सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील पाच नगरपरिषदांच्या नगराध्यक्षपदाच्या आज निवडी जाहीर करण्यात आल्या. यामध्ये माळशिरसच्या नगराध्यक्षपदी आप्पासाहेब देशमुख, नातेपुते नगरपंचायतीवर उत्कर्षाराणी पलंगे , तरमहाळुंग श्रीपुरचा पहिला नगराध्यक्ष होण्याचा बहुमान लक्ष्मी चव्हाण यांनी मिळवला . या तीन नगरपंचायतीवर भाजपाचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. तर माढा नगरपंचायतीवर काँग्रेसच्या मीनल साठे यांची नगराध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाली. बार्शी तालुक्यातील वैराग नगरपंचायतीवर राष्ट्रवादीच्या सुजाता डोळसे या निवडून आल्या. पाच पैकी तीन नगरपंचायतीवर भाजपने आपला झेंडा फडकावला आहे.
दरम्यान माळशिरस नगपंचायतिमध्ये वेगळेच चित्र पहायला मिळाले. कारण माळशिरस नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला. यामध्ये एकूण 17 जागापैंकी 10 जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले होते. तर उर्वरीत राष्ट्रवादीचे 2, अपक्ष 3 आणि स्थानिक मविआचे 2 असे बलाबल आहे. यामध्ये मोहिते-पाटील समर्थक असलेल्या आप्पासाहेब देशमुख यांचे नाव नगराध्यक्षपदासाठी निश्चित झाले होते. मात्र भाजपमधीलच काही सदस्यांनी त्यांच्या नावाला विरोध केला. त्यामुळे राजकीय डावपेचात माहीर असलेल्या आप्पासाहेब देशमुख यांनी स्वत:च्या घरातील पत्नी आणि भावालाही निवडून आणले होते. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या तिकीटावर त्यांची बहीण निवडून आली होती.
त्यामुळे कुटुंबातीलच चार लोक आणि इतर अपक्ष असलेल्या 5 उमेदवारांना सोबत घेऊन आपल्याच पक्षातील सात जणांना विरोधात बसवत स्वत: नगराध्यक्षपदी विराजमान झाले तर उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे शिवाजी देशमुख यांची वर्णी लागली आहे. त्यामुळे माळशिरस नगरपंचायतीत भाजपा आणि राष्ट्रवादीचि युती पहायला मिळाली…