मंकी बात…

राजकारण हरले, लोकशाही जिंकली!

लोकसभेच्या २०२४च्या अभूतपूर्व राजकीय उलथापालथीच्या निवडणुकांचा अपेक्षीत निकाल लागला. त्यात महाविकास आघाडीच्या उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray)गटाला सर्वाधिक जागा लढवून केवळ ९ जागी यश मिळाले तर दहा जागा लढून अनुभवी शरद पवार (Sharad Pawar)यांनी इप्सित साध्य करून घेतले. कोणताही चेहरा, राज्यातील नेता नसलेल्या कॉंग्रेसला राहूल गांधी(Rahul Gandhi) यांच्या प्रतिमेवर आणि न्यायपत्राच्या प्रचार अप्रचारामुळे मोदींच्या ४२ सभांमुळे (कारण ते दहा वर्षानंतरही सारखे कॉंग्रेस आणि नेहरूंना शिव्याशाप देत होते!) रामभरोसे १२ आणि सांगलीत एक बोनस जागा मिळाली. तर पाच वर्ष फक्त निवडणुकांच्या राजकारणासाठी सर्वसवंग साधनांचा वापर करणा-या भाजपच्या आक्रस्ताळी वर्तनाच्या नेत्यांना आकाश पातळ एक करूनही उबाठा इतकेच महत्व देत मतदारांनी ठाकरेंच्या पंक्तीला आणून बसवले आहे. यातून राजकारण नाही तर लोकांच्या हाती असलेली लोकशाही जिंकली असे सर्वसाधारणपणे म्हणता येते.

EVM

(इवीएम यंत्र )
सर्वसाधारण राजकीय अभिनिवेश किंवा वस्तुनिष्ठ आकलन करणा-या आमच्या सारख्यांना हा लोकसभा (Lok Sabha)२०२४चा निकाल अपेक्षीतच होता याचे कारण याबाबतची भाकीते यापूर्वी आपण या स्तंभातून केली आहेत. ती ब-याच प्रमाणात निकालांशी मिळती जुळती आहेत. जाहिरात आत्मस्तुती आत्मप्रौढी करायची नाही हे पथ्य सांभाळायचे म्हटले तरी आजच्या विश्लेषणांच्या कोलाहलात आणि सेफोलोजीच्या धंदेवाईक रणऩितीच्या महापूरात सर्वेक्षण आणि एक्सपर्टाइजच्या चकाचौंधमध्ये खरा निवडणूक निकालाचा मतितार्थ बाजुलाच राहिला आहे. त्यामुळे येथे आपण आधीपासून जे आकलन केले त्याची मिमांसा करणे क्रमप्राप्त आहे.

महाराष्ट्रात (Maharashtra)२०१९ नंतर जे काही राजकीय महत्बाकांक्षाचे कोंब शिवसेना(Shiv Sena) आणि नंतरच्या भाजपच्या राजकारणाला फुटले आणि त्यातून त्यांनी जे काही पाच वर्ष जनतेला गृहित धरून मनमानी राजकीय चाळे केले त्यासर्वाना धडा देणारा हा निकाल आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यामुळेच निकालानंतर सायंकाळी उशीरा भाजपचे कर्तेधर्ते नेते माध्यमांसमोर न येता व्टिट करून मोकळे झाले. जल्लोष साठी केलेल्या तयारीचे वातावरण पक्षकार्यालयाबाहेर बेहोश होण्यामध्ये परावर्तीत झाले! सेना भवनाच्या बाहेर जमलेल्या गर्दीत किंवा भाजप कार्यालयाच्या गर्दीत एक गुढ शांतता होती, ती जाणत्यांनी हेरली नाही तरच नवल! ‘अहम ब्रम्हास्मीचा भाव गळून पडावा आणि अचानक विरक्तीभाव यावा अश्या या वातावरणात मी मी म्हणणारे महाभाग निकालानंतर कॅमेरासमोर येण्याचे धारिष्ट्य दाखवू शकले नाहीत.

