बारामती विरुध्द भानामती? महायुतीचा ‘जबरदस्त’ की ‘जबरदस्तीचा’ विजय म्हणायचे? : भांवावलेल्या विरोधकांसह मतदारांसमोर यक्षप्रश्न!!

२३ नोव्हेंबर २०२४ रोजी भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला जबरदस्त बहुमत मिळाल्याचे निवडणूक निकाल समोर आले आहेत. ही निवडणूक बारामती विरुध्द भानामती? अशी ठरल्याची बोलकी प्रतिक्रिया एका मित्राने फोनवरून बोलताना व्यक्त केली. आणि अगदी खरेच कुणाला विश्वास बसणार नाही असा आणि इतका निकाल कसा लागला असा प्रशन प्रत्येकजण विचारत आहे! मात्र जे काही चुकीचे घडले त्यांचा अंदाज घेण्यात विरोधक कमी पडल्याचे त्यांना आता कबूल करण्यात कमीपणा येत असल्याने जुन्या सूरात आता आगपाखड करण्याशिवाय त्यांच्या हाती काहीच राहिले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

इतकेच नव्हे तर विजयी होणार म्हणून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याच्या तयारीत असलेल्या महाविकास आघाडीच्या तीन पक्षांना मिळून पन्नासच्या आकड्याला पार करता यावे इतक्याही जागा जिंकता आल्या नाहीत. इतके की, विधानसभेत विरोधीपक्षनेतेपदही अस्तित्वात येणार नाही अश्या प्रकारे हा विरोधकाचा पराभव झाला आहे.  त्यामुळेच महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील कदाचित हा ऐतिहासिक निकाल ठरला आहे. या निकालानंतर त्याचे वर्णन आता ‘जबरदस्त विजय’ असे केले जात असताना महायुतीच्या या विजयाला ‘जबरदस्त’ म्हणायचे की ‘जबरदस्तीचा’ म्हणायचे? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. कारण असा ‘चमत्कारीक विजय’ झाला आहे यावर अजूनही भाजपमध्ये किंवा त्यांच्या मित्रपक्षांमध्येही अनेकांचा विश्वास बसलेला दिसत नाही. अगदी खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चेहऱ्यावरील भाव आणि त्यांची देहबोली भारावून गेल्यासारखी दिसत होती.
त्यानंतर मग कॉंग्रेस पक्षाकडून पत्रकार परिषदा घेवून भाजपने निवडणूक यंत्रणेत कशी ‘भानामती’ केली वगैरे सांगण्यात येवू लागले. यच्चयावत माध्यमांतून या निकालांचे विश्लेषण फारच उथळ आणि भरकटलेल्या पध्दतीने केले जात होते. आणि वास्तवातील काही गोष्टींकडे बघायचेच नाही अश्या पध्दतीने जुन्या-पुराण्या संदर्भाचा रतिब घालून दिशाभूल करत हा विजय कसा सत्ताधा-यांच्या मेहनत आणि चतुराईने झाला सुप्त लाट कशी होती की ती विरोधकांना समजलीच नाही वगैरे सांगण्यात येवू लागले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र अनेकदा आपल्या प्रचारातून या प्रकारच्या निकालाचे संकेत दिले होते. एका वेळी तर ते स्पष्टपणे महाराष्ट्रात हरियाणाची पुनरावृत्ती होणार असल्याचे सांगून गेले. तरीही विश्लेषण करणा-यांकडून या मुद्यावर फारशी चर्चा न करण्याचा कल पहायला मिळाला. तर हरियाणाची पुनरावृत्ती म्हणजे नेमके काय झाले आहे ते देखील समजून घ्यायला हवे. हरियाणामध्ये काँग्रेसच्या नेत्यांमध्ये असलेले मतभेद महाराष्ट्रात नव्हते असे आता ते सांगू शकतात का? किंबहूना आघाडीच्या तीन पक्षांसह अन्य घटकपक्षात मतदानाच्या दिवसापर्यंत काय सुरू होते? सोलापूर, कोल्हापूर अमरावती, अहिल्यानगर, उ. महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात देखील किमान शंभर जागांवर ओढून ताणून एकमत असल्याचे भासवले जात होते. त्या सर्व ठिकाणी भाजपने अपक्ष आणि बंडखोर मोठ्या प्रमाणात उभे करण्यात यश मिळवले. जेणेकरून आधीच दुभंगलेल्या विरोधकांच्या मतांमध्ये आणखी फूट पाडण्यात त्यांना यश आले.
