Maharashtra CM Swearing-in Ceremony : मुंबईतील आझाद मैदानावर महायुती सरकारचा महाशपथविधी सोहळा अतिशय दिमाखदार पद्धतीने संपन्न झाला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार(Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. भव्य- दिव्य शपथविधी सोहळ्यानंतर लगेचच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी मंत्रालय गाठले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी अनेक प्रश्नांना सविस्तर उत्तरे दिली.
मराठा आरक्षणाबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्याच्या विधानसभेत यापूर्वीच वस्तुस्थिती मांडली होती. आधीच्या सरकारने डेटा मिळत नाही, अशा प्रकारचा अहवाल केंद्राला पाठवला होता. मधल्या काळातही बरीच कारवाई झाली, कोर्टात सपोर्टिव्ह अॅफिडेव्हिट आम्ही केले. सध्या हे प्रकरण कोर्टात विचाराधीन आहे. आम्ही आमची बाजू स्पष्टपणे मांडली आहे. मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न मागच्या सरकारमध्ये आम्हीच केला होता आणि पुढेही आम्हीच मराठा समाजाला न्याय देऊ, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. यानंतर आता मनोज जरांगे(Manoj Jarange) यांनी महायुती सरकारला नवा अल्टिमेटम दिल्याचे बोलले जात आहे.