मंगल निधी…

आज, आपल्या आजूबाजूला बघितलं तर, नैराश्याचं वातावरण दिसून येते. कोरना प्रकोपामुळे एक अनामिक भिती सर्वांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम सर्व ठिकाणी बघायला मिळतो. अशातच काही सुखद घटना घडतात आणि काही काळ तरी आपलं मन त्यात रममाण होतं.

या परम पवित्र भारत मातेला जर वैभवाच्या शिखरापर्यंत न्यायचं असेल तर भटक्या विमुक्तांसह अवघा हिंदू समाज संघटीत झाला पाहिजे. या समाजातला प्रत्येक घटक बलशाली झाला पाहिजे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक सेवाभावी प्रकल्पांपैकी भटके विमुक्त विकास परिषद हा एक प्रकल्प. संघाच्या स्वयं सेवकांनी आणि संस्थेच्या सदस्यांनी अक्षरश: स्वत:ला या दैवी कार्यात झोकून दिले आहे.
“सब समाज को लिये साथ मे, आगे है बढते जाना”, हे “सिद्ध” करण्यासाठी “बंधुभाव हाच धर्म” हे ब्रीद घेऊन वाटचाल करणारी संस्था म्हणजे “भटके-विमुक्त विकास परिषद” आत्ताची “भटके विमुक्त कल्याणकारी संस्था”,विविध उपक्रमांद्वारे कार्यरत आहे. आजवर पाच बिऱ्हाड परिषदांच यशस्वी आयोजन करण्यात आले. समाज बांधवांच्या समस्या निवारणा सोबतच, कार्यकर्ता सम्मेलन, “पालावरची शाळा”, स्वच्छता अभियान, निवासी अभ्यासिका यांसारख्या संस्थेतर्फे राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांना भटके समाज बांधवांचा मिळणारा सक्रीय सहभाग वाखाणण्या सारखा आहे. ही संस्था आज, भटके समाज बांधवांसाठी अविरत कार्य करणारे एक आधारवड म्हणून पुढे आली आहे.

शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असं जेव्हा कार्यकर्त्यांच्या लक्षात आल तेव्हा सुरु झाली ती “पालावरची शाळा”. हा उपक्रम खूप समाजाभिमुख झालेला आहे. एक पथदर्शी प्रकल्प म्हणून त्याच्याकडे बघितल जाते. भंडारा गोंदिया आणि नागपूर जिल्हा मिळून एकंदर १४ शाळा चालविल्या जातात. वस्तीतील विद्यार्थी आज या पालावरच्या शाळेत संस्कारित होत आहेत. तिथल्याच एखाद्या मुलाला अथवा मुलीला “आचार्य” म्हणून नियुक्त केलं जात. तिथल्या मुलांना चांगले संस्कार मिळावेत, शाळेची आवड लागावी यासाठीचा हा प्रयत्न. या पालावरच्या शाळेमधून विविध उपक्रम राबविले जातात. पारंपारिक नृत्य, गाणी, कथा, तसेच मुलांच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना कसं विकसित करता येईल यावर भर दिला जातो. शारीरिक स्वच्छता आणि परिसर स्वच्छता यावर भर दिला जातो. ही शाळा कधी झाडाखाली, कधी ओसरीत. मुलांमध्ये झालेला बदल हा वाखाणण्याजोगा आहे.

एखादी अगदीच लहानशी घटनासुद्धा सर्वांसाठी पथदर्शक ठरू शकते. असाच एक प्रसंग नुकताच घडला. मन भरून आलं. संस्थेचे सुरू असलेले कार्य अगदी योग्य दिशेने, सकारात्मक दृष्टीने, सुरू आहे याची खात्री पटली.  नुकताच दोन “आचार्यांचा” विवाह सोहळा अनुभवण्याचा योग आला. एकाच मंडपात दोन लग्न पार पडले. एक आचार्य “वर” तर दुसरी “वधू”. साकोली तालुक्यातील खैरलांजी येथील गोपाळ वस्तीतील कु.ज्योती व कु.आरती शिवणकर या दोन बहिणीं. यातील कु.ज्योती ही D.Ed.शिक्षीत असुन भटके विमुक्त कल्याणकारी संस्थे द्वारा चालणाऱ्या पालावरच्या शाळेची “आचार्या” आहे. मिथुन भेंडारकर हा नुकताच बारावी उत्तीर्ण झालेला, आमचा “आचार्य”. चि.सौ.का. ज्योतीचं शुभमंगल, श्री संजय शेंद्रे यांचे सोबत तर श्री मिथुनचं, चि.सौ.कां. आरती हिचे सोबत, जातीच्या रीतीरिवाजानुसार संपन्न झाले.

