पुण्यातील घनवट प्रकरणाची मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर एसआयटी
मुंबई : पुणे जिल्ह्याच्या राजगुरुनगर तालुक्यातील शेतकऱ्यांची भूमाफीयांकडून होत असलेली फसवणूक प्रकरणी मुख्यमंत्र्याशी चर्चा करून विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करू, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांनी आज मंत्रालयात आज झालेल्या बैठकीत दिली.
राजगुरुनगर तालुक्यातील शेतकऱ्यांची पोपट मारुती घनवट आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून फसवणूक झाल्याबाबत चेतन राजेंद्र चिखले यांनी केलेल्या तक्रारीवर चर्चा करण्यात आली. बैठकीस सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, संबंधित शेतकरी आणि पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी उपस्थित होते.
पोपट घनवट यांनी विविध नावांखाली आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावांवर राज्यातील विविध ठिकाणी कृषी, निवासी आणि औद्योगिक प्रकारच्या जमिनी खरेदी केल्या आहेत. विशेषत: राजगुरुनगर तालुक्यातील पाईट गावासह अन्य भागांमध्ये त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्यानंतर शेतकऱ्यांविरुद्धच तक्रारी दाखल केल्याचे निदर्शनास आले.
अंजली दमानिया (Anjali Damania)यांनी या बैठकीत भूमाफियांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली. त्यांनी यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. दमानिया यांच्या मागणीबाबत महसूलमंत्री बावनकुळे यांनी सांगितले, की ” पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी आतापर्यंत घनवट यांच्या नावे असलेल्या जमिनींची प्राथमिक चौकशी केली आहे. परंतु, त्यांच्या मालकीच्या जमिनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्राबाहेर असण्याची शक्यता आहे. त्यामुळे जमाबंदी आयुक्तांच्या माध्यमातून राज्यभरातील घनवट यांच्या जमिनींची आणि त्यासंबंधित आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी आवश्यक आहे.”
Revenue Minister Chandrashekhar Bawankule said that he will form a Special Investigation Team (SIT) to discuss the matter with the Chief Minister in connection with the land mafia’s fraud of farmers in Rajgurunagar taluka of Pune district.