आर्थिक व काहीशा रिलिजन व रेसीझमच्या क्रूर निकषांवर जगातील पहिले व दुसरे युद्धांनंतर विश्वातील अशांती, पर्यावरणाचा बिघडलेला समतोल, राजनैतिक व आर्थिक पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर जगातील बहुतांश देशांनी मिळून एक “संयुक्त राष्ट्र संघ” (UN) स्थापन करून जागतीक सत्तेचे युरोपातील केंद्रिकरण मोडीत काढीत मानवतेच्या कल्याणार्थ विविध उपाय योजना हाती घेतल्या. UN मध्ये आपल्या भारत देशाने नेहमीच सकारात्मक भूमिका निभावली आहे.
याच UN ने जून १९७२ मध्ये स्वीडन येथील स्टॉकहोम येथे “Conference on the Human Environment” भरवून पर्यावरण रक्षणावर खूप चर्चा केली. परिणामतः त्याच वर्षी डिसेंबर १५ रोजी General Assembly ने एक प्रस्ताव पारीत करून सन १९७४ पासून दर वर्षी ५ जून म्हणजे भारतीय सौर ज्येष्ठ १५ हा दिवस “जागतिक पर्यावरण दिन” म्हणून साजरा करायचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. हा दिन साजरा करण्याचा मूळ उद्देश्य पर्यावरणाबाबत जनजागरण व राजनैतिक गतीशीलता वाढविणे हा होय. यामध्ये ओझोनचा घटणारा पट्टा, विषारी रसायनांचे उत्सर्जन, वाळवंटीकरण व जागतीक उष्णीकरण रोखणे यावर भर देण्यात आला आहे. पर्यावरण दिनानिमित्त दर वर्षी एक ध्येय निर्देशक घोषवाक्य UN चे वतीने दिले जाते व एका देशाला यजमान देश म्हणून घोषित केले जाते. या वर्षीचे यजमान राष्ट्र कॅनडा असून घोषवाक्य आहे Connecting People To Nature म्हणजे लोकांना निसर्गाशी जोडणे. म्हणजेच लोकांचे निसर्गाशी नाते जोडणे म्हणजेच म्हणजेच “वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरें”. हरिभक्त संत तुकारामांनी ४०० वर्षांपूर्वी दिलेला हा उपदेश जणू आज UN ने ही घोषवाक्य म्हणून शिरोधार्य मानला आहे.
भारत हा निसर्गाबाबत प्राचीन काळापासूनच जागृत देश
India is a country that has been aware of nature since ancient times
वास्तविक पाहता भारत हा निसर्गाबाबत प्राचीन काळापासूनच जागृत देश आहे. भारतीय संस्कृती जी वेदांवर आधारित आहे. वेदांनीच पर्यावरणाचं म्हणजे नद्या, पर्वत, समुद्र, वनस्पती, प्राणि पशु यांचे महत्त्व खूप सांगितले आहे. म्हणून वेद व वैदिक वाङ्मयात पर्यावरण रक्षणाचे अनेक विषय सापडतात. म्हणूनच भारतीय संस्कार, संस्कृती, पोषाख, साहित्य, सणवार, विधी विधान यातही पर्यावरणाशी असलेल्या जवळकी असल्याच्या अनेक खूणा सापडतात. याचाच परिणाम म्हणून हिंदुस्थान हा कायम सुजलाम व सुफलाम् राहून जैविक विविधतेचे माहेर घर राहिला आहे. लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या भारतीय जनतेचे प्रधान सेवक पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही मन की बात या प्रसिद्ध सरकारी संपर्क कार्यक्रमात अथर्ववेदास पर्यावरणाचे अत्यंत प्रामाणिक वांङ्मय मानले आहे. वैदिक संस्कृतीच्या पर्यावरण रक्षणाच्या संस्कारामुळेच भारत स्वावलंबी राहिला एवढेच नव्हे तर जगालाही रेशिम, मसाले, सूत, लाकूड, रबर, खनिजे वगैरे पुरवीत राहिला आहे.
