उमेदवारीच्या वादात नातेवाईक, परिवार वाद आणि सगेसोयरे

विधानसभा २०२४च्या(Assembly Elections 2024) जागावाटपांचा घोळ शेवटच्या टप्यात असून बंडखोरी थोपविण्याच्या प्रयत्नात २९ तारखेपर्यंत हा घोळ चालण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर यावेळच्या निवडणूकीत पक्षांपक्षांच्या गर्दीत सामान्य कार्यकर्त्यांपेक्षा नेत्यांचे नातेवाईक आणि करोडपती उमेदवारांचा जास्त बोलबाला असल्याचे चित्र दिसत आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी पार्श्वभुमीच्या लोकांची सर्वच पक्षांचे इच्छुक म्हणून गर्दी झाल्याचे पहायला मिळत आहे. गुन्हे असल्याने त्या नेत्याला न देता त्याची पत्नी मुले किंवा अन्य नातेवाईकाला उमेदवारी देण्याचा ट्रेंड असून याला भाजप(BJP) सारखा परिवार वाद विरोधी पक्ष देखील अपवाद नाही बरे का!

महाराष्ट्राच्या मावळत्या विधानसभेत ९५ टक्के आमदार कोट्याधिश होते तर सुमारे ६२टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे दाखल होते, यात देखील सत्ताधारी भाजपच्या आमदारांचा नेहमीप्रमाणे पहिला नंबर आहे हं! तर यंदा नातेवाईकांसाठी उमेदवारी मागताना पक्षांची सोयीची दुकाने वाडल्याने वडिल एका पक्षांत तर मुलगा अन्यत्र विरोधीपक्षांत असा नवा ट्रेंड पहायला मिळत आहे. राजकीय नेत्यांच्या कुटूंबियाना संधी देण्यासाठी किंवा जनरेशन नेक्स्टला राजकीय कारकिर्दीत आणायची संधी म्हणून सर्वच राजकीय पक्षांकडून नेत्यांच्या नातेवाईकांचा भराणा केला जात आहे. त्यात ठळकपणे समोर आलेल्या नावांमध्ये कॉंग्रेसमधून भाजपात येवून चार दिवसांत राज्यसभा खासदार झालेले अशोक चव्हाण यांच्या  कन्या श्रीजया यांना भोकर या मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळाली आहे. या शिवाय मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार(Ashish Shelar) यांचे बंधू विनोद शेलार यांना भाजप नेते रावसाहेब दानवे यांचे पूत्र संतोष दानवे यांना उमेदवारी पुन्हा मिळालीच आहे शिवाय मुलीसाठी देखील दानवे इच्छुक असल्याचे समजते! भाजपचे गणपत गायकवाड तुरूंगात असल्याने त्यांच्या जागी पक्षाने त्यांच्या पत्नीला सुलभा गायकवाड यांना संधी दिली आहे. भाजपचे मंत्री विजयकुमार गावीत यांच्या कन्या लोकसभा निवडणूकीत पराजीत झाल्यानंतर अक्कलकुवा मध्ये उमेदवारीसाठी इच्छुक असून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. या शिवाय भाजपमध्येच राहूल आवाडे, राणा जगजीतसिंह पाटील, नमिता मुंदडा, अमोल जावळे, मोनिका राजळे, सिमा हिरे, नितेश राणे शिवेंद्रराजे भोसले अशी मोठी यादी आहे. मात्र प्रचारात भाजपचे स्टार प्रचारक नरेंद्र मोदी नेहमी अन्य पक्षांच्या नेत्यांच्या परिवार वादाला नावे ठेवताना दिसतात.

परिवार आणि नातेवाईकांच्या या यादीत भाजपा व्यतिरिक्त शिवसेना ठाकरे पक्षाकडून आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई, शंकरराव गडाख, केदार दिघे, अव्दय हिरे, दिपेश म्हात्रे ही नेत्याची जन नेक्स्ट रिंगणात आहे तर मनसेकडून राज ठाकरेंचे चिरंजीव अमीत यांचा समावेश आहे.

यात नविन प्रकारही आहेत गणेश नाईक भाजपमध्ये आणि मुलगा संदिप शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून उमेदवार आहे. तसेच प्रकरण खासदार नारायण राणे यांचे ते स्वत: भाजपात खासदार एका मुलाला भाजपात उमेदवारी दुस-याला शिंदेच्या शिवसेनेतून उमेदवारी देण्यात आली आहे. अजीत पवार यांच्या राष्ट्रावादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती, पक्षाचे बडे नेते छगन भुजबळ यांच्या मुलाला अलिकडेच राज्यपाल नियुक्त आमदारकी मिळाली तर पुतण्या समीर नांदगावमधून ठाकरेंच्या पक्षातून उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्नात असल्याने अजित पवारांच्या पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे! याशिवाय अजित पवार यांच्या पक्षात इंद्रजीत नाईक, भरत गावित या नेत्यांच्या मुलांनाच उमेदवारी मिळाली आहे.

शिवसेना शिंदे च्या पक्षात सांदिपान भुमरे खासदार झाले आता मुलाला विलास भुमरे उमेदवारी देण्यात आली आहे. उद्योग मंत्री उदय सामंत रत्नागिरीतून तर भाऊ किरण राजापूरात शिंदेच्या पक्षातून उमेदवार आहेत. रविंद्र वायकर खासदार झाले तरी त्यांच्या पत्नी शिदे गटातून उमेदवार आहेत. अजूनही अनेक उमेदवार याद्या येण्यास विलंब लागत आहे त्यामागे नेत्यांचे नातेवाईक आणि कुटूंबाच्या सोयीचा प्रश्न हा प्रमुख मुद्दा आहे. कॉंग्रेस पक्षाची यादी अद्याप यायची आहे. अश्या प्रकारे नेत्यांच्या नातेवाईक आणि कुटूंबाच्या उमेदवारीचा भराणा सर्वच पक्षात दिसत असून नऊ वेळा आमदार झालेले बाळासाहेब थोरात कॉंग्रेस, कालिदास कोळंबकर भाजप, पाच पेक्षा जास्त वेळा आमदार राहिलेले तर अक्षरश: ५० पेक्षा जास्त नेते आहेत. जे पुन्हा रिंगणात आहेत!

 

किशोर आपटे

(लेखक व राजकीय विश्लेषक)

चिन्हाचे वाद आणि प्रतिवाद! नियमांचे अपवाद?

Social Media