मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra-Assembly-elections, )नामांकन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत मविआ आणि महायुतीच्या काही जागांवर अजूनही सहमती झाली नाही. महायुती आणि महाविकास आघाडीत या जागांचा तिढा आहे की बंडखोर उभे राहू नयेत म्हणून घोळ सुरु आहेत असा प्रश्न आता विचारला जात आहे.
महायुती आणि महाविकास आघाडीत अनेक बैठकांचे सत्र झाल्यानंतर जागा वाटपावर सहमती झाली. तर काही जागांवर बैठकांच्या फेऱ्या सुरू आहेत. जागा वाटपात महाविकास आघाडीत मुंबई ते दिल्लीपर्यंत खलबतं झाली. तर महायुतीत तोडगा काढण्यासाठी देखील दिल्लीत मॅरेथॉन बैठकी घेण्यात आल्या. त्यात अनेक जागांवर सहमती झाली. पण राज्यात महाविकास आणि महायुतीने राज्यातील ३०-३५ जागांवर उमेदवारी जाहीर केली नसल्याचे समोर आले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील ३६ मतदारसंघ असे, जिथे महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांनी अद्याप आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. महायुतीत ११ जागांवर अद्यापही तोडगा निघाला नाही. मविआच्या जागा वाटपात ३६ पैकी विदर्भातील १३ मतदारसंघांचा समावेश असून, त्यात अकोला पश्चिम, कारंजा, मेळघाट, उमरेड, गडचिरोली, चंद्रपूर, वरोरा, अर्णी या ठिकाणांचा समावेश आहे.
याशिवाय मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, सोलापूर या ठिकाणी देखील काही जागा उमेदवारीविना राहिल्या आहेत. यापैकी १५ मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत, ज्यात प्रामुख्याने अकोट, गडचिरोली, बोरीवली, पेन, मालशिरस, आणि पंढरपूर या जागांचा समावेश आहे. दुसरीकडे, महायुतीचे ११ उमेदवार आणि महाविकास आघाडीचे ३० उमेदवार अजूनही जाहीर व्हायचे आहेत.
महायुतीत २८८ जागांपैकी २७८ जागांवर सहमती झाली आहे. तर महा आघाडी ने तीन पक्षाना २७० तर १८ जागा मित्रपक्षांना सोडल्याचे म्हटले आहे. मात्र जागा कोणत्या कुणाकडे हे गुलदस्त्यात राहिले आहे
महायुतीची गुरूवारी दिल्ली दरबारी तीनही पक्षांची बैठक झाली. त्यात अनेक जागांवर तोडगा निघाला. पण मुंबईतील काही जागांवरील पेच कायम आहे. वरळी, शिवडी, चेंबूर, बोरिवली, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर पूर्व, शिवाजीनगर मानखुर्द, अंधेरी पूर्व, वर्सोवा, मुंबादेवी, कलिना आणि धारावी या जागांवर काथ्याकूट होण्याची शक्यता आहे. वर्षा बंगल्यावर शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून महत्वाची चर्चा करणार असल्याची माहिती समोर येत आहे. शनिवार रात्री किंवा रविवार सकाळी महायुतीची अंतिम यादी जाहीर होणार असल्याची माहिती समोर आहे.