दुसरीकडे महायुतीमध्ये देखील कुरघोडीचा हा खेळ सुरूच होता, मात्र त्या खेळाशिवाय देखील त्याचा फायदा त्यांनी करून घेतला. उदाहरण द्यायाचे झाल्यास सना मलिक यांना तिकीट दिल्यानंतरही नबाब मलिक यांना मानखुर्द शिवाजीनगर येथे भाजपच्या नाकावर टिच्चून अजित पवार यांनी तिकीट दिले त्यानंतर भाजपने त्यांच्यापासून अंतर असल्याचे दाखवून देत आपल्या हिंदू मतांचे ध्रुवीकरण मजबूत करण्याचा गनिमीकावा खेळला आहे. मलिक नंतर हारलेच पण त्यांच्या भाजप सोबतच्या नुरा कुस्तीचा फायदा त्यांना राज्यात अन्यत्र झाला. तीच गोष्टी योगी यांच्या नारेबाजीबाबत सांगता येते. अजित पवारांबद्दल भाजपच्या तसेच शिवसेनेच्या हिंदू मतदारांमध्ये असलेल्या नाराजीचा फायदा त्यामुळे एकजुटीने हिंदू मतांचा जोगवा मिळवण्यात सत्ताधा-याना करून घेता आला. हाच तो हरियाणा पॅटर्न आहे.
सत्ताधारी पक्ष म्हणून केंद्रीय यंत्रणाचा भाजपने गेल्या दहा वर्षात राजकीय कारणांसाठी जो अनिर्बंध वापर केला आहे ते तर सा-या न्यायालयातून आलेल्या जामिन निकालपत्रांतून स्पष्टपणे समोर आले आहेच. त्याचे उदाहरण म्हणजे ‘बिटकॉईन’ प्रकरण त्यानिमित्ताने धाडी टाकण्याचा उद्योग आणि नंतर फेक कॉंल रेकॉर्डिंग असल्याचे मतदानाच्या दिवशी उशीरा सांगण्याचा मानभावीपणा या सा-या गोष्टी सत्ताधारी पक्षांकडून करण्यात आल्या.
कारण निवडणूकांसाठी बाराही महिने काम करणारा पक्ष म्हणून भाजपची जी ओळख आहे त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. नेमकी हिच चूक विरोधक आणि विश्लेषक करत आले आहेत. भाजप- रास्वसंघ यांचा बारमाही अजेंडा निवडणूका साठी कार्यरत राहणे आणि त्या जिंकण्यासाठी यथासंभव सर्वबाजू सर्व पर्य़ांयांचा वापर करणे हाच राहिला आहे. ते काँग्रेस आणि अन्य राजकीय पक्ष कधीच करताना दिसत नाही. त्यामुळे लोकसभा निवडणूकीत ज्यावेळी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या मतांमध्ये केवळ १ टक्क्यांचे अंतर होते, मात्र विजयी झालेल्या जागांमध्ये ते विजय बदलू शकले नाहीत हे दिसले त्यावेळी ‘करेक्टीव मेजर्स घेतल्या गेल्या त्यामुळे विधानसभेला दोघांच्या मतांमध्ये दहा टक्क्यांपेक्षा जास्त अंतर पडल्याचे पहायला मिळाले. लोकसभा हरल्याच्या त्या क्षणापासून महायुतीकडून चूकांची सुधारणा शासकीय पातळीवर आणि संघटनात्मक पातळीवर सुरू झाल्या होत्या.