वसईचे नागरिक हे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर राहतात. भारताच्या पश्चिम किनारपट्टीची निर्मिती व विकास हा भगवान श्रीपरशुरामांनी केला आहे हे सर्व जाणतातच. म्हणूनच भृगुकच्छ (भरूच) ते कन्याकुमारी या भूमीस परशुरामभूमी म्हटले जाते. सह्याद्रीचे पलिकडे असलेला सागर मागे सरकवून भगवान परशुरामांनी ही भूमी संपादन केली. येथे सह्याद्रीचे पर्वत तर पूर्वापार होतेच पण जे नव्हते ते पर्यावरणास आवश्यक सर्व घटक भगवान श्रीपरशुरामांनी तयार केले. भारताच्या पश्चिम किनार पट्टीवर पर्यावरणाची पहिली धोरणात्मक कामगिरी केल्याचे पहिले श्रेय भगवान परशुरामांनाच जाते. पश्चिम किनार पट्टीवरील पर्यावरणाच्या पहिल्या रचनात्मक कार्याचा उल्लेख भगवान परशुरामांच्याच नावे आहे.
या प्रांताच्या पर्यावरणाचा आराखडा आखताना भगवान परशुरामांनी यांत्रिक व तांत्रिक वापर केला. सर्वप्रथम भगवान परशुरामांनी गंगा नदीची एक शाखा या प्रांती भगवान शंकराचे आशीर्वादाने प्रकट केली. यासच वैतरणी असे नामाभिधान झाले. पुढे समुद्रात दडून बसलेला दैत्य पाळपंजर, तुंगार वर असलेला विमलासूर वगैरे दैत्यांचा वध केला. विमलासूर हा अत्यंत असहिष्णू होता, लोभ दाखवून श्रद्धेचे परिवर्तन करण्याचा प्रयत्न करणारा होता. असहिष्णू व एकोपा नाशकाचा वध करणे हे पण पर्यावरण रक्षणासाठी आवश्यक वाटले असेल.
आधी भूमी निर्भय व निर्वैर बनवून भगवान परशुरामांनी पर्यावरण विकासाची मुहूर्तमेढ रोवली. कोणत्याही प्रांताच्या पर्यावरणाचा विकास करताना मनुष्य, पशु, वनस्पती, भूमी, जल, वायु, प्रकाश या सर्वांचा तौलनिक विचार करावा लागतो. विकासक हा स्वतः ज्ञानी, निस्वार्थी, तंत्रज्ञ असला तरच विकास होतो. विकासकाने स्वतः विकासाचे वेळी उपस्थित राहणे आवश्यक असते. हे सर्व गुण भगवान परशुरामांमध्ये होते त्यामुळे त्यांनी या कोंकण प्रांताचा जो पर्यावरण विकास केला आहे तेवढ्या प्रचंड प्रमाणात आजपर्यंत विकास कोणीही केला नाही.
येथे कोंकण क्षेत्री भगवान परशुरामांचे आप्त इष्ट असे कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, सतेज, जमदग्नी, वसिष्ठ या सप्तर्षींचे आगमन झाले. त्यांबरोबरच पराशर, व्यास, शुक, रुरु, भृगु, उतंक, यज्ञकल्पी, अगस्ती, कोहळक, दत्तात्रेय, सनक, सनंदन, सनत्कुमार, सनातन व नारदमुनी असे २२ ज्ञानी ऋषी आपापल्या शिष्यांसमवेत शूर्पारक क्षेत्री आले.
पर्यावरणाचा विकास करताना….
While developing the environment
पर्यावरणाचा विकास करताना नाग, साप, बैल, हरीण वगैरे थोडक्यात सांगायचे तर पशुपती भगवान शंकराची स्थापना विमलेश्वर या नावाने भगवान परशुरामांनी केली. मयूर प्रेमी असलेले कार्तिकस्वामी , हंसावर प्रिती असलेले भगवान ब्रह्मा, गाय-तुळस-प्रजक्त-वैजयंती वनस्पती वगैरेंची आवड असलेले महाविष्णू या सर्वांची स्थापना भगवान परशुरामांनी केली. विशेष म्हणजे आजही सर्व जाती-धर्म व रिलिजनचे कोंकणप्रांताचे भूमिपुत्र सणावाराला विश्वनिर्माता ब्रह्मदेवाची पूजा करताना दिसतात !
या कोंकण भूमीत भगवान परशुरामांनी बाणाने भूमीभेदनाचा तांत्रिक व अभियांत्रिक प्रयोग करून तापी, गोमती, तुंगभद्रा, चंद्रभागा, अरुणा, वरुणा, इंद्रायणी, गोदावरी, भागीरथी, नर्मदा, यमुना, सरस्वती, पाताळगंगा भोगावती, कावेरी, कृष्णा, गोमती, क्षिप्रा, चर्मन्वती, तुंगभद्रा, वेदावती, शरयु, गंडकी, अर्जुनी, पाराशरी, पयष्णी, गंगा, मंदाकिनी तसेच काशी, प्रयाग, गया, स्वर्ग, पाताळ वगैरे चौदा भुवनांचे सार एकवटून दिव्य अशा “विमल तीर्थाची” निर्मिती केली. या स्थानाचे रक्षण करण्यास चार दिशांना अकरा रुद्र स्थापिले, आठ दिशांच्या देवता स्थापल्या. तीर्थेश्वर म्हणून “नारायण चक्रधर” (महाविष्णू) यांची स्थापना केली.
पर्यावरणाचे हे कार्य चालू असल्याने हळूहळू या कोंकण भूमीत टिटवी, मोर, बदक, पोपट, मैना, चक्रवाक, होल, कपोत, चातक, पुनडे, भारद्वाज, रोहिणी, चिमण्या, कोकिळा, हंस येऊ लागले स्थान रम्य झाले. या क्षेत्रात भगवान परशुरामांचे कर्तृत्व व पुण्य पाहून पद्मपुराणाने विमलमाहात्म्यात आज्ञा दिली आहे कि – “न करावे पापाचरण, अभक्ष्या भक्ष्य मद्यपान, असत्य भाषण न करावे. जाळावया पाप पर्वत, निर्माण केले तीर्थ, तेथे आचरता दुष्कृत, वज्रलेप तया घडे.” हा पर्यावरण रक्षणाचा अभूतपूर्व संदेश आजच्या २१ व्या शतकातही तितकाच हितकारी आहे. याच संदेशाचे पालन येथील “देवानां प्रियदर्शी” असलेल्या कोणा एका राजाच्या शिलालेखातही ध्वनीत होतो.
या क्षेत्राच्या संस्कृती व पर्यावरणाच्या विकासासाठी भगवान परशुरामांनी हिमालयातील विकुंभ पर्वतावरून विद्वान व सज्जन अशा १८ ऋषींची कुळांस आमंत्रण देऊन वसण्यासाठी वसई बनविली. यांत शांडिल्य, मुद्गल, गालव, विश्वकेतू, सुमंत, कण्व, वसु, सांवणी, सुनयो, कोलव, दाल्भ्य, द्विलोर्दमा, परावसु, शंखपाळ, भृचंडी, मुकुंद, नंदपाळ, कुर्मलोम अशी १८ कुळे होत. या कुळांनी आधीच्या २२ ऋषीकुळांबरोबर छान वस्ती (वसै) केली.
यांच्या उदरनिर्वाहार्थ व निसर्गरम्य तपोवनार्थ ऋषींच्या वसैभर या कोंकणभूमीत उच्चप्रतीचे पिंपळ, वड, औंदुंबर, अच्युत, डाळिंब, देवदार, बकुळी, जांभुळ, अंजीर, मांदार, आवळे, पारिजात, चिंच, चंदन, शमी, चाफा, सप्तपर्णी, बेल, कदंब, कण्हेर, सेवरी, पळस, फणस, कोकम, अशोक, अगस्ती, अर्जुन, कोविदार, कुडे, कंचन, नारळ, सुपारी या ३२ प्रकारच्या वृक्षांचे मोठ्याप्रमाणात वृक्षारोपण करून याक्षेत्राच्या क्षारांना कमी केले, पाण्याची पातळी सुरक्षित करून पर्यावरणाचा सुंदर समतोल राखला. भगवान परशुरामांनी द्राक्ष, प्रवाल, कनक, नाग, जाई, जुई यांच्या सुंदर सुंदप वेलींचेही मोठ्याप्रमाणात रोपण केले.
