विधानसभा निवडणूकीच्या मतदानासाठी प्रचाराचे केवळ अकरा दिवस बाकी राहिले आहेत. या काळात देशभरातून महायुतीचा घटकपक्ष भाजपसाठी मोठ मोठया स्टार प्रचारक नेत्यांची वर्दळ महाराष्ट्रात होताना दिसत आहे. सर्वाधिक सुनियोजीत निवडणूक प्रचार एम पॉवर देशात आणि राज्यात कुठल्या पक्षाकडे असेल तर ती भाजपकडे आहे. कारण सातत्याने बाराही महिने हा पक्ष निवडणूक मोडवर काम करत असतो. त्यामुळे त्यांच्याकडे सध्या सभा, बैठका साठी, विवीध माध्यमांचा सुनियोजीतपणे होणारा वापर यामध्ये व्यापक प्रमाणात गाजाबाजा होताना दिसत आहे. त्यामानाने महायुतीचे अन्य घटकपक्ष शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार यांच्याकडे धावपळच जास्त होताना दिसत आहे.
गंमत म्हणजे भाजप राष्ट्रीय पक्ष आहे, त्यांच्याकडे केंद्रात सत्ता आहे. देशाच्या राष्ट्रपतीपासून सारी पदे त्यांच्या पक्षाकडेच आहेत. शिवाय रा स्व संघासारखा भरभक्कम पाठिराखा त्यांच्याकडे आहे. पण जनमानसात त्यांच्याकडून पोहोचण्याचा जो आटापिटा केला जात आहे, त्यात व्यापारीपणा जास्त आणि स्विकार्हता कमी असाच प्रकार होताना दिसत आहे. तटस्थ पत्रकार म्हणून आपण याचे मुल्यमापन करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामागील कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी ब-याच मोठ्या प्रमाणात बुध्दीवादी, पुंजीपती लोकांचा जमावडा असलेल्या या पक्षाच्या सा-या आयोजनात गेल्या दहा वर्षांच्या सत्तेवर असण्याचा एक प्रकारचा दर्प असल्याचे लक्षात येते. कोणे एके काळी स्व. वसंतराव भागवतांच्या काळात कार्यकर्त्यांच्या घरी राहून वार लावून जेवणारे आणि पक्षाचे बौध्दिक घेवून गावभर संघटनात्मक काम करणारे ते याच पक्षाचे लोक आहेत का? असा प्रश्न त्यामुळे जाणाकारांसमोर आल्याशिवाय राहात नाही. म्हणजे १९७४मध्ये मराठी सिनेमा सामना मध्ये आरती प्रभूंच्या ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ या शब्दामध्ये रविंद्र साठ्ये यांनी जे गीत गायले आहे, त्याची प्रचिती त्यावेळी आणि आजही या पक्षाच्या कामाकडे पहाताना येते. मात्र दोन्ही काळातील संदर्भ अगदी परस्पर विरोधी असल्याचे दिसून येते.
कोट्यावधी रूपयांचा रतिब असताना शासकीय यंत्रणा पासून अगदी तंत्रज्ञानाच्या सा-या सुविधा असताना या पक्षाच्या सा-या क्रियाकलापांचा आत्माच कुठेतरी हरवल्याचे जाणवत राहते. याचे सर्वात महत्वाचे उदाहरण पहायचे झाले तर या पक्षाने सुमारे १५० च्या आसपास उमेदवार अधिकृतपणे घोषित केले आणि त्यांच्या पक्षाचे सुमारे शंभर जागांपेक्ष जास्त बंडखोर उभे राहिल्याचे पहायला मिळाले. ज्याची चर्चा करू नका असे सांगण्यात येत असते. या बंडखोरामध्ये काही चाळीस एक जणांवर पक्षाने कारवाई केली आहे किंवा तसे भासवले आहे म्हणे! पण तरी देखील सुमारे ७०-८० जागांवर पक्षाचे बंडखोर उभे असून ते महायुतीच्या अधिकृत उमेदवाराची किमान पाच ते पन्नास हजार मते खावू शकतात अशी माहिती आहे. म्हणजे सुमारे महिनाभर किंवा त्यापेक्षा जास्त काळ जागावाटपाचा जो खेळ करत पक्षात कशी शिस्त आहे हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला त्याला या बंडखोरीच्या संख्येकडे पाहिले की काहीच अर्थ राहत नाही.
