गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु: साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ||
दत्त संप्रदायाचे आराध्य दैवत श्री गुरुदत्तात्रेय.
मालाकमंडलुरध: करपद्म युग्मे मध्यस्थ पाणि युगुले डमरू त्रिशुले । यस्यस्त ऊर्ध्वकरयो: शुभशंखचक्रे वंदे तमत्रिवरदं भुजषट्कयुक्तम्।
असं स्वरूप असलेल्या भगवान दत्तात्रयांचा आज, जन्मदिवस म्हणजेच दत्त जयंती.
दत्त जयंती सोहळा साजरा करतांना आपल्या मनाच्या आंतरिक स्थितीमध्ये निश्चितपणे बदल होत असतो. तो कोणत्याही स्वरूपात असेल, पण बदल मात्र निश्चितपणे जाणवतो. असे उत्सव जेव्हा सगळ्यांच्या सहभागातून, संपन्न होतात, तेव्हा प्रत्येकाच्या अंतकरणात दत्त निश्चितपणे जागे झालेले असतात. हेच दत्तात्रेय जयंतीचं फलित आहे.
आपल्याकडे जेव्हा अतिथी-पाहूणे येतात, त्यांचा आपण यथोचीत सत्कार करतो. अतिथींचा सत्कार करण्याचा जो संस्कार आहे, तो माता अनसूयेपासून आलेला आहे. हा अत्रिमुनींचा संस्कार आहे.
जेव्हा आपण अतिथिंचा मनोभावे सत्कार करतो याचा अर्थ आपल्या अंतःकरणात दत्त जन्म निश्चितपणे झालेला आहे. सर्वांच्या हृदयस्थ दत्तात्रेयांना, नमस्कार.
श्रीगुरुचरित्र ग्रंथ म्हणजे सद्गुरु प्राप्तीची प्रेरणा देणारा, सद्गुरु सेवेचा आदर्श दाखवणारा, आदर्श घडविणारा, सद्गुरू चरणावरची निष्ठा वाढविणारा, निर्भय व धर्म संपन्न जीवन जगण्याची वाट दाखविणारा असा एक प्रासादिक ग्रंथ आहे.
“अतिथी देवो भव” या उक्तीचा संपूर्णतः अर्थ समजावून सांगणारे दोन प्रसंग आपल्याला गुरुचरित्रात अनुभवायला मिळतात. एक म्हणजे अध्याय चौथा. अनसूया मातेच्या सदाचरणाने ओतप्रोत भरलेला प्रसंग म्हणजे चौथ्या अध्यायात सांगितलेली “दत्तजन्माची कथा”. विवेकयुक्त धर्माचरणाचे फळ सांगितलेल्या, पाचव्या अध्यायातील “श्रीपाद श्रीवल्लभांची कथा”.
माता अनसूयेने तिचा पती सेवेचा धर्म, तिची सेवावृत्ती पूर्णपणे सांभाळली आहे. अशी सेवावृत्ती जिथे असते त्या ठिकाणीच, उत्पत्ती-स्थिती-लय अशी त्रिविध शक्ती जागृत होत असते. माता अनसूयेच्या ठाई अशी त्रिविध शक्ती होती. ही शक्ती केवळ स्वसुखार्थ आहे का विश्वसुखार्थ याची परीक्षाही उत्तीर्ण व्हावीच लागते.
त्रिगुणात्मक त्रिमूर्ती ब्रम्हा, विष्णू, महेश्वर यांनी माता अनसूयेची परीक्षा घेण्याचे ठरवले. ते अनुसूयेचे सत्व बघण्यासाठी अत्रिमुनींच्या आश्रमात आले. भगवतस्मरणात व पतीचिंतनात दंग असलेली माता अनसूया. तिचे सात्विक सौंदर्य आणि पातिव्रत्य पाहून जगाचे निर्मातेही थक्क झालेत. शाप, वरदान या दोन्ही बलांनी संपन्न अशा माता अनसूयेची परीक्षा घेताना तीनही देवांना विचार पडला. त्यांनी तिला भोजन मागितले. “माते, तू वस्त्र विरहित होऊन वाढशील तर आम्ही भोजन करू. भोजन स्वीकारू” असे ते म्हणाले. अतिथी रूपात आलेल्या या त्रिदेवांच्या भिक्षेची ती विपरीत आणि गूढ मागणी ऐकून, माता अनसूया चलबिचल झाली. क्षणभर हादरून गेली. पण क्षणभरच|.
