महायुतीचे एकच कलेवर असताना त्रिमुर्तीची तोंडे मात्र तीन दिशांना दिसायचे कारणही हेच तर नसावे?

महाराष्ट्रात २०२४च्या दिवाळीत फटाके फुटले आहेत, पण ते देखील राजकीय बंडखोरांचे आहेत! या फटाक्यांना शांत करण्यासाठी महायुती आणि महाआघाडीचे नेते सणासुदीला दारोदार फिरताना दिसत आहेत!

महाविकास आघाडीत कॉंग्रेसचे दहा ठिकाणी बंडखोर आहेत, तर पाच सहा जागांवर शिवसेनेचे आणि दोन जागांवर राष्ट्रवादी शरद पवारांचे बंडखोर आहेत. पण कॉंग्रेसने जाहीर केले आहे की, मैत्रिपूर्ण लढती होणार नाहीत सगळे बंडखोर माघार घेतील त्यानंतर अन्यत्र गेलेले अनिस अहमद, इ. नेते घरवापसी करत परत पक्षासोबत आले देखील. शिवसनेकडूनही बंडखोराना माघार घेण्यास भाग पाडण्यात आले आहे. तर शेकाप समोरचा पेचही सुटला आहे.

पण खरा गोंधळ आहे तो सत्ताधारी महायुतीमध्ये! मोठा भाऊ भाजपचे वीस बंडखोर मैदानात आहेत, तर सहयोगी शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवारांचे देखील काही ठिकाणी बंडखोर आहेत. याचे कारण जागा वाटपाच्या वेळेला सहयोगी पक्षांना सोबत तर घ्यायचे पण राजकीयदृष्ट्या उपाशी ठेवूनही ढेकर द्यायला भाग पाडायचे! म्हणजे कसे तर उदाहरणच पाहूया. शिवसेना भाजपा युतीच्या काळापासून अगदी बाळासाहेब ठाकरेंच्या हयाती मध्येही रिपब्लिकनपक्षाचे रामदास आठवले युतीमध्ये आले. त्याला बाळासाहेब शिवशक्ती भिमशक्ती म्हणायचे. तर त्या रिपब्लिकन पक्षाने शिवसेना भाजपा युती २०१४ ला तुटल्यानंतरही भाजपसोबत राहणे पसंत केले. त्यामुळेच की काय, मोदीबाबांसोबत तेंव्हापासून आजपर्यत तीन वेळा न चुकता एकमेव असे नेते आहेत ज्यांनी केंद्रात मंत्रीपदाची शपथ घेतली आहे त्या आठवले साहेबांचा ना कुठला मतदारसंघ, ना लोकसभा, विधानसभेत त्यांच्या पक्षाकडे जनमताचा रेटा, ना त्यांच्याकडून कुठली महत्वाकांक्षा पण न मागताही त्यांना एक नाही दोन जागा भाजपाने विधानसभेला दिल्या.

त्याजागी भले आयता आपल्याच पक्षाच्या नेत्याची उमेदवार म्हणून वर्णी लावली असेल. तशीच गोष्ट जनसुराज्य चे विनय कोरे, किंवा रासप चे महादेव जानकरांची आहे. कारण या लिंबू टिंबू पक्षाना सोबत घेवून महाराष्ट्रात भाजप एकटीच नाही हे दाखवता येणे सोपे होते. शिवाय फारशी महत्वाकांक्षा नसलेल्या या नेत्यांचा राजकीय वकूब किंवा उपयोग मर्यादीत स्वरुपाचा आहे. म्हणजे जेवणाच्या पानात जसे लिंबू, चटणी, मीठ, लोणचे असते ना तसेच. ती काही भाजी किंवा भात नाही! त्यामुळे चवीपुरते हे पक्ष भाजपने सोबत ठेवले आहेत.


पण भाजपशी ३०-३५ वर्षांच्या जुन्या मैत्रिचे पक्ष शिवसेना, अकालीदल सारखे मित्र दुरावले किंवा संपवले गेले. तसेच भय या छोट्या मित्राना देखिल आहेच. रासपच्या जानकारांना यापूर्वीच २०१९,२०२४मध्ये हा अनुभव आला होता. पण त्यांनी आपले वेगळे चिन्ह कायम ठेवण्यात यश मिळवले. तर भाजपने आताही विधानसभा जागावाटपात १४६ जागा अधिकृत एकट्याने पटकावल्यानंतर मित्रपक्षांच्या नावे आणखी चार जागा पदरात पाडून घेतल्या. त्यानंतर शिंदे यांच्या पक्षातल्या पालघरच्या शिंदे सोबत गुवाहाटीला जावून आलेल्या पूर्वाश्रमीच्या काळात भाजपच्या वनवासी नेत्याचा मुलगा असलेल्या श्रीनिवास वनगांना बाजुला करून कॉंग्रेसमधून भाजप मध्ये पाच वर्षात सहावेळा आट्यापाट्या खेळतात तसे पक्ष बदलत असलेल्या राजेंद्र गावितांची वर्णी लावण्यात आली. अश्या प्रकारे १५ जागांवर भाजप पुरस्कृत उमेदवार शिवसेनेच्या चिन्हावर लढत आहेत. म्हणजे भाजपच्या अन्योक्तीने जागा किती झाल्या १५० + १५ = १६५ शिवाय त्यांचे वीस बंडखोरही रिंगणात आहेत. म्हणजे १८५ या शिवाय अजित पवारांच्या पक्षातून त्यांचे पाच सहा उमेदवार पाठवण्यात आले आहेतच. म्हणजे झाले १९०च्या आसपास एवढे करूनही टिम ए बी सी डी वगैरे म्हणजे वंचित बहुजन आघाडी, तिसरी आघाडी यामध्येही भाजपच्या विचारांचे पण जागावाटपात न बसणारे लोक आहेतच.