कोरोना काळ, फार कमी उपस्थिती. परंतु सर्व गोष्टी कशा गोपाळ समाज बांधवांच्या रीतीप्रमाणे झाल्यात. मंगलाष्टके झालीत. वधू-वरांनी एकमेकांना वरमाला घातली. टाळ्यांचा कडकडाट झाला. अगदी देखणा लग्न सोहळा. होय देखणा! असंचं त्याचं वर्णन. या समारंभात भटके विमुक्त कल्याणकारी संस्थेचे श्री.दिलिपजी चित्रिवेकर दांपत्य, श्री शामरावजी शिवणकर, राहुलजी आवरकर तसेच गजेन्द्र कोसलकर व नगर सेवा प्रमुख शिवम चंद्रवंशी आवर्जुन उपस्थित होते. भेटवस्तूंचा सोपस्कार पण आटोपला गेला. आचार्य (वधू) भगिनीने, आमच्या कार्यकर्त्यांसह मंचावर फोटोसेशन आटोपलेले. आणि…
..आणि त्या दोन नवदाम्पत्यांनी एक “लिफाफा” कार्यकर्त्यांना सुपूर्द केला. हे अनपेक्षित होतं सर्वांना. त्यांनी खुलासा केला, “गेली दोन वर्ष आम्ही पालावरच्या शाळेत शिकवलं. आम्हाला “आचार्य” म्हणून ओळख मिळाली. समाजाची अनेक रखडलेली कामे संघटनेच्या माध्यमातून होतांना आम्ही बघितली. अशावेळी आमच्या समाजासाठी जीवाभावाने कार्य करणाऱ्या संघटनेला आमची ही छोटीशी भेट! समजा. सारेच अवाक झाले. नम्रपणे दिलेली भेट आमच्या कार्यकर्त्यांनी स्वीकारली. तोच “मंगलनिधी”.
या आचार्यांनी त्यांना मिळालेल्या भेट रकमेपैकी काही रक्कम मंगल निधि म्हणून संस्थेस दिली.
“मंगलनिधी”. किती सुंदर आणि मार्मिक असं नाव आहे हे. मंगल प्रसंगी, मंगल हातांनी, अत्यंत मंगल (प्रसन्न) चित्ताने, मंगल कार्यासाठी दिलेला निधी!

मला आठवतं लॉकडाउन घोषित झाल्याबरोबर, भंडारा जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भटके विमुक्त कल्याणकारी संस्था यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील भटके समाज बांधवांच्या वस्त्यांमधून जीवनोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. भंडारा जिल्ह्यातील ५४ वस्त्यांवर स्वयंसेवक/कार्यकर्ते द्वारा धान्य तांदूळ, गहू, कणिक वाटण्यात आले. पुढे चहा, साखर, तेल, तिखट, हळद, मीठ, मसाले, बेसन आणि सोयाबीन वड्या असे साधारणत: आठवडाभर पुरेल एवढे, एकत्रित (कीट) साहित्य वाटप करण्यात आले होते.
“मंगल निधि” च्या स्वरुपात, भटके समाज बांधवांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली असेच म्हणावे लागते.
“घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे| घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे|” याचा, प्रत्यय हा प्रसंग सांगून जातो. सततच “मागून”, उदरनिर्वाह करणारा समाज, आता आपल्या “घासातला घास” द्यायला लागला हे काही कमी नव्हे. “परिसस्पर्श” म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरू नये.

आजच्या या बदललेल्या परिस्थितीत, अल्पप्रमाणात, ५० ते १०० उपस्थितांसोबत आटोपणारे “लग्नकार्य”, “व्रतबंध”, “नूतन गृहप्रवेश” हे समीकरणच झालेले आहे. अशावेळी समाजाभिमुख कार्य करणाऱ्या संस्था/संघटना यांना आपणही “मंगल निधी” द्यायला काय हरकत आहे?
या दोन जोडप्यांनी एक आदर्श घालून दिला आहे. आपणही तो पुढे चालवू या..

श्रीकांत भास्कर तिजारे
९४२३३८३९६६

Social Media