आपल्याला तोंडभरून “माते” म्हणून हाक मारणारे विलक्षण भिक्षेकरी खचीतच सामान्य नाहीत हे माता अनसूयेने जाणले.
“माझे मन असे निर्मळ| काय करील मन्मथ खळ| पतीचे असे जरी तप फळ| तारील मज म्हणतसे||” (गुरुचरित्र अ. ४/४०)
अनसूया मातेच्या आचरणातून, विश्वासातून, पातिव्रत्यातून चमत्कार घडला. क्षणार्धात त्रिदेव शिशुरूपे झालीत आणि “अनसूयेच्या धामी आले, त्रैलोक्याचे स्वामी”.
अखेरीस सेवावृत्तीचा, पातिव्रत्याचा विजय झाला आणि भगवंताची उत्पत्ती, स्थिती, लय ही त्रिविध शक्ती सौम्य झाली. म्हणजेच बालरूप झाली. सत्व, रज, तम या तीनही गुणांचे प्राबल्य सेवा वृत्तीत लय पावले. अत्रीऋषींनी ही पाळण्यातील, अनंतकोटी ब्रम्हांडनायकांची बालरूपे बघितली आणि त्यांना गहिवरून आलं.
अनुसूया ही पतीव्रता आहे. ती सगुणात आहे. तिने आकार धारण केलेला आहे. ती अष्टधा प्रवृत्तीच्या म्हणजे पंचमहाभूते व त्रिगुण यांच्या आधीन आहे. तिच्या पोटी जर दत्तात्रयाला अवतार घ्यायचा असेल तर अनसूयेला, मूळमाया जी परब्रम्हाच्या आधीन असते, म्हणजे अक्षया स्वरूपाचा अवतार धारण करून तीला निर्गुणी आदिमाया व्हावे लागले. देव मायेच्या आधीन आहेत. त्यामुळे ब्रह्मा-विष्णू-महेश हे तीन बाळे झालीत.
पुढे, स्थितीचे अधिपती असलेले महाविष्णू तेथे राहिलेत. दत्तात्रेय हे त्या स्थितीचे प्रतीक आहे. म्हणून दत्तात्रेय-सद्गुरुतत्व म्हणजेच अखंड स्थितीशीलता. ही स्थिती पाहिजे असेल तर, सद्गुरूंना, भगवान दत्तात्रेयाला शरण जायला हवे.
सेवाभावाच्या प्रभावाने त्रिदेव प्रसन्न होवून माता अनसूयेला वर मागावे असे म्हणता, “अनसूया म्हणे पतीसी, प्राणेश्वर तूची होसी, देव पातले तुमचे भक्तीसी, पुत्र मागा तुम्ही आता|” (गुरुचरित्र अ. ४/६०)*.
इथे माता अनसूयेचे श्रेष्ठत्व दिसून येते. सेवावृत्ती, तपश्चर्या यांनी प्राप्त होणाऱ्या वरप्राप्ती नंतरही, बल प्राप्ती नंतरही सारे श्रेय ज्याच्यामुळे हे बळ प्राप्त झाले, त्यालाच द्यायचे असते. यातून निरभिमानत्वाचा आदर्श प्रस्थापित करायचा असतो. शुद्ध सेवा वृत्तीतच संपूर्ण विश्वाला मार्गदर्शन करणारे “ मार्गदर्शक दत्ततत्व” प्रगटत असते.
तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत| काखे झोळी पुढे श्वान, नित्य जान्हवीचे स्नान| तुका म्हणे दिगंबर, तया माझा नमस्कार||
|अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त|
श्रीकांत तिजारे
भंडारा. ९४२३३८३९६६