२९ तारखेच्या आदल्या रात्रीपर्यंत ‘हा खेळ सावल्यांचा किंवा बाहुल्यांचा’ सुरुच राहणार?

विधानसभा निवडणूक २०२४(Assembly Elections 2024)मध्ये केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसाठी सत्तासुंदरीला प्राप्त करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठीच त्यांना महाराष्ट्रातील निवडणूक आपल्या नियंत्रणात ठेवणेही आवश्यक वाटत असावे. मग ते सरकारी यंत्रणाच्या माध्यमातून तर आहेच, पण राजकीय दृष्टीने देखील निवडणूक आपल्या हातात ठेवायचा आटापिटा करताना सहकारी मित्रपक्षांना कमीत-कमी जागा द्यायच्या, त्यांच्याकडच्या जिंकणा-या जागांची अदलाबदल करायची, त्यांना सोडलेल्या जागांवर आपल्याकडच्या लोकांची वर्णी लावायची, या नंतरही या मित्रपक्षांच्या बंडखोरांवर काबू मिळवायचा. असा हा फॉर्म्युला यावेळी काही चालताना दिसत नाही. मग त्यासाठी शिंदे फडणवीस पवारांची  दिल्लीत गुरूवारी साडे तीन तास ‘राजकीय ट्यूशन’ झाली म्हणे!

जाणकारांच्या मते याची कारणेही तशीच आहेत. निवडणूक झाल्यानंतर २०१९मध्ये उध्दव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी जशी भाजपकडे पाठ फिरवली होती आणि शरद पवारांसोबत सत्तास्थापन केली तसाच प्रकार या भाजपच्या मागच्या दोन वर्षातील या मित्रांचा होणार नाही कश्यावरून? कारण २०२९ला भाजपने आधीच शत-प्रतिशतची घोषणा करून टाकली आहे! अमित शहा (Amit Shah)तीन दिवस महाराष्ट्राच्या दौ-यात होते तेंव्हाच त्यांनी २०२९ला भाजप स्वबळावर महाराष्ट्र काबीज करणार असल्याचे लक्ष्य जाहीर केले आहे. त्यामुळे या सोबतच्या मित्राना आता राजकीयदृष्ट्या ‘शोधू कुठे किनारा’ करायची गरज आहेच! शरद पवार यांच्या राजकीय वटवृक्षांच्या पारंब्या सध्या राज्यभर पसरल्या असताना त्यांना त्यांवर लोंबकाळणे निवडणूकीनंतर सहज शक्य होण्याची शक्यता आहे. नेमके चाणाक्ष भाजपच्या चाणक्यांनी हे हेरले आहे. त्यामुळे त्यांनी बुधवारी महाराष्ट्राच्या नेत्यांना घाईने दिल्लीत पाचारण केले, मग परेड करत दोन्ही उपमुख्यमंत्री बुधवारी रात्रीच दिल्लीला गेले म्हणे. पण मुख्यमंत्री शिंदे सोबत नव्हते! ते गुवाहाटी देवदर्शन ते गोवा, व्हाया कोकणांत राणेंच्या प्रवेशात व्यस्त मुख्यमंत्र्याना दिल्लीला पोहोचेपर्यंत गुरूवार उजाडला. त्यानंतर भाजपच्या वरिष्ठांकडून महाराष्ट्राच्या राजकारणात तीनही पक्षांचा जाहिरनामा एकच राहिल, तीनही पक्षांचा प्रचार एकत्रच होणार आहे आणि त्यासाठी तिघांनी एकत्रच काम करायचे आहे अशी बैठकीची सुरूवात झाली म्हणे! हेही वाचा -तीन तिघाडा काम बिघाडा : युती-आघाडीत भाजपचेच नुकसान!?

बैठकीत मग जागावाटपच्या रडगाण्यावर चर्चा आली त्यावेळी काही जागांसाठी भाजपला दोन्ही मित्रपक्षांच्या जागा अदलाबदल करण्याचा विषय झाला, त्यावर सहमती घेतानाच काही जागा मित्रांना वाढवून देण्याबाबत तत्वत: सहमती असल्याचे सांगण्यात आले म्हणे! पण साडे तीन तासांच्या या बैठकीत महत्वाच्या सुमारे २७ ते ३० जागांची चर्चा अनुत्तरीतच राहिली आहे. या जागांचा तिढा हा २९ तारखेपर्यत राहणार आहे, म्हणजे लोकसभेला जसे झाले तसाच हा प्रकार विधानसभा निवडणूकीचे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत राहणार आहे. याचे सर्वात मोठे कारण या साऱ्या जागांवर भाजपचे लक्ष आहे, या जागा जर आधी निश्चित केल्या तर दोन्ही मित्रपक्षांकडून बंडखोर मैदानात येण्याची किंवा इकडचे उमेदवार तिकडे पाठवून हेराफेरी केली जाण्याची शक्यता आहे.!हेही वाचा –सागर किनारे दिल ये पुकारे, ‘तू जो नहीं तो मेरा कोई नहीं’ ! बंडोबांची फडणवीसांना आर्त हाक!

या प्रकारावर दिल्लीश्वर प्रचंड नाराज आहेत, खरेतर दयाळूपणे काहीच काटछाट न करता महाराष्ट्राच्या भाजपच्या ९९ जागांच्या पहिल्या यादीत सुमारे ७५ नावे जुनीच होती, त्यात फारसे कुणाला वगळण्यात आले नव्हते, मात्र तरी सुध्दा भाजप नेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्या सागर बंगल्यावर दोन दिवस असंतुष्टांच्या प्रचंड लाटा धडकल्याचे वृत्त साऱ्या ‘गोदी’ मिडियाने दाखवले! दिल्लीश्वराने ठरवलेल्या जागांवर भाजपमध्ये अशी प्रथा नाही की इतक्या आकांताने कार्यकर्त्यांनी स्थानिक नेत्यांकडे त्यांच्या तिव्र प्रतिक्रिया द्याव्या. ‘पार्टी विथ डिफरन्स’ मध्ये ‘पार्टी विथ डिफरन्सेस’ असे होत नसते! भाजपच्या दिल्लीच्या नेतृत्वाला हे खटकणारे होते!

इतकेच नाही, भाजपच्या या स्वत:च्या बंडखोरांकडून मग अजित पवार (Ajit Pawar)आणि शिंदेच्या पक्षांकडून उमेदवाऱ्या मिळवण्याचा उतारा शोधून काढण्यात आला, हे देखील दिल्लीश्वरांना खटकले आहे, असे जाणकार सूत्रांचे म्हणणे आहे. कारण ‘इकडचे तिकडे’ करायचा असा कोणताही अधिकारी तीनही पक्षाच्या महाराष्ट्रातील ‘सो कॉल्ड’ प्रमुखांना नाही म्हणे!  तरीही दिल्लीच्या परवानगी शिवाय राणेंच्या पूत्राला शिंदेकडे प्रवेश? किंवा बडोलेंसारखा भाजपचा माजी मंत्री उमेदवार शिंदेच्या पक्षांत? किंवा अजित पवारांचा मुंबईचा अध्यक्ष ठाकरेंच्या संपर्कात? नतंर राजीनामा देवून अपक्षच रिंगणात? बुलडाण्यात शिंदेच्या उमेदवारासमोर सोनावणे नावांच्या बाईनी सरळ आव्हान देत बंडखोरी केली. इतकेच नव्हे खुद्द मुख्यमंत्र्याच्या ठाणे जिल्ह्यात भाजपच्या अधिकृत उमेदवार संजय केळकरांसमोर भाजपचे मिलींद पाटणकर अर्ज भरण्यासाठी पुढे येतात, शिंदेच्या निकटवर्तुळांतील मिनाक्षी शिंदे, संजय भोईर सरळपणे केळकरांसमोर महायुतीच्या उमेदवारासमोर बंडखोर म्हणून अर्ज भरण्याच्या बातम्या चालविल्या जातात? गणेश नाईकांना भाजपने सामावून घेतले तरिही त्यांचे पूत्र सरळपणे सोबत पक्षाच्या नगरसेवकांना घेवून शरद पवारांच्या पक्षात जावून निवडणूक लढविण्याची घोषणा करतात? अशी किमान तीन डझन उदाहरणे दिल्लीश्वरांकडे पोचली आहेत म्हणे. हे सरळपणे दिल्लीश्वरांचा अवमान, आव्हानच नव्हे काय? मागणाऱ्यांना आवड निवड नसते ( beggars cant be choosers ) असे काही सूचवायचे आहे का दिल्लीश्वरांना.?

त्यांनी ‘आमच्या आज्ञेशिवाय पाऊलही टाकायचा विचार करायचा नाही’ अशीच ही तंबी आहे म्हणे! त्यामुळे हवे तर काही जागाची अदलाबदल करून देवू, काही जागा जास्त हव्या तरी देवू असे सांगत ३० जागांचा निर्णय आपल्या हाती ठेवत दिल्लीश्वरांनी तीनही प्रमुखांची पाठवणी करत अन्य जागांच्या याद्या बाहेर काढण्याची आज्ञा दिली त्यात बंडखोरी होता कामा नये असेही बजावले आहे, असे जाणकारांच्या गोटातून बोलले जात आहे. त्यानंतर शेवटच्या तीस जागांचा तिढा मनासारखा होण्याची शक्यता आहे म्हणे! म्हणजे २९ तारखेच्या आदल्या रात्रीपर्यंत ‘हा खेळ सावल्यांचा किंवा बाहुल्यांचा’ सुरुच राहणार आहे? बंडखोरी केलेल्यांना आता महायुतीचे नेते कसे शांत करतात/ किंवा मग दिल्लीच्या पध्दतीने ‘ये दिल है मानता ही नही’ म्हणणा-यांना आपला ठेवणीतला साम-दाम-दंड भेद चाणक्य नितीचा कुंचला फिरवून सांगावे लागते का? ते लवकरच समोर येणार आहे, त्याचा ट्रेलर अलिकडे बापूंच्या (नसलेल्या) सांगोला रोख रक्कम प्रकरणातून समोर आला आहे. किंवा गडाखांच्या शंकररावांना उबाठाची उमेदवारी मिळताच, कारखान्याला नोटीसाही मिळाल्या तसा ही प्रकार होण्याची दाट शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत. पाहू या काय काय कसे होते?, बंडोबा थंड होतात की शरद पवांराकडून सुरू झालेल्या ‘अशी ही पळवापळवी’ सिनेमाच्या भाग दोन चा नवा अंक समोर येतो? ते समजेलच!

किशोर आपटे

(लेखक व राजकीय विश्लेषक)

संख्याबळ आणि पाठबळ त्यासाठीच ही पळापळ!

उमेदवारीच्या वादात नातेवाईक, परिवार वाद आणि सगेसोयरे

Social Media