकारांना खूप परिश्रम करुनही, कित्येक दशके ही संधी मिळत नाही, असेही त्यांनी नमूद केले.
या महोत्सवात आपल्याला, भारतीय चित्रपट सृष्टीतील दिग्गजांच्या मास्टरक्लासेस मध्ये सहभागी होता येईल. त्यांच्याकडून चित्रपटनिर्मिती आणि तंत्रज्ञानाच्या नवनवीन पद्धती शिकता येतील. ज्याला सकस आशयाची जोड देऊन उत्तम चित्रपट निर्मिती करता येईल, असेही ठाकूर पुढे म्हणाले.
केंद्रीय मंत्री म्हणाले: “इफ्फी 52 मध्ये विविध प्रतिनिधी आणि सहभागींबरोबर झालेल्या संवादात अनेकांनी मला सांगितले की ’75 क्रिएटिव्ह माईंड्स’ हा अलीकडच्या वर्षांत इफ्फीमध्ये झालेला प्रमुख स्वागतार्ह बदल आहे.”
त्यांनी युवा विजेत्यांना भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांबद्दल ब्लॉग लिहिण्याचे आणि IFFI 52 मध्ये त्यांचे अभिप्राय आणि शिकण्याबाबतचे अनुभव व्यक्त करण्याचे आणि सामायिक करण्याचे आवाहन केले.
त्यांनी चित्रपट उद्योग आणि ‘ सर्जनशील तरुणांना ’ आपल्या कलेच्या माध्यमातून भारताची क्षमता जगासमोर मांडण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
तरुण चित्रपट निर्मात्यांना संबोधित करताना, सीबीएफसीचे अध्यक्ष आणि ग्रँड ज्युरीचे सदस्य प्रसून जोशी म्हणाले, “चांगल्या गोष्टी शोधणे खूप महत्वाचे आहे कारण जोपर्यंत तुम्ही चांगले शोधत नाही तोपर्यंत तुम्हाला योग्य माहिती मिळणार नाही किंवा योग्य ठिकाणी पोहोचता येणार नाही.
प्रख्यात चित्रपट निर्माते आणि ग्रँड ज्युरीचे सदस्य केतन मेहता म्हणाले: “सिनेमा आता केवळ मोठ्या पडद्यापुरता मर्यादित राहिलेला नाही, ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे तो आता आपण ज्या हवेत श्वास घेतो त्यात आहे आणि प्रत्येकाच्या खिशातही आहे.”
केंद्रीय मंत्र्यांनी स्पर्धेचे निवड समितीचे ज्युरी सदस्य आणि ग्रँड ज्युरी सदस्यांचाही सत्कार केला. निवड समितीच्या ज्युरी सदस्यांपैकी यतींद्र मिश्रा (लेखक), अनंत विजय (लेखक) आणि संजय पूरण सिंग (चित्रपट निर्माता) यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.