यावर माहिती घेताना पक्षाच्या अनेक वर्षापासून प्रदेश कार्यालयात कार्यरत कार्यकर्त्याने सांगितले की, महायुतीच्या ज्या तीन घटकपक्षांना जागावाटप झाले आहे, त्यातील राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेच्या अनेक ठिकाणच्या स्थानिक नेते – कार्यकर्त्यांकडून भाजपला मतांचे दान मिळण्याची शक्यता नसल्याचे किंवा पुरेश्या प्रमाणात ट्रान्सफर ऑफ वोट होण्याची शक्यता नसल्याने या बंडखोरीच्या प्रयोगाची वाढ झाली आहे आणि नंतर तर त्याला जणूकाही अधिकृत मौन संमती मिळाल्यासारखी स्थिती झाली आहे. हे केवळ भाजपचे नाही, महायुतीच्या तीनही पक्षांकडून आयत्यावेळी हव्या त्या जागा मिळण्याची शक्यता नाही असे दिसले त्यावेळी हळूहळू आपल्या कार्यकर्त्यांना बंडखोर म्हणून पुढे करत दबावतंत्र खेळण्यात आले. आणि नंतर अनेक ठिकाणी ते मागे घेण्याचा प्रयत्न झाला, तडजोडी झाल्यासारखे दिसले तरी ‘विंचू चावला हो’ या एकनाथी भारूडात आहे तशी शेवटी ‘किंचीत राहिली फूणफूण’ अजूनही शिल्लकच आहे.
जागावाटप, नाराजी, रूसवे फुगवे यामध्ये शिवसेना-भाजपमध्ये १९९९मध्ये नारायण राणे आणि गोपीनाथ मुंडे यांच्यात जे राजकारण झाले तश्याच प्रकारचे राजकारण सध्या शिंदे आणि फडणवीस यांच्यात होत असल्याचे या कार्यकर्त्याचे निरिक्षण आहे.
म्हणजे १९९५ ला शरद पवारांच्या ४५ अपक्षांच्या रसदीने युती सरकार सत्तेवर आले. त्यानंतर साडेचार वर्षात मनोहर जोशी यांना मातोश्रीमधील राजकारणाचे बळी ठरवत बाजुला करण्यात आले. आणि राणे पर्व सुरू झाले. त्यावेळी जोशींनंतर भाजपकडे मुख्यमंत्रीपद यावे अशी चुळबूळ सुरू होती पण बाळासाहेब ठाकरेंसमोर ती त्यावेळी संख्याबळाच्या दृष्टीने भाजपच्या महाजनमुंडे यांना ती रेटण्यात शक्ती कमी पडत होती. म्हणून मग सहा महिने आधीच शायनिंग इंडिया करत निवडणूका आधीच घेण्याचा प्रय़त्न करण्यात आला आणि त्यातही मुख्यमंत्रीपद आपल्याकडेच राहायला हवे म्हणून शिर्षस्थ राणे-मुंडे यांच्याकडून मुख्यमंत्रीपदाच्या खु्र्चीचा खेळ करण्यासाठी पाडापाडीचा उद्योग करण्यात आला होता. त्यात युतीच्या हातून नव्यानेच राष्ट्रवादी पक्ष स्थापन करणा-या शरद पवारांनी अलगदपणे सत्ता काढून घेतली. आणि ज्या कॉंग्रेसच्या विदेशीच्या मुद्यावर फारकत घेतली त्यांच्यासोबतच संसार थाटला होता!