ShivSena
ठाकरे-पवार-पटोले

या निकालात देशात ३०३ जागा घेत २०१९मध्ये पाशवी बहुमताचा डंका वाजवत आलेल्या भाजप मोदी शहा(Modi Shah) यांच्या पक्षाला आयोध्येच्या निकालासह देशभरात जनतेने २३९च्या घरात आणून ठेवले. सापशिडीच्या खेळात जसे गर्वहरण सेकंदात होते तसे मुमकीन है च्या घोषणा देणारे आघाडीच्या नेत्यांची भलावण करणारी भाषणे करण्यास मजबूर झाले. तर दुसरीकडे महागठबंधनच्या माध्यमातून देशात भाजपला मात देण्याची स्वप्न पाहणारे ठाकरे, गांधी, यादव, पवार, केजरीवाल, बँनर्जी यांचे स्वप्नरंजनही पूर्ण बहुमताच्या आकड्यापासून तेवढ्याच अंतरावर आहे जेवढे एकगठ्ठा भाजपचे अंतर आहे हे लक्षात आले. चिराग पासवान(Chirag Paswan), एकनाथ शिंदे(Eknath Shinde), बिजु पटनायक(Biju Patnaik), चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu),नितीश कुमार (Nitish Kumar)अश्या घटकपक्षांना महत्वाचे स्थान आले असून किमान पाच ते २५ जागा असणा-यांची ही संख्या ६० ते ६५ च्या घरात आहे. त्यातील महत्वाचे मोहरे आहेत ते नितीश आणि नायडू त्यांची बेरीज ३० होते त्याना बाजुला केले तर किंवा ते ज्यांच्या सोबत जातील त्यांचे सरकार सत्तेवर काठाचे बहुमत घेणार आहे. आघाडीचे राजकारण बाजुला करत २०१४मध्ये ज्या मोदींना देशाने दोनदा संपूर्ण बहुमत दिले त्यांना ही जिवघेणी कसरत करण्याचा टास्क देवून ‘ये पब्लिक है सब जानती है’ असा कौल मतदारांनी दिला आहे. हे आव्हान अंहकारी मोदींना झेपते की नाही ते येत्या दिवसात समजेल आणि पुन्हा मागच्या दमननितीने ते वागायचे म्हणतील तरी त्यांना ती शक्ती मिळणार नाही अशी पाचर लोकशाहीने मारून ठेवली आहे म्हणजे ‘राजकारण हरले लोकशाही जिंकली’ हे शिर्षक का दिले आहे ते लक्षात येते!
Nitish-Kumar
मोदी-नितीश-नायडू

