मुंबई : समाजाला जिवंत ठेवायचे असेल तर स्वतःच्या नोकरी-व्यवसायापलीकडे जाऊन समाजासाठी समर्पण भावनेने कार्य करणे आवश्यक आहे. समर्पण, त्याग व सेवा भावनेमुळे कामाचा आनंद मिळतो तसेच समाजाची उन्नती देखील साधते, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
महाराणा प्रताप राजपूत महासंघ व अर्पण फाउंडेशन यांच्यातर्फे ठाणे व नवी मुंबई येथील शिक्षण, पोलीस, वैद्यकीय सेवा व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ८० व्यक्तींना राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते मंगळवारी (२९ मार्च) राजभवन येथे ‘डायनॅमिक सोशल लीडर’ पुरस्कार प्रदान करण्यात आले, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.
कार्यक्रमाला नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक, महाराणा प्रताप राजपूत महासंघाचे अध्यक्ष धनंजय सिंह, महाराणा प्रताप राजपूत महासंघाचे संस्थापक अमरसिंह ठाकूर, अर्पण फाउंडेशनच्या भावना डुंबरे व उद्योजक प्रेमजी गाला प्रामुख्याने उपस्थित होते.
सामान्य परिस्थितीत लोक तसेच राजकीय नेते आपापसात भांडतातही. परंतु देशावर संकट आले की सर्वजण एक होऊन देशासाठी काम करतात. संकटकाळी देशातील एकतेचा अनुभव आपण १९६२, १९६५, १९७१ तसेच कारगिल युद्धाच्या वेळी घेतला असे नमूद करुन करोना काळात देशातील एकता पुनश्च पाहायला मिळाली असे राज्यपालांनी सांगितले.
डॉक्टर्स, शिक्षक, पोलीस कर्मचारी व समाज सेवकांनी या काळात विशेषत्वाने चांगले कार्य केले असे सांगताना राज्यपालांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले.
राज्यपालांच्या हस्ते यावेळी सिंघानिया शिक्षण समूहाच्या अध्यक्षा रेवती श्रीनिवासन, महेश कुडव, प्रेमजी गाला, डॉ ए के फजलानी, सिम्मी जुनेजा, निलू लांबा, शेखर दादरकर, डॉ ज्योती रविशंकर नायर, चित्रा कुमार अय्यर, ज्युपिटर हॉस्पिटलचे संचालक डॉ अमित सराफ, भूलतज्ज्ञ डॉ सोनाली सराफ यांसह ८० व्यक्तींना यावेळी डायनॅमिक सोशल लीडर पुरस्कार देण्यात आले.
Governor Koshyari presents Dynamic Social Leader Awards at Raj Bhavan
Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presented the Dynamic Social Leader Awards to teachers, doctors, police officers and social workers from Navi Mumbai and Thane at a felicitation function held at Raj Bhavan Mumbai on Tuesday (29 Mar).