मुख्यमंत्र्याच्या ठाण्यातच महायुती संकटात?!

मुंबई : महायुतीमधून मनसे भाजप आणि शिवसेना शिंदे गट या महायुतीच्या तीनही पक्षांकडून  उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. भाजपकडून ठाणे शहर विधानसभेतून  विद्यामान आमदार संजय केळकर यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. मात्र संजय केळकर यांना उमेदवारी जाहीर होताच शिंदे गटांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. ठाणे विधानसभा मतदारसंघात कोणालाही उमेदवारी द्या, तो निवडून येईल, पण संजय केळकर यांना देऊ नका, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाकडून देण्यात आली. अन्यथा शिंदे समर्थक संजय भोईर, मिनाक्षी शिंदे यांच्या बंडखोरीचे संकेत देण्यात येत आहेत.

तर दुसरीकडे भाजपमध्येही कधीनव्हे ती खदखद व्यक्त होत असून  संजय केळकर यांच्याविरोधात बंडखोरी होणार असल्याचे संकेत दिसत आहे.

संजय केळकर यांना तिकीट जाहीर झाले असताना भाजपचे ज्येष्ठ माजी नगरसेवक मिलिंद पाटणकर उमेदवारी अर्ज घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. ठाणे शहर मतदार संघात अपक्ष निवडणूक लढवण्याचा मिलिंद पाटणकर यांचा निर्धार आहे. मिलिंद पाटणकर हे ५ वेळचे नगरसेवक होते, तर उपमहापौरपद देखील काही काळ त्यांच्याकडे होते, असे असून पक्षाने दुर्लक्ष केल्याने मिलिंद पाटणकर उमेदवारी अर्ज घेणार असून ही निवडणूक अपक्ष लढवणार असल्याची माहीत समोर येत आहे.

याच मतदार संघात शिंदे गटाच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी देखील उमेदवारी अर्ज घेतला आहे. तसेच मीनाक्षी शिंदे यांच्या प्रचारार्थ लाडकी बहीण विधानसभा निवडणूक लढवणार, असे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर माजी शिवसेनेचे नगरसेवक संजय भोईर हे देखील निवडणूक लढण्यास याच मतदारसंघातून ठाम आहेत. त्यामुळे संजय केळकर यांना स्वपक्षासह महायुतीतूनच विरोधाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

महायुतीचा आणखी एक घटकपक्ष मनसेचे अविनाश जाधव यांनाही तिकीट देण्यात आले आहे. एकूणच संजय केळकर यांना उमेदवारी मिळताच भाजप आणि शिंदे गटाकडून नाराजी नाट्य सुरु असताना अविनाश जाधव ठाण्यातील आनंद आश्रमात गेले. अविनाश जाधव यांचे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी देखील स्वागत केले.

२०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत लढत भाजप आणि मनसेमध्ये थेट लढत झाली. या निवडणुकीत भाजपचे संजय केळकर यांनी मनसेचे अविनाश जाधव यांचा १९४२४ मतांनी पराभव केला. २०१९ विधानसभा निवडणुकीत एकूण मतदारांची संख्या ३,३७,८४६ होते. निवडणुकीत १,७८,२५८ मतदारानी मतदान केले. यात भाजपचे संजय केळकर यांना ९२,२९८ मते मिळाली. तर अविनाश जाधव यांना ७२,८७४ मते मिळाली होती. मात्र यावेळी महायुतीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ला समजल्या जाणा-या ठाण्यात महायुती संकटात सापडली आहे.

Social Media