आता महाराष्ट्रात पाहूया. जागावाटपात सहकारी पक्षाना शेवटच्या मिनीटापर्यंत झुंजायची वेळ आणत भाजपने स्वत:कडे उमेदवारही नसल्याचे दाखवून दिले तेंव्हाच त्यांची आर्धी हार झाल्याचे चित्र होते. पण माध्यमांतून पेरलेले भाट जी हाकाटी करून वेळ मारून नेत होते त्यात खरा वास्तव चेहरा झाकला जात होता. पण मतदार शहाणे ठरले, त्यांनी २८ जागा लढणारे भाजप आणि २१ जागा घेत आता आम्हीच चा आव आणणारे शिवसेना ठाकरे पक्षाला जमीनीवर आणले आहे. सिंधुदूर्ग, रायगड, ठाणे, पालघर, कल्याण या कोकणपट्टयात भाजप आणि शिंदे यांनी सत्ता आणि साम-दाम-दंड-भेद नितीचा वापर करून ठाकरेंना मात दिली हे बोलले जात आहे. त्यात महायुतीचे तीनही घटक लाभार्थी ठरले. पण ही बाब पवारांच्या बारामतीमध्ये करणे त्यांना शक्य झाले नाही. हे पुन्हा एकदा सिध्द झाले. शरद पवार (Sharad Pawar)यांनी आपल्या कौशल्यातून पूर्वीपेक्षा जास्त जागा तर घेतल्याच पण राजकीय बदला घेत बारामतीत आपले वर्चस्व कायम ठेवले ही बाब ठाकरेंना ठाणे, कोकण, मुंबईत करणे शक्य होते मात्र त्यांचे दरबारी राजकारण त्यात आड आल्याचे पहायला मिळाले.  अगदी सांगलीत त्यांनी आघाडीचा धर्म म्हणत आता टिप्पणी केली तरी मुळात जागा जाहीर करताना त्यांनी स्वत: तरी हा धर्म का पाळला नव्हता? ते सांगितले नाही. कोल्हापूरची जागा शाहू महाराज(Shahu Maharaj) यांना सोडताना त्या बदल्यात रामटेकची जुनी जागा पदरात पाडून घेतली असती तर फायदा झाला असता पण हा मुत्सद्दीपणा त्यांच्याकडे दिसला नाही. केवळ (माझ्या वडीलांचा पक्ष आणि चिन्ह) सहानूभूती आणि (माझे वडील) विभूती या भांडवलावर त्यांनी निवडणूकीत लोकांच्या प्रश्नावर काय करणार? यावर जोर दिला नाही. जे कॉंग्रेसच्या न्यायपत्रात दिसले त्याचा फायदा राहूल गांधी(Rahul Gandhi) फारसे राज्यात आले नाहीत आणि मोदी गरागरा फिरले तरी होताना दिसला. राज्यात कॉंग्रेसकडे सर्वमान्य राजकीय चेहरा नसताना आणि आहेत त्या  नेत्यांमध्ये फारसा जोश समन्वय आणि सर्वसमावेशकता नसताना त्यांना १२ अधिक १ जागा मिळाल्या. याचा अन्वयार्थ ‘लोकशाही जिंकली राजकारण हरले’ असा केला तर वावगे वाटायचे कारण नाही.

Devendra-Fadnavis-Eknath-Shinde-Ajit-Pawa
अजित पवार, फडणवीस, शिंदे

राष्ट्रवादीतून वेगळी चूल मांडणारे अजित पवार(Ajit Pawar) आता राज्यसभा पदरात पाडून घेण्यासाठी थांबले आहेत, त्यानंतर ते पुन्हा घरवापसी करण्याची शक्यता आहे. पण चाणाक्ष ठरले ते मुख्यमंत्री शिंदे(Chief Minister Shinde) त्यांनी आपल्या पदाचा फायदा घेत जास्तीच्या जागा धावपळ करून मिळवल्या आणि शेवटच्या क्षणापर्यत पालघर, ठाणे सह कोकण मध्ये आपला करिश्मा दाखवला त्यामुळे त्यांना भाजपकडून किंवा राष्ट्रवादी अजित कडून आता मानसन्मान द्यावा लागणार आहे. भाजपला त्यांना हटविण्याची केलेली तयारी बाजुला ठेवून विधानसभेसाठी त्यांची ‘भाईगिरी’ मानायची तयारी करावी लागणार आहे. कारण या निकालाने भाजपचा विधानसभेचा रस्ता आता जास्त कठीण केला आहे. नरेंद्र ते देवेंद्र नेत्यांना आत्मचिंतनासाठी म्हाळगी प्रबोधीनीत बसावे लागणार आहे आपला जुना बाज आणावा लागणार आहे. हे ही नसे थोडके!

