मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)चे मुंबई विभागिय संचालक समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. समीर वानखेडे यांच्यावरील आरोपांना त्यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तरे दिली आहेत. समीर वानखेडे यांची बहीण यास्मीन यावेळी उपस्थित होत्या. क्रांती यांनी सांगितले की, नबाब मलिक यांनी जे काही आरोप समीर यांच्यावर लावले आहेत ते सपशेल खोटे आहेत. आमच्याकडे न्यायालयात जावून लढण्याइतके आर्थिक बळ नसल्याचे क्रांती यांनी सांगितले.
जातीचे कोणतेही बनावट प्रमाणपत्र नाही.
क्रांती यानी सांगितले की, ‘ माझे पती समीर वानखेडे हे प्रामाणिक अधिकारी असल्याचा अनेकांना त्रास होत आहे. त्यामुळेच त्यांनाच लक्ष्य केले जात आहे. समीर यांनी जातीचे कोणतेही बनावट प्रमाणपत्र केले नाही. जर त्यांनी असे केल्याचे पुरावे असतील तर न्यायालयात सादर करावेत. क्रांतीने पुढे म्हणाल्या की, ‘माझ्या पतीने कोणतेही चुकीचे काम केले नाही. त्यामुळे त्यांच्यावर जे आरोप करण्यात येत आहेत, ते आम्ही सहन करणार नाही.
आरोप करणारे न्य़ायालयात का जात नाही. ज्या लोकांनी आमच्यावर आरोप केले आहेत. त्यांनी न्यायालयात आमच्याविरोधात याचिका करावी. त्या म्हणाल्या की, आम्ही करोडपती नाही, आमची परिस्थिती सर्वसाधारण आहे. त्यामुळे न्यायालयात जाणे आम्हाला परवडणारे नाही. समीर हे अतिशय प्रामाणिक अधिकारी आहेत. त्यामुळेच ते अनेकांच्या डोळ्यात खुपत आहेत. समीर यांनी गेल्या १५ वर्षांत प्रामाणिकपणे काम करून नाव कमावले आहे. या प्रकरणातही त्यांनी प्रामाणिकपणे काम केले आहे. परंतु या प्रकरणातून त्यांना हटवण्यासाठी त्यांच्याविरोधात अतिशय वाईट आरोप करण्यात आले आहेत. आरोप करणा-यांनी समीर यांच्यावर ज्या पद्धतीने आरोप केले आहेत, ते करताना त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत असेही क्रांती म्हणाल्या.