आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना महाराष्ट्र शासनाची माहिती
महाराष्ट्र शासनाने अद्याप सन 2024 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार घोषित केलेला नाही, अशी माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मागविलेल्या माहितीच्या उत्तरातून स्पष्ट झाली आहे.
अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकाराखाली विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे कार्यक्रम अधिकारी नि.ज्ञा. धुमाळ यांनी सांगितले की, सन 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 22 फेब्रुवारी 2024 रोजी प्रदान करण्यात आला होता. तसेच, 2024 च्या पुरस्कारासाठी 2 जानेवारी 2024 रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती.
1997 पासून 2023 या कालावधीत एकूण 19 महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. मात्र, सन 2021, 2013, 2014, 2016, 2017, 2018, 2019 आणि 2020 या वर्षांत हा पुरस्कार देण्यात आलेला नाही.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्य शासनाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, त्यामुळे शासनाने त्वरित 2024 चा पुरस्कार जाहीर करावा, अशी मागणी अनिल गलगली यांनी केली आहे.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त मान्यवर
1997 साली पु.ल.देशपांडे ( साहित्य ), 1998 साली श्रीमती लता मंगेशकर ( संगीत ), 1999 साली सुनील गावसकर ( क्रीडा ), 2000 साली डॉ. विजय भटकर ( विज्ञान ), 2001 साली सचिन तेंडूलकर ( क्रीडा ), 2002 साली पं. भीमसेन जोशी ( कला/संगीत ), 2003 साली डॉ. अभय बंग व राणी बंग ( समाज प्रबोधन ), 2004 साली बाबा आमटे ( समाज प्रबोधन ), 2005 साली डॉ. रघुनाथ माशेलकर ( विज्ञान ), 2006 साली रतन टाटा ( उद्योग ), 2007 साली रा.कृ.पाटील ( समाजप्रबोधन ), 2008 साली मंगेश पाडगावकर ( साहित्य ), 2008 साली नानासाहेब धर्माधिकारी ( समाज प्रबोधन ), 2009 साली सुलोचना लाटकर ( मराठी चित्रपट ), 2010 साली जयंत नारळीकर ( विज्ञान ), 2011 साली अनिल काकोडकर ( विज्ञान ), 2015 साली बाबासाहेब पुरंदरे ( साहित्य ), 2021 साली आशा भोसले ( संगीत ), 2022 साली डॉ. दत्तात्रेय नारायण उर्फ आप्पासाहेब धर्माधिकारी ( समाज प्रबोधन ), 2023 साली अशोक सराफ ( मराठी चित्रपट ) यांस महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.