६६व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातील लाखों भीम अनुयायांचा चैत्यभूमीवर उसळला जनसागर!

मुंबई : कोरोना संकटामुळे मागील दोन वर्षांपासून निर्बंध होते.यावर्षी कोणतेही निर्बंध नसल्याने १ तारखे नंतर लाखो अनुयायांचे चैत्यभूमीवर आगमन झाले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज ६ डिसेंबर रोजी देशाच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत दाखल झालेल्या लाखों भीम अनुयायांनी चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी प्रचंड गर्दी केली. अबालवृद्धांपासून सर्व वयोगटांतील अनुयायांनी चैत्यभूमीवर रांगा लावून डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण केली. यावेळी मुंबई पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळातील अन्य मंत्री शासकीय अधिकारी , विरोधीपक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जयंत पाटील, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आणि अन्य कार्यकर्ते यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

चैत्यभूमीच्या दिशेने येणारे अनुयायांचे जथ्थेच्या जथ्थे व त्यांना शिस्तीने सोडणारे स्वयंसेवक, स्वयंसेवी संस्था, संघटना, चळवळीतील कार्यकर्ते, दादर रेल्वे स्थानक ते चैत्यभूमी-शिवाजी पार्कच्या दिशेने अत्यंत शिस्तीने चालणारे लाखो भीमसैनिक पोलिसांना सहकार्य करताना दिसत होते. यावर्षी वाढत्या गर्दीचा अंदाज घेऊन शिवाजी पार्क मैदानात पालिकेतर्फे अनुयायांसाठी तात्पुरता निवारा, शामियाना उभारण्यात आले होते. देशभरातून आलेल्या आंबेडकरी अनुयायांनी तेथे आश्रय घेतला होता. या ठिकाणी पालिकेतर्फे आवश्यक त्या सर्व नागरी सेवा-सुविधा तसेच भोजनाची व्यवस्था उपलब्ध करण्यात आली होती. आंबेडकरी व बिगर आंबेडकरी सामाजिक संघटना ,संस्था यांनी मोफत अन्नदान , फळवाटप, चहा- बिस्किटे, पाणी वाटप केल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले. अभिवादनासाठी जवळपास पाच ते सहा तास रांगेने उभ्या असणाऱ्या अनुयायांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. वाहतुकीसोबतच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. पालिका प्रशासनाने दादर रेल्वे स्थानक ते चैत्यभूमीपर्यंतचा परिसर फेरीवालामुक्त केल्याने रस्त्यांवर  भिम अनुयायीना चालताना मोकळा श्वास घेता आला.  चैत्यभूमी परिसरात प्रबोधनपर मार्गदर्शन शिबिरे, क्रांतीगीतांच्या ध्वनिफिती, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांच्या साहित्य, महामानवाच्या प्रतीमा व पुतळे खरेदी करण्यासाठी स्टॅालवर गर्दी उसळली आहे.

शिवाजी पार्क मैदान व इतरत्र सुमारे २०० ते ३०० पुस्तकांचे स्टॉल लावण्यात आले आहेत. राज्याच्या विविध भागांतून नामवंत प्रकाशन संस्थांनी यात सहभाग घेतला आहे. आंबेडकर, बुद्ध, यांसह पुरोगामी विचारधारेची लाखो पुस्तके येथे उपलब्ध होते.परंतु दहा बाय दहाच्या स्टॉलचे दोन दिवसाचे भाडे पाच हजार रुपये असल्याने काही पुस्तक विक्रेत्यांनी नाराजी व्यक्त केली. सायंकाळनंतर मध्य रेल्वेने दादर आणि कुर्ला तसेच छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून विशेष लोकल तसेच नागपूर मुंबई अश्या रेल्वे फे-यांची सुविधा मध्यरात्री नंतर उशीरा पर्यंत उपलब्ध केली आहे.

Social Media