भगवान परशुरामांनी कोंकणातील विविध जनपदांमधे १०८ तीर्थांची (तलावांची) निर्मिती केली. त्यांना घाट बांधले. भगवान परशुराम निर्मित या तीर्थाचा आजही उपयोग लोक धार्मिक विधींसाठी, बावखल , तलाव म्हणून करताना दिसतात. भगवान परशुरामांच्या पर्यावरण क्षेत्रातील योजकतेचे वर्णन व तत्संबंधी सुंदर चित्रे “श्रीशंकराचार्य समाधी मंदिर – निर्मळ” च्या विश्वस्तांनी इ.२००८ साली पुनर्मुद्रित केलेल्या रु.५० एवढ्या अत्यल्प किमतीच्या “निर्मळ महात्म्य” या ग्रंथात वाचावयास मिळते. हा ग्रंथ संग्रही ठेवण्यासारखा आहे.
भगवान परशुरामांनी लावलेल्या दर्जेदार जातीच्या या वृक्षफलांची चव आजही विदेशात पसरली आहे. कोंकण प्रांतातील आंबा, रातांबा, फणस, काजू, केळी, नारळ, सुपारी, चाफा तर आजही खूप प्रसिद्ध आहेत. कोंकणातील प्रसिद्ध नागवेल (विड्याची पाने) विदेशातही प्रसिद्ध आहे.
भगवान परशुरामांच्या या वृक्षलागवडीवर आजही कोंकणातील अनेक घरे व गावेच्या गावे श्रीमंत झाली आहेत. पोर्तुगीज येण्या आधी या प्रांताचा GDP १५ होता असेही काही अर्थशास्त्रींचे म्हणणे आहे. भगवान परशुरामांनी घातलेल्या पायंड्याचे भारतीय शासकांनीही पालन केल्यामुळे GDP मधील वृद्धी सहज टिकवता आली होती.
पण विदेशी जुलमी शासक येताच हे चित्र पार बदलून गेले. भूमिपुत्र कंगाल झाले. भाताची पेज मिळणेही कठीण झाले. सगळ्या युरोपीय व अरबी देशाची मध्ययुगीन श्रीमंती ही पश्चिम भारताच्या पर्यावरणालाच लुटून समृद्ध झाली. वास्तविक पाहता भारत हा निसर्गाबाबत प्राचीन काळापासूनच जागृत देश आहे. १००० वर्षांच्या मुसलमानी राजवटीतही भारत निसर्गाबाबत जागृत होता. मुसलमान शासकांनाही बाग बगीचे, लाकडी नक्षीकाम, वनौषधी यांची आवड होती. त्यामुळे मुसलमान शासकांनी युद्धप्रसंगी पर्यावरणाचा काही ठिकाणी नायनाट केला खरा पण एवढी पर्यावरणाची हानी केली नव्हती. पण युरोपीय शासकांनी पर्यावरणाची, भूमिपुत्रांची व वनात राहणार्या निसर्गपुत्र वनवासींची (आदिवासींची) अतोनात हानी केली. व्यापार व आर्थिक हव्यासापोटी वृक्ष तोड, वनस्पतींचे व जनावरांचे संकरीकरण, नद्याचे प्रदूषीकरण वगैरे करून स्वतःचे खजिने भरविले पण देशाच्या पर्यावरणाची प्रचंड हानी केली. स्वातंत्र्योत्तर काळातील बहुतांश राजनेत्यांनीही पर्यावरणाकडे हवे तसे लक्ष न दिल्याने देशातील जंगले घटत गेली, डोंगर तोडले जाऊ लागले, नद्या तलाव प्रदूषित केले जाऊ लागले, समुद्र व वायू दूषित केले गेले. पर्यावरण रक्षणाचे प्रयत्न देशवासीयांनी भरपूर केले पण राजनैतिक निरुत्साहामुळे ते अपुरे पडले. विनोबा भावे, डॉ. एम्, एस्, स्वामिनाथन, चिपको आंदोलन, बैठक परिवाराने केलेले व्यापक सामाजिक वनीकरण लक्षणीय आहे.
