अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे ते दिल्ली यादरम्यान महादजी शिंदे यांच्या नावाने विशेष रेल्वे सेवा

पुणे : दिल्ली(Delhi) येथे होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या(Akhil Bharatiya Sahitya Sammelan) पार्श्वभूमीवर या संमेलनात सहभागी होणाऱ्या साहित्य रसिकांसाठी पुणे ते दिल्ली यादरम्यान महादजी शिंदे एक्सप्रेस(Mahadji Shinde Express) ही विशेष रेल्वे सेवा सुरु करण्यात येणार आहे, ही विशेष रेल्वे 19 फेब्रुवारी रोजी दुपारी पुण्यातून निघणार असून 20 फेब्रुवारी रोजी रात्री दिल्ली येथे पोहोचणार आहे, अशी माहिती मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी यांनी दिली आहे.

दिल्ली येथे 21 ते 23 फेब्रुवारी 2025 या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज(Chhatrapati Shivaji Maharaj) साहित्यनगरी, ताल कटोरा स्टेडियम येथे हे संमेलन होत आहे. या साहित्य समेंलनात सहभागी होणाऱ्या साहित्य रसिकांकरीता सुरु करण्यात येणाऱ्या या रेल्वेच्या डब्यांना गडकिल्यांची नावे देण्यात येणार आहे.

98 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे ते दिल्ली रेल्वे प्रवासादरम्यान फिरत्या चाकांवर प्रवासी साहित्य संमेलन या संकल्पनेतून ‘मराठी साहित्ययात्री संमेलन’ आयोजित करण्यात येणार आहे. मुख्य संमेलनानिमित्त रेल्वेत होणारे हे मराठीतील पहिलेच आणि जगातील सर्वात मोठे आणि दिर्घ साहित्य संमेलन असणार आहे.

पुणे-दिल्ली प्रवासादरम्यान रंगणार ‘मराठी साहित्ययात्री संमेलन’

साहित्यरसिकांना पुण्यातून दिल्लीला घेऊन जाणाऱ्या रेल्वेला महान सेनानी महादजी शिंदे यांचे नाव देण्यात येणार असून या विशेष रेल्वेला 16 डब्बे असणार असून डब्याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांची नावे दिली जाणार आहेत. राज्याचे मराठी भाषामंत्री उदय सामंत या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असून तेही ‘मराठी साहित्ययात्री संमेलनात’सहभागी होत आहेत. ते या रेल्वेद्वारे प्रवास करणार करणार आहेत आणि साहित्यिक, कलावंतांशी ते संवाद साधणार आहेत. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखिका डॉ. संगीता बर्वे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. प्रवासा दरम्यान प्रत्येक बोगीत विविध साहित्यिक-सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जाणार आहेत.

युवा साहित्यिक व कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने ‘मराठी साहित्ययात्री संमेलन भरविण्यात येत आहे.‘मराठी साहित्ययात्री संमेलनात’महाराष्ट्रातील वेगवेगळ्या गावा-गावांमधून साहित्यिक, युवक, लोककलाकार, स्टँडअप कॉमेडियन्स, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स तसेच शाहिर व भजनी मंडळांचा मोठ्या संख्येने सहभागी होणर आहे. मोठ्या प्रमाणात तरुणांच्या सहभागामुळे हे संमेलन तरुणाईचे संमेलन ठरणार आहे.

19 रोजी असलेल्या शिवजयंतीचे औचित्य साधून सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या महाराष्ट्र गीताच्या सामूहिक गायनानंतर पुण्यातून रेल्वे निघणार आहे. तत्पूर्वी पुस्तक दिंडीही काढली जाणार आहे. याच रेल्वे प्रवासात १ हजार २०० पेक्षा अधिक साहित्यिक येणार असून जळगाव आणि ग्वाल्हेर येथे ही विशेष रेल्वे पोहोचल्यानंतर ग्वाल्हेर येथील स्थानिक नागरिक भव्य स्वागत करणार आहेत. रेल्वे 20 फेब्रुवारी रोजी दिल्लीत पोहोचणार असून दिल्ली स्थानकावर पोहोचल्यानंतर पसायदानाने ‘मराठी साहित्ययात्री संमेलना’ची व पहिल्या टप्प्यातील प्रवासाची सांगता होणार आहे. या वेळी दिल्लीतील मराठीजन मोठ्या संख्येने स्वागतासाठी उपस्थित राहणार आहेत. परतीच्या प्रवासात देखील हे संमेलन रंगणार असून 25 फेब्रुवारी रोजी पुणे रेल्वे स्थानकावर या संमेलनाची समारोप होणार आहे.

या अभिनव उपक्रमाची संकल्पना सरहद, पुणेचे अध्यक्ष संजय नहार यांची आहे. संमेलनाच्या निमित्ताने स्वतंत्र संयोजन समितीची स्थापना करण्यात आली आहे. रावण द आंत्रप्रिन्युअर या पुस्तकांचे लेखक शरद तांदळे यांची संमेलनाध्यक्ष तर वंदेमातरम् संघटनेचे अध्यक्ष व व्हायरल माणुसकी या पुस्तकाचे लेखक वैभव वाघ हे संमेलनाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. डॉ. शरद गोरे (कार्याध्यक्ष), सचिन जामगे (कार्यवाह), ॲड. अनिश पाडेकर, सोमनाथ चोथे, गणेश बेंद्रे (मुख्य समन्वयक), अक्षय बिक्कड, सागर काकडे (निमंत्रक) यांचा कार्यकारिणीत समावेश आहे, अशी माहिती डॉ. कुलकर्णी यांनी दिली आहे.

Social Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *