मुंबई : गेल्या आठ दशकांहून अधिक काळ जगभरातील अगणित संगीत प्रेमींचं भावविश्व समृद्ध करणारा दैवी स्वर आज अखेर शांत झाला. जगतविख्यात पार्श्वगायिका, गानकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. जातपात, धर्म, भाषा, प्रांत, देश अशी सर्व बंधने तोडून प्रत्येकाच्या आयुष्यात अखंड आनंद भरणार्या स्वरमैफलीने अखेरची भैरवी घेतली.
नक्षत्रांचे हे देणे दिगंताच्या प्रवासाला निघून गेले. लतादीदींच्या निधनामुळे संगीत व सांस्कृतिक विश्वावर शोककळा पसरली आहे. संगीतामुळं तृप्त होणारं प्रत्येक मन खंतावलं आहे. लतादीदी लौकिकार्थानं आपल्यातून निघून गेल्या असल्या तरी कालजयी सुरांच्या रूपानं त्यांच्या स्मृती चिरंतन राहतील, अशी भावना जगभरात व्यक्त होत आहे.