या उलट महाआघाडीच्या नेत्यांमध्ये अंहकार आणि जग जिंकल्याचा अविर्भाव पदोपदी जाणवत होता. नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यातील विसंवाद असो किंवा उध्दव ठाकरे आणि काँग्रेस किंवा शरद पवार यांच्यातील सहानुभूतीचे भांडवल करण्याची स्पर्धा असो, त्यामुळे विदर्भासह मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकणात महाविकास आघाडीच्या घटकपक्षांकडून एकमेकांच्या विरोधात सुमारे चाळीस पेक्षा जास्त जागांवर उमेदवार उभे करण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या या कमजोरीचा फायदा घेत जागावाटप करताना महायुतीने चलाखीने जुन्याच बहुसंख्य उमेदवारांना कायम करत विरोधकांना गाफील ठेवले. या शिवाय बंडखोरी करत तसेच मतांचे ध्रुवीकरण करणा-या मनसे, एमआयएम, वंचित बहुजन, तिसरी आघाडी अश्या सह नामसाधर्म्य असलेल्या अपक्षांची गर्दी प्रत्येक मतदारसंघात केली. ही सारी परिस्थिती हरियाणासारखीच होती. मराठा समाजाच्या आंदोलनाच्या माध्यमांतून लोकसभेत एकगठ्ठा मतदारांमध्ये भ्रम निर्माण करण्यास मदत झाली. त्याचा फायदा म्हणावा त्या प्रमाणात सत्ताधारी पक्षांना घेता आला नाही. मात्र त्यानंतर त्यांनी ओबीसी आणि मराठा यांच्यातील ध्रुवीकरणावर लक्ष केंद्रीत करून लक्ष्मण हाकेंसारख्या प्रतिआंदोलकांना उभे करत काऊंटर एँक्शन घेत सामाजिक समिकरणे नीट करण्याचा प्रयत्न केला. त्याशिवाय कॉंग्रेसच्या जातीगत जन गणना या ना-यामधील ‘कमजोर कडी’ नेमकी हेरून आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मुद्यावर दलितांच्या मतांमध्ये फूट पाडण्यात आणि त्यांना ‘एक है तो सेफ है’ किंवा बटोगे कटोगेच्या ना-यातून बाजुला करण्यामध्ये भाजपला ब-यापैकी यश आल्याचे दिसत आहे. दलित समाजात पिढ्यान पिढ्या आरक्षणाचा फायदा घेतलेल्या नवबौध्द समाजा व्यतिरिक्त अनेक जाती आहेत ज्यांना अद्याप या आरक्षणाचा फायदा मिळू शकला नाही त्यांना उपवर्गीकरण्याच्या निर्णयांचा फायदा कसा होणार आहे? हे संघटनांच्या माध्यमातून पटवून देण्यात आल्याने दलित मतांची वर्गवारी करत त्यांना हिंदू मतांसोबत आणायचा प्रयत्न करण्यात आला. जेणेकरून महाआघाडीचा मोठा जनाधार बाजुला गेला आहे.
सर्वात महत्वाचे पराजयाचे कारण शरद पवार यांनी चक्क भाजपसोबत गेलेल्या अनेकांना सोबत आणून मैदानात उतरवले होते, त्यात हर्षवर्धन पाटील, समरजीत घाटगे यांच्यासारखे देवेंद्र फडणवीस यांच्या खास गटातील मोहरे पळविल्याच्या फुशारक्या मारण्यात आल्या. हेच लोक मागील काळात भाजप सोबत असतानाही महाआघाडीसमोर हारत आले आहेत यागोष्टीकडे लक्ष देण्यात आले नाही. केवळ ‘नगास नग’ म्हणून अनेक ठिकाणी सोडून गेलेल्या आमदारांच्या विरोधात माणसे उभी करण्यात आली होती. त्याला सहानुभूतीच्या, शिव्याशाप देण्याच्या किंवा वचपा काढण्याच्या इर्षेच्या भाषेची फोडणी देवून गर्दी जमविण्यात येत होती हेच आता निकालानंतर समोर आले आहे. अगदी कोकणात केसरकर यांच्यासमोर राजन तेली सारखे उमेदवार देताना नारायण राणे यांच्या सोबत शिवसेनेतून गेलेल्यांवर भिस्त ठेवण्याची नामुश्की ठाकरे यांच्यावर आल्याचे बोल ले जावू लागले होते. दुसरीकडे राणे शिंदेच्या सेनेतून आपल्या मुलांसाठी उमेदवारी देत होते हे चित्र मतदारांमध्ये वेगळा संदेश देणारे होते.
Maratha-reservation
जरांगे यांच्या सातत्याने मराठा आंदोलनाच्या आक्रमक वक्तव्यांमुळे मराठेतर समाज दुखावला गेला होता त्यांची आपसूक एकजूट होत गेली आणि ५२ टक्के विरुध्द ३२ टक्के समाज सत्ताधारी आणि विरोधकांच्या बाजूने आपसूकपणे करण्यात आला होता. ही चूक अंगाशी येवू शकते याचा अंदाज त्यावेळी शरद पवार यांना आला होता, त्यामुळे त्यांनी मराठा उमेदवार उभे करण्याच्या राजकारणापासून स्वत:ला वेगळे करण्याचा अगदी शेवटच्या क्षणाला प्रयत्न केला. त्याशिवाय पैसा आणि दबावाच्या राजकारणाचा देखील यथाशक्ती वापर सत्ताधारी पक्षांकडून नेहमी होतो त्यापेक्षा पाचपट अधिक होताना दिसत होता हे देखील मान्य करायला हवे.