सध्याच्या काळात मंत्रालयाच्या सूत्रांचा कानोसा घेतला तरी अशीच ‘वर्मावर बोट’ ठेवत राज्यातील शक्तीकेंद्र एकमेकांना टक्कर देत असल्याचे सांगण्यात येत आहे. याचे उदाहरण म्हणजे ख-या अर्थाने महायुती सरकारमध्ये लाडक्या बहिण योजनेची सुरुवात करणा-या एका सर्वोच्च वरिष्ठ पदावरील कर्तृत्ववान महिला अधिका-यांची उचलबांगडी करण्याचे राजकारणही याच सत्ताकेंद्राच्या रस्सीखेच प्रकरणाचा परिपाक आहे म्हणे. राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की, बंडखोरीच्या शह-काटशहांच्या राजकारणात सत्ताधारी महायुतीच्या दोन घटकपक्षांमध्ये चीत-पटच्या राजकारणाला तेंव्हाच वाकडे वळण मिळाले म्हणे जेंव्हा एकमेकांची जिरवण्याच्या राजकारणात सुमारे पन्नास एक वरिष्ठ पोलीस अधिका-यांच्या बदल्या त्या भागातून करण्यात आल्या ज्या भागात त्यांना मर्जीतले ‘वर्दीतील कार्यकर्ते’ म्हणून काही महिन्यांआधी ‘जाणिवपूर्वक आणण्यात’ आले होते. हे सारे ज्या शिर्षस्थ महिला अधिका-यांच्या मदतीने करण्यात आले त्यांच्याबद्दल तर मागील दोन वर्षापासून बरीच ‘भवती न भवतीचे’ राजकारण झाले होते. त्यामुळेच त्या विरोधकांच्या रडारवरही सातत्याने होत्याच. या सत्ताधा-यांच्या शितयुध्दाचा फायदा घेत शरद पवारांसारख्या नेत्याने सहजपणे राजकीय टपली मारावी असे राजकीय वक्तव्य केले की, ‘पोलीसांच्या वाहनातूनच रसद पुरविण्यात येत आहे’. या वक्तव्यांचा देखील ‘वर्मावर’ घाव घालण्यास उपयोग झाल्याचे संकेत देण्यात आले म्हणे! मग त्या वरिष्ठांची सत्ताधारी पक्षाच्या सर्वोच्च वर्तुळातील उपयुक्तता लक्षात घेत पदोन्नती, नियुक्ती आणि फेरनियुक्तीचे राजकारण पूर्वीच करण्यात आले होते. तरीही या बदल्यांच्या राजकारणाचे म्हणे बदल्याच्या राजकारणात रूपांतर झाले म्हणे. आणि केंद्रातील वरिष्ठांमार्फत एकमेकांच्या ‘वर्मावर’ बोट ठेवण्यात आले. आणि मग काय? जे घडल्याचे सा-या महाराष्ट्राला कुतूहल, कौतुक आणि आश्चर्य वाटले आहे, त्या वर्मावर बोट ठेवण्याच्या राजकारणाची इतिश्री झाली आणि त्या मर्जीतल्या लाडक्या बहिणीला पदावरून दूर करण्यात आले म्हणे! सूत्रांच्या या चर्चा माहिती आणि कुजबूजीला किती खरे मानायचे? हा देखील प्रश्नच
पण महायुतीच्या राजकारणात अंतर्गत वातावरणात आता ग्रासरूट पासून वरिष्ठांपर्यंत पक्षीय कंगोरे इतके स्पष्ट झाले आहेत. त्यामुळे प्रचार तंत्र काही असले तरी एकमेकांची मते सत्ताधारी तीन पक्षांना कशी मिळतील हा प्रश्नच आहे. बंडा तंटाच्या राजकारणात मतांची पळवापळवी होताना ‘जो जिता वही सिंकदर’ असेल हे तर आहेच पण पुन्हा संख्याबळाची बेरीज करताना नवी समीकरणे देखील तयार होण्याची शक्यता आहे. म्हणूनच आरती प्रभूंच्या ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे?’ या गितामधील शब्दांची आठवण येत राहते!
किशोर आपटे
(लेखक व राजकीय विश्लेषक)
https://www.sanvadmedia.com/elections/