आपल्या मनामनातला, समाज पुरूषातला ‘श्रीराम’ जागविण्याची वेळ आली नाही का?

‘मरे एक त्याचा दुजा शोक वाहे अकस्मात तोही पुढे जात आहे’ असे समर्थ रामदासांनी म्हटले आहे ते किती खरे आहे याची साक्षात प्रचिती गेल्या काही दिवसांपासून येत आहे. आपल्या बाजुला हसता – असता आप्त – स्वकीय, परिचीत माणसे मरणाच्या कालकुपीत नष्ट होताना दिसत आहेत. आणि गदिमांच्या गित रामायणात म्हटले आहे तसे ‘पराधीन आहे जगती पूत्र मानवाचा दोष ना कुणाचा म्हणत’ आपण समूह माध्यमांतून हळहळत श्रध्दांजली देण्याचे कर्तव्य किंकर्तव्यमूढपणे करत बसलो आहोत.

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना आणि त्याची टाळेबंदी सुरू झाली आणि गेल्या अनेक वर्षांच्या आपल्या जगण्याचे सारेच संदर्भ जणू अर्थहिन झाले आहेत. दररोज सकाळी उठल्यानंतर हातात स्मार्ट फोन घेतला की त्यावर धक्कादायक आप्त स्वकीय, मित्र परिचीतांच्या मृत्यूच्या आणि दुर्दैवाच्या बातम्या किंवा माहित्या वाचाव्या लागत आहेत. रोज रात्री निद्रादेवीच्या हवाली आपला देह समर्पित करताना माणसाच्या मनात आजचा एक दिवस तर जगलो बुवा याचे केवढे विलक्षण अदृश्य समाधान आपण मिळवत आहोत याचेच कौतुक वाटत राहते! या सा-या दैन्यावस्थेला कोण जबाबदार आहे? असा प्रश्न विचारण्याची प्राज्ञा सध्या आपल्या कुणात राहिली नाही तरी मनात प्रश्न तर येतच राहतातच ना? त्यांना आपली आपणच उत्तरे शोधण्याचा प्रश्न करत बसायचे. कारण सातत्याने ‘घराबाहेर पडू नका घरात बसा’ म्हणून सांगणा-या ‘मायबाप’ (माय जेवू घालीना बाप भिक मागू देईना!) सरकारने दुसरे काही कामच शिल्लक ठेवले नाही ना आपल्यासाठी.!  

राज्यात आठ महिन्यांपूर्वी सत्तेवर महाविकास सरकार आले त्यावेळी सामान्य माणसाला कोण आनंद झाला होता हे आम्ही याच डोळ्यानी मंत्रालयात झालेल्या अलोट गर्दीत पाहिले होते. हे ‘बाराभाईचे कारस्थान’ (बारामतीचे नव्हे?!) असलेले सरकार असूनही, या राजकीय पक्षांना ‘जनादेश’ नाही म्हणत भाजपचे नेते ‘तारस्वरात’ टिका करत असतानाही मंत्रालयात नव्या मुख्यमंत्र्याचे औक्षण ‘ओवाळीते भाऊराया’ म्हणत किती उत्साहाने मंत्रालयातल्या कर्मचारी असलेल्या सामान्य घरातल्या गृहिणी भगिनीनी केले होते. हे सदभाग्य कुण्या मुख्यमंत्र्याच्या वाटेला आलेले आम्ही गेल्या २५ वर्षात पाहिले नव्हते. त्यामुळे हे माझे सरकार काहीतरी माझ्यासाठी करेल ही अपेक्षा होती. त्यावर आधी कोरोना आणि नंतर टाळेबंदीतल्या बेबंदशाहीचे पाणी पडले. या सरकारच्या दुर्दैवाचे दशावतार पहाताना जनसामान्यांच्या मनात आणिकच नकारात्मक भाव तयार होत आहेत. कोण होतास तू काय झालास तू असे आता सज्जन, लोकप्रिय मुख्यमंत्र्याना जनता विचारणा करत आहे? राज्य सरकारला कर्मचा-यांचे पगार कर्ज काढून द्यावे लागण्याची वेळ आली आहे किंबहूना ‘मी’ तर असे म्हणेन की ही अशी वेळ आली म्हणून घाबरायचे कारण नाही! आता काय ‘म्या’ बोलावे महाराज? अशी भाबड्या जनतेची अवस्था झाली आहे.

म्हणून मग जनतेने ‘जो जिता वह सिकंदर’ म्हणत केंद्रातल्या सरकारला गा-हाणे घालावे तर काय? ते वर्तमानात नव्हे भूतकाळातल्या प्रश्नांच्या जागृतीमध्ये रममाण झालेले पहायला मिळत आहे. वर्तमानात देशात उद्योग धंदा, अर्थकारण संकटात असताना ‘टाळेबंदी’ करून ज्यांनी दूरदर्शनवर रामायण आणि महाभारत मालिका दाखविण्याचा निर्णय घेतला त्या सरकारच्या बौध्दीक दिवाळखोरीबद्दल न बोलावे हेच बरवे नाही का? कोरोनाच्या महासंकटात सामान्य माणसाला केंद्रातल्या सरकारकडून काय मिळाले? मोफत तांदूळ? २० लाख कोटीचे आत्मनिर्भर पँकेज? की संकटालाच संधी समजण्याचा उपदेश!? काहीच मिळाले नाही?. लाखो लोक मृत्य़ूच्या खाईत लोटली जात असताना, आरोग्य सेवा मरणपंथाला असताना या देशात प्रत्येक जिल्ह्यात सुसज्ज रूग्णालये हवीत म्हणून नियोजन आता तरी करावे असे सरकारला वाटले का? नाही. कारण काय? तर वाजत गाजत श्रीराम मंदीराच्या भुमीपूजनाचे सोहळे होत आहेत. तिकडे देशाच्या सिमांवर निष्पाप सैनिक कर्तव्य हाच श्रीराम म्हणून शहिद झाले आहेत. शत्रूने आपल्या सिमांमध्ये घुसून कब्जा केला आहे. आज पर्यंतचे दुबळे गरीब दरिद्री समजले जाणारे शेजारी नेपाळ, बांग्लादेश सारखे भारतावलंबी देश वाकुल्या दाखवत आहेत. पण त्यावर कठोर भाष्य, कृती टाळून आम्ही वाळूत डोके खूपसून वल्गना  कसल्या करत आहोत तर ‘सर्वसहमतीने शतकांच्या गुलामीच्या खुणा पुसल्याच्या?’ फुशारक्या मारत आहेत ‘सबका साथ सबका विकास’ (दुबे नव्हे!)च्या. अरे, जिथे देशात सामान्य माणसाला रूग्णालये, तेथल्या सेवा मिळत नाहीत आणि मिळाल्यातर त्या परवडत नाहीत म्हणून ‘हे राम’ म्हणावे लागत आहे किंवा ‘राम नाम सत्य है’ म्हणत स्मशानात जावे लागत आहे, ज्यांच्या अस्तित्वातच काही राम राहिला नाही, त्यांना या सोहळ्यांचे औचित्य काय? असे विचारायचे नाही बरे!

