विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवार निश्चिती आणि यादया जाहीर करणे सुरू असताना प्रामुख्याने महायुती आणि महाआघाडी या दोन राजकीय आघाड्यांमध्ये लढत होत आहे. मात्र या दोन्ही आघाड्यांमध्येही जी राजकीय समीकरणे किंवा राजकीय पक्षांची कडबोळी सत्ताकांक्षेने एकत्र आली आहेत, त्यांच्यात सारे काही अलबेल असल्याचे दिसत नाही.
त्याचे कारणही तसेच आहे, कारण महायुती मध्ये तर केवळ ‘सत्तातुराणां न भयं न लज्जा’ याच वचनाप्रमाणे दोन पक्षांचे फुटीरगट खांद्यावर घेवून भाजपाकडून भले स्वत:चा पक्ष विचारसरणी आणि राजकीय इतिहास काहीही असला तरी त्याची तमा न बाळगता कारभार हाकला गेला. त्याचा परिणाम आता असा झाला आहे की अंगावर वाढवलेल्या या बांडगुळांना आता बाजुला करताना अवघड झाले आहे. स्वपक्षाच्या निष्ठावंताना संधी द्यावी की सत्तेसाठी पक्षात पाहुणे आलेल्यांच्या नादुऱ्या काढत बसावे याचा काही केल्या निकाल या पक्षांच्या नेत्यांना घेता येत नाही. त्यामुळे कितीही जागावाटप सुरळीत झाल्याचे सांगण्यात आले तरी नको त्यांच्या नाही त्या महत्वाकांक्षा जाग्या केल्याने आता इच्छुकांची भाऊगर्दी डोक्यावर बसली आहे. तिला आवरणे कठीण झाले आहे. भाजपने पूर्वीच्याच उमेदवारांना अनेक कारणाने उमेदवारी देणे चुकीचे असले तरी ती देवून टाकली आहे. त्यामुळे नव्याने आस लावून बसलेल्यांची नाराजी बंडखोरी सुरू झाली आहे. महायुती म्हणवल्या जाणाऱ्या तीन घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांपासून अगदी तळागाळापर्यंतच्या कार्यकर्त्यामध्ये एकजुट दिसत नाही.
मग एकमेकांच्या उमेदवारांना यांची मते कशी हस्तांतरीत (ट्रान्सफर) होणार? जे लोकसभा निवडणूकीत दसले आहे, राष्ट्रवादीच्या उमेदवारांना भाजपकडून आणि भाजपला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मते मिळणे अवघड आहे हे उघड गुपीत आहेच. पण वर्षानुवर्ष सोबत राहिलेल्या शिवसेनेतून आलेल्या शिंदे यांच्या पक्षाच्या उमेदवारांकडेही आता भाजपकडून असहकाराच्या भावनेतून पाहिले जात आहे. मुख्यमंत्री पद यावेळी भाजपला हवेच आहे. मागील काळात असा डर्टी पॉलीटिक्सचा कलंक लावून घेतला तरी भाजपला सत्ता काही मिळू शकली नाही अडिच वर्ष शिवसेनेला (ठाकरेंच्या) न देण्याच्या हट्टापयी फडणवीसांना पाच वर्ष शिवसेना दोन्ही सहन कराव्या लागल्या आहेत आणि भरीस भर दादांची राष्ट्रवादी! ही खद खद भाजपच्या कार्यकर्ते मतदारांच्या मनात आहे, ती नाही असे कुणी म्हणाले तर ते मुर्खांच्या नंदनवनात आहेत आणि अजूनही त्यांचे डोळे उघडले नाहीत असेच म्हणावे लागेल.
त्यामुळे भाजप महायुतीच्या राजकीय कडबोळ्यात जो गोंधळ झाला आहे त्याचा फटका पुन्हा जास्त जागा आणि त्रागा असलेल्या भाजपला भोगावा लागणार आहे. शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार यांचे समजा नाही काही राजकीयदृष्ट्या जमले तर ते ‘त्वमेव शरणं मम्’ म्हणत मुळपक्षांकडे किंवा नेत्याकडे जावू शकतात. पण भाजपचे काय? या साऱ्या राजकीय खेळात अडीच वर्षात भाजपने जे स्वत:चे नुकसान करून घेतले आहे ते आता जर शंभर पेक्षा कमी जागा हाती लागल्या तर भरून येण्यास राजकीय शल्यचिकित्सेची गरज दर्शविणारे ठरणार आहे. स्वत:चा मूळ स्वभाव, विचार, आणि विचारसरणीकडे परत आलो नाही तर राजकीय सूज म्हणजे प्रगती नसते हा धडा जितका लवकर भाजपा शिकेल तितके ते योग्य ठरेल! कारण शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून निवडणूकीत भाजपच्या उमेदवारांची पाडापाडी झाल्याचे समोर आले तर नव्याने या तिघांना सत्तेवर किंवा विरोधातही सोबत येण्यास कार्यकर्ते आणि मतदार तयार होतील का? हा प्रश्नच आहे. राजकीय हलाहलाची चव तर महाराष्ट्र भाजपाने चाखली आहे आता त्याचे परिणामही त्यांनाच पचवावे लागणार आहेत. शेवट तीन तिघाडा काम बिघाडा झाला आहे हेच खरे!
महाविकास आघाडीतही हेच लागू होण्याची शक्यता व्यक्त होते मात्र महत्वाचा फरक हा आहे की भाजपने ही राजकीय स्थिती ओढवून घेतली आहे आणि महाआघाडीला अन्य पर्यायच नसल्याने त्यांच्यावर ती राजकीय स्थिती लादली गेली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे परवशता मजबुरी म्हणून स्विकारण्याशिवाय पर्यायच राहिला नाही. असे ते सांगतील तर मतदारही ते मान्य करून सोबत जातील आणि कार्यकर्त्यानाही हे समजावणे शक्य आहे तसे भाजपचे राहिले नाही. हे सारे अव्यावहारिक राजकारण कश्यासाठी? असे सवाल असल्याने संघ परिवार आणि विचारधारेला पटणे आता शक्य नाही.
किशोर आपटे
(लेखक व राजकीय विश्लेषक)
चंद्रचूड आहेत साक्षीला! देशाची न्याय व्यवस्था आता राम भरोसेच!?