महाविकास आघाडीतर्फे बाळ माने यांनी शक्तीप्रदर्शन करत दाखल केला उमेदवारी अर्ज

रत्नागिरी : महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे(Uddhav Balasaheb Thackeray) शिवसेनेचे सुरेंद्र तथा बाळ माने यांनी आज शक्तीप्रदर्शन करत रत्नागिरी(Ratnagiri) विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरला. तत्पूर्वी शिवसेना कार्यालयाबाहेर झालेल्या मेळाव्याला हजारो शिवसैनिकांसह महाविकास आघाडीतील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) व सहकारी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. निवडणूक अर्ज भरण्यापूर्वी आज सकाळी बाळ माने व सौ. माधवी माने आणि मुलगा मिहिर माने, विराज माने यांनी ग्रामदैवत श्री देव भैरी आणि अन्य मंदिरांमध्ये आशीर्वाद घेतले. त्यानंतर ते आमदार राजन साळवी यांच्या संपर्क कार्यालयात आले व तिथेही आशीर्वाद घेतले.

रत्नागिरीकरांचा २० वर्षांचा वनवास संपवणार

बाळ माने म्हणाले की, रत्नागिरीकरांचा २० वर्षांचा वनवास या निवडणुकीत महाविकास आघाडी संपवणार आहे. मी सोशल मीडियावरून रत्नागिरीकरांचा कौल घेतला. ७० टक्के प्रतिक्रिया उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश करण्याच्या आल्या. त्यामुळे जनतेला बदल हवा आहे, हे सिद्ध होतेय. मी मतदारसंघातील लाखो मतदारांना नमन करतो. गेल्या ५० वर्षात अशा प्रकारे जनतेतून कोणी प्रतिक्रिया घेतल्या नव्हत्या. २३ ला राजकीय विजयाचा गुलाल उधळू. आपल्याला ६० हजार कुटुंबात मशाल पोहोचवायची आहे. जनता परिवर्तन करायला तयार आहोत. माझ्या उमेदवारीने माझ्या मित्रावर अन्याय झाला असेल तर मी माफी मागतो. परंतु पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेला निर्णय महत्वाचा असून तो सर्वांनी मान्य केला पाहिजे.
१९९९ साली मी पहिली निवडणूक लढवली आणि त्यावेळी युती असताना जनतेने मला निवडून दिले होते. त्यानंतर मागील वीस वर्षे रत्नागिरी वनवासात गेली त्याचा फटाका आपल्याला सर्वांना बसला. आता आपण पुन्हा मशाल हे चिन्ह घराघरात पोचवून पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरीच्या विधानसभेवर भगवा फडकवूयात, असे आवाहन बाळ माने यांनी केले.
उदय सामंतांनी पवार, ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी सामंत बंधूंना इशारा देत यावेळी राजापूरमधून विजयाचा चौकार मारणार असल्याचे ठामपणे सांगितले. कोकण म्हणजे शिवसेना त्यामुळे आज आपले लाडके नेते युतीचे माजी आमदार बाळासाहेब माने यांनी प्रचंड मतांनी विजयी करायचे आहे. खऱ्या शिवसेनेचे वर्चस्व आहे, हे सिद्ध करायचे आहे. युतीचे आमदार असताना त्यांनी उंच भरारी मारली, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष असो वा सामाजिक बांधिलकी या सर्वामध्ये त्यांनी योगदान दिले आहे. सामंतांचा इतिहास काय तर शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला, नंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला. पक्षप्रमुखांनी त्यांना म्हाडाचे अध्यक्षपद दिले व त्यावेळी त्यांनी माया गोळा केली व या संपत्तीचा दुरुपयोग करत आहेत. उद्धव ठाकरे आजारी असताना शिंदे भाजपसोबत गेले. अशा स्थितीत उद्धवसाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसल्याने सर्व मतदारांच्या मनात चीड आहे. त्यामुळे या निवडणुकीत सामंतांचा निकाल लावायचाआहे. राजापूरमध्ये आपल्या बंधुला पाठवले तर आमदार ते होतील, असेही त्यांना स्वप्न पडले आहे. पण राजापूर हा सेनेचा बालेकिल्ला असून त्या मातीत त्यांना गाडायचे आहे, असे ठणकावून सांगितले.