आज देशातील कोट्यावधी तरूणांच्या हाताला काम धंदा नाही, टाळेबंदीमुळे अर्थव्यवस्थेने ‘हे राम’ म्हणायची वेळ आली आहे अश्या वेळी प्रभू रामचंद्राच्या आदर्शाच्या गोष्टी सांगणा-यांना हे कोण सांगणार? की अरे, बाबानो एका सामान्य धोब्याच्या वक्तव्यानंतर ज्या चक्रवर्ती राजा प्रभू रामचंद्राने आपल्या पत्नीचा देखील त्याग केला होता. त्या रामाच्या रामराज्यात सर्वसामान्यांच्या ‘बोलण्याला काय किंमत’ होती? याचा थोडातरी आदर्श ठेवा. पण आजच्या राज्यकर्त्यांच्या राज्यात असे बोलणा-यांची किंमत तर राहोच, हिंमत तरी होत आहे का? असा प्रश्नही कुणाला विचारावासे वाटते का!
प्रभू रामाच्या नावाचा उलटा उच्चार करणारा वाल्या ‘मरा मरा’ म्हणताना वाल्मिकी झाला. तो त्या रामनामाचा महिमा आहे. पण इथे लक्षावधी जनतेला ‘मरा मरा’ म्हणत सत्ताधारी नेते पाशवी बहुमताच्या बळावर रावणासारखे मत्तपणे ‘लोकमताचे सिताहरण’ करत मंदीराच्या भुमीपूजनाचा सोहळा हट्टाने पार पाडतात का? असा प्रश्नही कुणाच्या मनाला शिवला नाही का?. याला कोणत्या मंत्राची मोहीनी म्हणावे की वाल्यांची संस्कृती म्हणावे? असा प्रश्न साक्षात प्रभू रामालाच विचारावा काय? कारण सध्या तसा तो त्यालाच विचारावा लागणार आहे! श्रीरामाचे नाव या जगाच्या आदी अंता पर्यत राहणार आहेच. त्याचे अस्तित्व कधी कुणाला पुसता आले नाही.  त्याचे राजकारण करणा-यांचे सोडा हो पण हे नाम घेणा-या सर्वसामान्य छोट्या माणसाचे काय? त्याच्या अस्तित्वाचे काय?

त्यासाठी त्याला काही विचारण्याचा अधिकार या देशात मिळाला होता त्याचे काय? आज त्यांला रोजी रोटी हवी आहे. शिक्षण, आरोग्य सेवा हवी आहे. त्यांचे काय? सर्वोच्च पदांवरील नेत्यांचे सत्ताकांक्षेचे मनोरे त्यांच्यासाठी काहीच कामाचे नाहीत. दोन वेळच्या अन्नासाठी आज लोक मोतात झालेले दिसत आहेत. ज्यांना विवेक विचाराचे कैवारी म्हणावे त्या सा-या न्याय देण्यासाठी निर्माण झालेल्या संस्था माध्यमे कौरव सभेतील ज्येष्ठांसारखी डोळ्याला आणि सध्या तोंडलाही पट्टी बांधून बसल्या आहेत त्यांचे काय? न्याय देवता तर नेहमीच पट्टी बांधून बसली आहे पण ती निरपेक्ष निष्पक्ष न्याय व्हावा म्हणून अन्याय होताना पहावत नाही म्हणून तर नाही ना?. त्या माध्यमातील पोटावळ्या संपादकांना, प्रज्ञावंताना, संसदीय लोकशाही व्यवस्थेतील लोकांचा आवाज असलेल्या देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांना आज त्यांच्या मतदारांच्या हाल अपेष्टा दिसत नाहीत का? असा कोणता काळ वैराण आला की कुणालाच, कश्याचे, काहीच वाटेनासे झाले आहे.

आणिबाणीतही या देशात सामान्य माणसांचा आवाज दडपता आला नव्हता, मग या कोरोनाच्या आणि टाळेबंदीच्या ‘आरोग्य आणिबाणीत’ आपण सारे इतके वैचारीक हिन दिन, गलितगात्र का होत चाललो आहोत? कारण आपली प्रतिकार शक्ती मेली आहे का? कोरोनाला हरवायचे असेल तर जैविक प्रतिकारशक्ती सक्षम असली पाहीजे पण ही ‘परवशता परिस्थिती’ सुधारायची असेल तर आपल्या मन मस्तिष्कातल्या प्रतिकारशक्तीला आपण जागे सक्षम करणार आहोत की नाही? हा प्रश्न स्वत:ला विचारला पाहीजे. प्रभू रामाने रावणासारख्या बलाढ्याला हरवताना वानरांसारख्या दुलर्क्षीत समजल्या जाणा-या प्राण्यांमध्ये चेतना जागविली मग आज आपल्या मनामनातल्या समाज पुरूषातला राम जागविण्याची वेळ आली नाही का? याचा विचार आपण कधी करणार आहोत की नाही?
पूर्ण.

किशोर आपटे, मुंबई, 
 

Social Media