शेवटचे आता मुंबईत उत्तर पश्चिम मतदारसंघात लोकशाहीच्या निवडणूक प्रक्रियेत जे समोर येवू नये ते समोर आलेच आणि राजकीय मेकअपच्या मागचा राजकारणाच्या गलिच्छपणाचा जंगली चेहरा पहायला मिळाला. मुंबई उत्तर पश्चिम मतदार संघात मतमोजणी मध्ये पहिल्या वेळेस २२०० मतांनी अमोल कीर्तिकर विजयी झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केले. त्या विरोधात रविंद्र वायकरांनी फेरमोजणी साठी अर्ज केला. त्यांचा प्रथम अर्ज फेटाळण्यात आला. पण नंतर ‘वरून’ फोन आल्यामुळे फेरमोजणी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातही १७८५  मतांनी अमोल कीर्तिकर यांना विजयी घोषित करण्यात आले. परंतु पुन्हा फेरमोजणी करण्यात येऊन ६३१मतांनी अमोल कीर्तिकर यांना विजयी घोषित करण्यात आले. त्यानंतर किर्तीकर यांची पुन्हा फेरमोजणी मध्ये 1 मताने अमोल आघाडीवर असल्याचे सांगण्यात आले व सरते शेवटी पोस्टल बॅलेट च्या माध्यमातून ४८ मतांनी रविंद्र वायकर यांना विजयी करण्यात आले….. यात प्रश्न असा पडतो की त्याच मतमोजणी अधिका-यांनी त्याच मतांमध्ये प्रत्येक मोजणी चुकीची केली असेल तर राज्यभर आणि देशभर जे निकाल लागले किंवा जाहीर झाले आहेत त्यांची तरी नेमकी काय विश्वासार्हता असेल?

अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar )यांना प्रथम विजयी आणि नंतर पराभूत ठरविण्या मागे नक्की चूक कोणाची आहे? किंवा दोषी नेमके कोण आहे ? निवडणूक आयोग(Election Commission) की मतमोजणी करणारा कर्मचारी वर्ग की EVM मशीन बनवणारी कंपनी की हॅकर्स की पोस्टल बॅलेट पेपर (Postal ballot papers)संबधी दूरदृष्टी वापरून बदलले गेलेले नियम की या सगळ्यांना कारणीभूत असणारी, पुन्हा,पुन्हा आणि पुन्हा निवडून येण्यासाठी, षडयंत्र रचणारी, पाताळयंत्री राजकीय मंडळी? की हा सगळा खेळ निमूटपणे बघणारे, वरून आलेल्या फोन चे आदेश तंतोतंत पाळणारे आणि सगळे माहिती असून देखील जाणीवपूर्वक मौन बाळगणारे सरकारी कर्मचारी??? जनतारुपी जनार्दनाचा हा कौल खरा कसा? हे आता सर्वोच्च न्यायालयाला विचारले जाणार आहे…. लोकशाही राज्यात संविधानाने देऊ केलेल्या न्यायाची अपेक्षा बाळगत आहे……सर्व सामान्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अमोल कीर्तिकरांच्या निवडणूक मतदानानंतर त्यांच्या वडिलांनी  केलेल्या राजकीय टिप्पणीचा तर हा प्रसाद नाही ना? त्यांना कोणी न्याय देता का न्याय?? असा टाहो फोडायची वेळ आणून ‘हमसे पंगा नही लेना’ असे तर महाशक्तीने सुचवले नाही ना?. असे प्रश्न उपस्थित झाले आणि पुन्हा एकदा साम दाम दंड भेद निती या निकालात शेवटपर्यत कशी वापरली गेली याचा अनुभव आला.

असाच काहीसा अनुभव पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांना मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यत आला, राजकारणात केलेले शत्रुत्व कसे मागे लागते? आणि घात करते याचा मोठा धडा त्यांनाही पुन्हा एकदा मिळाला आहे. जसे जळगावात एकनाथ खडसे(Eknath Khadse) अनुभव घेत आहेत या राजकारणात असे अनेकांचे बळी गेले आहेत. त्याबद्दल आता ज्यांनी त्यांनी चिंतन करावे असा हा निकाल आहे.

पूर्ण

 

Social Media