या वेळी राजापूरचे आमदार राजन साळवी, शिवसेना सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, जिल्हा समन्वयक संजय पुनस्कर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नीलेश भोसले, तालुकाध्यक्ष राजन सुर्वे, बशीर मुर्तझा, बारक्याशेठ बने, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश शहा, कॉंग्रेसचे नेते अनिरुद्ध जाधव, हारीस शेखासन, संजय साळवी, वेदा फडके, उपजिल्हाप्रमुख शेखर घोसाळे, युवा सेना तालुकाप्रमुख प्रसाद सावंत, महेंद्र झापडेकर, दीपक सुर्वे, मंगेश साळवी, मनिषा बामणे, बिपीन शिवलकर यांच्यासमवेत अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रमेश शहा म्हणाले की, ही लढाई ओरिजिनल व डुप्लिकेट अशी आहे. गेली २० वर्षे डुप्लिकेटला निवडून दिले. आज रत्नागिरी पालिकेच्या शाळांची दयनीय स्थिती आहे, त्यामुळे खासगी शाळेत मुलांना पाठवावे लागते तिथे भरमसाठ फी भरणे पालकांना शक्य नाही. नुसते रस्ते, व हवेतले पूल बांधून, इमारती बांधणे म्हणजे विकास नव्हे. महागाईमुळे जनता त्रस्त आहे, त्यामुळे आपण महाविकास आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे.
शिवसेनेचे मंगेश साळवी यांनी सांगितले की, आताची निवडणूक गद्दार विरुद्ध खुद्दार अशी आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचण्यासाठी कारस्थान केले. त्या गद्दारांना आता खाली खेचूया. आता भगवी लाट आहे. ऐन दिवाळीच्या मोसमात 95 रुपयांची तेल पिशवी आता 165 रूपये झाली आहे. गेल्या वीस वर्षांत किती तरुणांना नोकऱ्या दिल्या हे मंत्र्यांनी सांगावे. अर्ज भरण्यासाठी, मुख्यमंत्र्यांचा दौरा असला की बचत गटांच्या महिलांना बोलावून न्यावे लागते, अशी विरोधकांची स्थिती झाली आहे.
शिवसेना तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सर्वाधिक खासदार विजयी झाले. तोच कित्ता विधानसभेत गिरवायचा आहे. त्यामुळेच आपल्या कुटुंबातला, आपला घरातील खरा उमेदवार म्हणजे बाळासाहेब माने यांना विजयी करायचे आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके म्हणाले, आता प्रचारासाठी वेळ कमी आहे. त्यामुळे सर्वांनी आपापल्या भागात दिलेल्या जबाबदारीप्रमाणे प्रामाणिकपणे काम करा आणि बाळ माने यांना प्रचंड मतांनी विजयी करा. बाळ माने आमदार होणारच ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे.
शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक म्हणाले की, १० वर्षांपूर्वी युतीतर्फे आम्ही बाळ माने यांचा उमेदवारी अर्ज भरला. दुर्दैवाने युती तुटली व नंतर पुन्हा अर्ज भरण्यासाठी जायला लागले होते. परंतु आता मशालीची धग विरोधकांच्या बुडाला लागणार आहे. रत्नागिरीच्या विकासासाठी मशाल विजयी झाली पाहिजे. तीन वेळा पराजीत होऊनही गेली 20 वर्षे विरोधात राहून जनतेची सेवा करणे, हा बाळ माने यांनी राजकारणात आदर्श निर्माण केला आहे. त्यांची जनतेची नाळ जुळली आहे. आपले व त्यांचे जवळचे नाते आहे. जशी दुधात साखर विरघळते त्याप्रमाणेच बाळासाहेब शिवसेनेशी समरस झाले आहेत. युतीत आमदार असताना बाळासाहेबांनी कार्यकर्त्यांना न्याय दिला, दुजाभाव केला नाही. आता तर ते आपलेच आहेत.
या वेळी आठवडा बाजार ते कलेक्टर ऑफिस या दरम्यान भव्य अशी रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये शिवसेना (उबाठा), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यासह असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाली. या वेळी बाळ माने यांनी एसटी स्टॅंड ते प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत रिक्षेमधून प्रवास केला. या वेळी अनेक रिक्षाचालक, मालकांनी बाळ माने यांना पाठिंबा दिला.
Social Media