भगवान परशुराम जयंती निमित्त…
On the occasion of Lord Parshuram Jayanti
ज्याने कोंकणाचे पर्यावरण निर्माण केले त्यांचा आदर्श व योजना डोळ्यासमोर ठेवणे गरजेचे आहे. कारण त्या दयाळू भगवान परशुरामांची जलयोजना, वृक्षांची निवड वगैरे बाबी आजही लाभदायक सिद्ध होतात. म्हणून सामाजिक वनीकरण करताना त्यांनी निवडलेल्या वृक्ष, वेली व पशुपक्षांची संख्या वाढवणे हे येथील निसर्गाशी व सहजीवनासाठी अधिक उपयुक्त ठरेल. परशुरामांनी निर्माण केलेल्या १०८ तलावांचा शोध घेऊन त्यांचे संरक्षण व संवर्धन करावे लागेल. तलावांना त्यांच्या सरकारी दरबारी असलेल्या नामांच्या पाट्या लावल्या पाहिजेत.
याची सुरुवात म्हणून सर्वधर्म स्नेहभाव राखणार्या स्थानिक स्वराज्य संस्थेने जसे बुद्ध पुतळे बांधून उद्याने बनवली, जसे रस्ता रुंदीकरणात रिलिजस सिम्बल्सना वाचवून मागून पुढून रस्ते नेले, त्याच धर्तीवर १००-२०० एकर परिसरांत एक भव्य “आद्य पर्यावरणविद् भगवान परशुराम वन” तयार करावे. निर्मळ महात्म्यानुसार परशुरामांनी लावलेल्या ३२ जातीच्या वृक्षांची व ६ जातीच्या वेलींची मोठ्या प्रमाणावर लागवड करून १५ जातींच्या पक्षांचे आश्रयस्थान विकसित करावे. हे करण्यासाठी Connecting People To Nature हे या वर्षीच्या पर्यावरण दिनाच्या बोधवाक्याला सार्थक करण्यासाठी विविध युवा व सामाजिक संगठनांना आमंत्रित करावे. प्राचीन शेती वाडी करण्याच्या पद्धतींचे प्रशिक्षण केंद्र काढावे. एवढ्या दोन-चार माफक अपेक्षा जाणकार जनतेच्या आहेत.
२०१४ च्या पर्यावरण दिनाच्या उत्तर संध्येला एक भयानक बातमी DNA पेपरात आली होती की वसईच्या समुद्र किनारी १५०० झाडांना जाळण्यात आले तर ४०० झाडांना विष दिले गेले. हे असे कृत्य दिर्घकालीन विकासास बाधक बनतात. हे पुन्हा कधीही होऊ न द्वयावे. वसईत ठिकठिकाणचे हरित पट्टे, देऊळ, शाळा, तलाव, डोंगर यांच्या जागांवर वृक्षारोपण व संवर्धन करण्यासाठी सामाजिक संस्थांना आमंत्रण दिले तर एक फार मोठे कार्य उभे राहील. वसईत शेकडो संघटना व हजारो कार्यकर्ते आहेत. सर्वांमध्ये उत्साह ही आहे. नावाची हाव किंवा जात-धर्म-रिलीजनच्या सीमासोडून एकोप्याने नांदणार्या निसर्गप्रेमी वसईकरांना सरकारने योग्य ती संधी व साधने उपलब्ध करून द्यावी म्हणजे पुन्हा एकदा आमची वसईचे लोक स्वावलंबी होतील, श्रीमंत व सुखी होतील. या सद्भावनेने भगवान परशुराम जयंती निमित्त भारताच्या पश्चिम किनारपट्टीला सुंदर पर्यावरण देणार्या दूरदर्शी भगवान परशुरामांना त्यांच्या या भूमीवर केलेल्या असंख्य उपकारांसाठी वन्दन करतो.
सौजन्य – वेदमूर्ती धनंजयशास्त्री वैद्य
हे सुद्धा वाचा…