Maharashtra-Assembly-elections

इतके सगळे होवूनही ज्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना शरद पवारांची घराणेशाही दिसते, किंवा उध्दव ठाकरेंचा परिवारवाद दिसतो, त्या भाजपकडून आग्रह काय केला जातो? तर मनसेच्या मुख्य नेत्याच्या मुलाच्या पहिल्याच राजकीय पदार्पणासाठी शिवसेना शिंदेच्या उमेदवाराला बाहेर काढायचे? मग तरीही आता परिवार वादाचा मुद्दा कुठे गेला? असे मात्र महाराष्ट्राच्या गोदी मिडियातून कुणी विचारले नाही! तसे विचारायचेच नसते!?  कारण भाजपच्या हिंदुत्वाची साथ राज ठाकरे नेहमी देत आले आहेत, म्हणे! २०१९च्या लावरे तो व्हिडिओ सभा ज्यांना लक्षात असतील त्यांच्यासाठी हे सारे पचनी पडणे कठीण आहे बरे! असो.


म्हणजे सुमारे दोनशे सव्वा दोनशे जागांवर भाजपाचा निवडणूकांचा खेळ यावेळी होताना दिसत आहे. २८८ च्या विधानसभेत कश्याही करून दोनशे सव्वा दोनशेच्या आसपास जागांवर भाजप या ना त्या प्रकारे काबिज आहे. हाच तो ‘शत प्रतिशत’ आणि ‘पुन्हा येईन’ च्या घोषणांचा प्रभाव आहे नाही का? त्यात वावगे काहीच नाही, राजकारण हे असेच असते असे काही मित्रांनी म्हटले. त्यांना मित्रपक्ष, हिंदुत्व, समविचारी पक्ष, महायुती या साऱ्या ढोंगाची मग काय बरे गरज आहे? असाही सवाल गोदी मिडियाकडून विचारला जात नाही.
साम दाम दंड भेद कश्याही प्रकारे निवडणूक जिंकायची त्यासाठी काहीही विधीनिषेध पाळायचेच नाहीत हा कसला आंधळा आग्रह हट्ट असू शकतो ते महाराष्ट्राला सध्या नविनच आहे. इतके की निवडणूक आयोगाच्या डोळ्याना गांधारी सारखे पट्टी बांधल्यागत कामकाज केले जात आहे. सारख्याच दिसणाऱ्या पक्षांच्या चिन्हाचे, समान नावांच्या लोकांना उमेदवारी देण्याचे, जुनेच हथकंडे वापरले जात आहेत. याशिवाय मतदार याद्यांमध्येही विशिष्ट मतदारसंघाच्या विशिष्ट विभागातील मतदारांची नावे निवडणुकांच्या आधी पंधरा दिवसापर्यंत असल्याचे दिसत असताना ऐन निवडणूक बूथवर त्यांची नावे गायब होण्याचे प्रकारही घडत आहेत.

यामागे पध्दतशीर रणनिती आहे, हे वारंवार दिसून आले आहे. निवडणूक यंत्रणेत अन्य राज्यातून निरिक्षक, सुरक्षा कर्मचारी आणून स्थानिकांचा प्रभाव नष्ट करण्याचे, तसेच मतदान यंत्रच नव्हे तर यंत्रणा देखील नियंत्रणात ठेवून हव्या तश्या राबविण्याचे तंत्र अवलंबिले जात आहे. एका अर्थाने या देशात दर पाच वर्षानी होणारी लोकशाहीची पवित्र प्रक्रिया गढूळ करून आपल्या सोयीच्या राजकारणासाठी वाकवायची जी चुकीची पध्दत हरियाणात पहायला मिळाली तिचा मोठ्या प्रमाणात प्रयोग यावेळी महाराष्ट्रात होण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत.


त्यामुळेच सध्या महायुतीच्या त्रिमुर्तीची तोंडे एकच कलेवर असताना तीन दिशाना दिसायचे कारणही हेच तर नसावे? कारण अति सत्ताकांक्षा असलेल्या कुणा पक्षाने कधीच आपली सत्ता जावू नये असे वातावरण तयार करून त्यावर स्वार होण्याचा आटापिटा केला आहे. तो त्यांच्या मित्रांचाही श्वास गुदमरुन टाकणारा आहे. त्यावर दुर्दैवाने गोदी मिडिया बोलत नाही. जे बोलायचा प्रयत्न करतात त्यांचा आवाज पोहोचू दिला जात नाही.

Monkey-baat
बरे इतके सारे होत असताना बातमी आली की सहा नोव्हेंबरला मुंबईत राहूल गांधी सभा घेणार आहेत आणि कॉंग्रेसच्या गॅरंटीची घोषणा करणार आहेत! लगेच दुसरी बातमी झळकली लाडक्या बहिणींना आता लवकरच डिसेंबरच्या महिन्याचा हप्ता देखील नोव्हेंबर महिन्यातच दिला जाणार आहे मुख्यमंत्र्याची घोषणा? म्हणे! निवडणूकीच्या महिन्यात थेट सरकारी तिजोरीतून लाभ? (की लाच?) काय करतोय ‘चुना’व आयोग?  अरे काय हे कुठे नेवून ठेवलाय हा महाराष्ट्र?

हेही वाचा – वनगांच्या अश्रूतून शिंदेंचे दु:ख ज्यांना दिसले आहे, त्यांनाच हे समजू शकेल नाही का?!

 

किशोर आपटे

(लेखक व राजकीय विश्लेषक)

https://www.sanvadmedia.com/ajit-pawar-12/
Social Media