जी
सर्वात महत्वाचा फॅक्टर अदानी होता. त्याच्या सोबतच्या पवारांच्या कथित बैठकांचा हवाला अजित पवार यांनी दिला असताना दुसरीकडे राहूल गांधी आणि उध्दव ठाकरे यांच्याकडून मात्र अदानीला उचलून फेकण्याच्या वक्तव्यांचा पाऊस पाडला जात होता. त्यातच संजय राउतांनी व्यापारी हा शब्द जोडून भर घातली. आणि गुजराती विरुध्द मराठी, महाराष्ट्र विरुध्द गुजरात अश्या मुद्यांना हवा देवून मतांच्या फाटाफुटीला चालना देण्यात आली. एकीकडे अदानी यांच्या प्रकल्पाला विरोध करण्याचा मुद्दा मांडायचा आणि दुसरीकडे राज्यातील प्रकल्प गुजरातला पळविले गेल्याचे देखील सांगायचे असा विरोधाभास महा आघाडीच्या प्रचारात होता. शिवसेनेच्या सत्तेवर असतानाचा आरे कारशेड  नाणार, बारसु प्रकल्पांना विरोध इत्यादी भुमिकांनंतर आता पुन्हा अदानीला विरोधांची भुमिका घेताना दुसरीकडे शरद पवार मात्र अदानीच्या बाजूने असल्याचा आरोप होताना त्यातील परस्पर विसंगत गोष्टींचा प्रतिवाद ठाकरे-गांधी यांना करता आला नाही. शेवटच्या टप्प्यात तर अदानीच्या मुद्यावर ठाकरे-गांधी विरुध्द शरद पवार असे चित्र महा आघाडीत निर्माण झाल्याचे दिसले.
सर्वात महत्वाचे म्हणजे आघाडीच्या तीन पक्षांच्या नेत्यांचा एकत्र प्रचार मतदारांवर बिंबवण्यात त्यांना यश आले नाही. शरद पवार, राहूल गांधी आणि ठाकरे यांच्यात प्रचारा दरम्यान आपापले पाहण्याच्या वृत्तीचा परिणाम कार्यकर्त्यामध्ये दरी मिटवण्यात अपयश आल्याचे पहायला मिळाले. निवडणूक आयोगाने उशीराने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर विरोधकांच्या बाजुला शेवटच्या काही दिवसांत प्रचारासाठी धावपळ होताना दिसली. मुंबई बाहेर न जाणारे ठाकरे सातत्याने बाहेर होते, तर ८४ वर्षांचे शरद पवार नातवाच्या राजकीय पदार्पणासाठी बारामतीच्या भोवती अडकून राहिले होते. अशी सर्व बाजुनी विरोधकांची मोर्चेबांधणी करणा-या देवेंद्र फडणवीस यांच्यावरील व्यक्तिगत प्रचार. कन्हैया कुमार सारख्या नेत्यांकडून त्यांच्या कुटूंबियांवर झालेली टिका टिपणी, त्याचवेळी मुन्ना महाडीक यांच्यासारख्या नेत्याकडून करण्यात आलेल्या वक्तव्यांचा राजकीय फायदा घेण्यात आलेले अपयश अश्या अनेक लहान मोठ्या मुद्यांचा परिपाक जिंकता जिंकता हारण्यात झाला असे म्हणावे लागेल. जो हारलेल्या बाजीला जिंकतो त्याला सिंकदर म्हणतात असे फिल्मी गाणे आहे, पण जो पराकोटीच्या जिंकण्याच्या शक्यतेलाही हारण्यात बदलून दाखवतो त्याला काँग्रेस म्हणतात, अशी टवाळी आता होवू लागली आहे. आता या चर्चा अश्याच अनेक दिवस सुरू राहणार आहेत, तुर्तास ऐवढेच!
निवडणूक विशेष
किशोर आपटे
(लेखक व राजकीय विश्लेषक)
Social Media

One thought on “बारामती विरुध्द भानामती? महायुतीचा ‘जबरदस्त’ की ‘जबरदस्तीचा’ विजय म्हणायचे? : भांवावलेल्या विरोधकांसह मतदारांसमोर यक्षप्रश्न!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *