राज्याच्या कल्याणा नेत्यांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे!
लोकसभा निवडणूकीत(Lok Sabha elections) महाराष्ट्रातील जनतेने भारतीय जनता पक्ष(bjp) आणि त्यांच्या मित्रपक्षांना झिडकारल्याचे चित्र निकालानंतर दिसले असले तरी ही वस्तुस्थिती समजून घ्यायला महायुती आणि महाशक्तीचे केंद्रीय आणि राज्यातील नेते तयार नाहीत. त्यांच्या मते केवळ काही लाख मतांचा फरक युती आणि आघाडीत आहे आणि तो आता सवंग घोषणा करून भरून निघणार आहे! २०१९ पासून २०२४पर्यंत महाराष्ट्रात (Maharashtra)केवळ सत्ताधारी आणि विरोधकांच्या खुर्चीच्या राजकारणात सर्वसामान्य जनता भरडून निघाली आहे.
त्यामुळे आता भाजपच्या पुण्यात झालेले राज्यस्तरीय अधिवेशनानंतर भाजपातून अन्य पक्षांत जाणा-यांचे आऊटगोईंग सुरू झाले आहे. केंद्रिय नेत्यांनी शरद पवार(Sharad Pawar) आणि उध्दव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्यावर शेलक्या शब्दात टिका केल्यानंतर महायुतीमधील अजित पवार(Ajit Pawar) गटाच्या अनेक आमदारांकडूनही शरद पवार(Sharad Pawar) यांच्याबद्दल अशी भाषा योग्य नसल्याचे वक्तव्य करण्यात आले तर अजितदादांच्या राष्ट्रवादीत दबक्या आवाजात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. ‘हम तो डुबेंगेही तुमको लेके सनम’ असे केंद्रातील भाजप नेत्यांचे वक्तव्य असल्याचे राष्ट्रवादी अजीत पवार(Ajit Pawar) गटाचे अनेक नेते खाजगीत सांगू लागले आहेत. पुण्यात झालेल्या भाजप अधिवेशनात राज्याच्या गृहमंत्र्यांनी विरोधकांना ठोकून काढा असे सांगत निष्ठावंत भाजप कार्यकर्ते हे काहीच अपेक्षा बाळगत नसल्याचे वक्तव्य केल्याने त्यांच्या या वक्तव्यावर खाजगीत अनेक भाजप निष्ठावंत चिड आणि सात्विक संताप व्यक्त करताना दिसत आहेत. त्यामुळेच की काय? या अधिवेशनानंतरही निष्ठावंत समजल्या जाणा-या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांपैकी फारसे कुणी पक्षाची बाजू मांडायला पुढे येताना दिसत नाहीत. मग प्रसाद लाड, प्रविण दरेकर, चित्रा वाघ, राम कदम, गोपीचंद पडळकर अश्या अलिकडच्या काळात म्हणजे २०१४ नंतर उदयास आलेल्या नेत्यांकडून पक्षाची बाजू मांडली जात आहे. जरांगे पाटील (Jarange Patil)आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टिका किंवा टिप्पणी करताना पुन्हा ताळतंत्र सोडून वक्तव्यांची खैरात होताना दिसत आहे.
आगामी विधानसभा निवडणूक(Assembly elections) डोळ्यासमोर ठेवून अनिल देशमुख(Anil Deshmukh), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्यात कलगीतुरा रंगल्याचे पहायला मिळाले असून पुन्हा एकदा मागील कालखंडातील घटनांची उजळणी आरोप प्रत्यारोप आणि राजकारण विनाकारण रंगताना दिसत आहे. दावे प्रतिदावे आणि तुझ्यागळा माझ्या गळा सुरू झाले आहे. त्यातून केवळ बालिशपणाचे राजकारण(politics) होताना दिसत आहे. लोकसभेत जनतेने सा-या नेत्यांना धडा देण्याचा प्रयत्न केला मात्र तेवढ्याने या नेत्यांचे भागले नसावे असे एकूणच परिस्थिती पाहता म्हणावेसे वाटत आहे. मागील काळात भाजपने किंवा आघाडीच्या नेत्यांमध्ये सूडाचे किंवा बदल्याचे राजकारण झाल्याचे पहायला ऐकायला मिळाले त्यातून सामान्य जनतेचे महाराष्ट्राचे कोणते हित साधले याचे उत्तर या नेत्यांकडे नाही, मात्र त्याची कुणाला खंत खेद किंवा लाज असावी असे त्यांच्या वक्तव्य आणि वर्तनातून दिसत नाही.
मग दुसरीकडे, दररोज सकाळी शिवसेना कम राष्ट्रवादी आणि कधी कधी कॉंग्रेसचे प्रवक्ते असल्यासारखे खासदार संजय राऊत(Sanjay Raut) माध्यमांच्या प्रतिनीधींच्या प्रश्नाना उत्तरे देताना आपल्या खास शैलीत महायुती आणि भाजपच्या नेत्यांना डिवचतात आणि त्यानंतर सुषमा अंधारे, जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे, निलेश लंके, अमोल कोल्हे, हे देखील वक्तव्यांची आतषबाजी करताना दिसतात. त्यानंतर आशिष शेलार, राजू वाघमारे, संजय निरुपम, संजय शिरसाठ, नरेश म्हस्के, नितेश राणे अशी दुसरी फळीतील प्रवक्त्यांची नुराकुस्ती पहायला मिळते. त्यात अधून मधून चंद्रशेखर बावनकुळे जयंत पाटील, नाना पटोले, प्रकाश आंबेडकर, मनोज जरांगे पाटील, प्रकाश अण्णा शेंडगे, सदाभाऊ खोत, यांच्यासारखे नेते मसाला देण्याचे काम करतात. अश्या महनीय नेत्यांच्या वक्तव्यांच्या गदारोळात गेल्या तीन चार वर्षात सामान्य माणसांच्या जगण्या मरण्याचे प्रश्न बाजुला राहिले असून केवळ नेत्या प्रवक्त्यांच्या गोतावळा नळावरच्या भांडणासारखे कचाकचा भांडून आपल्या पक्षाची निष्टा व्यक्त करत एकमेकांना नामोहरम केल्याचे मानताना दिसतात. पण तरीही शेतकरी, महिला, युवक, बेरोजगार, दलित, आदिवासी, दिव्यांग असे समाजाच्या अनेक घटकांचे प्रश्न जसेच्या तसे राहताना दिसतात.
या नेत्यांच्या या बडबडीला आणखी प्रोत्साहन देण्यासाठी मग देवेंद्र फडणवीस, उध्दव ठाकरे, राज ठाकरे, मुख्यमंत्री शिंदे, शरद पवार, राहूल गांधी अमित शहा, केंद्रीय नेते भर घालायचे काम प्रामाणिकपणे करताना दिसतात. त्यातून गेल्या पाच वर्षात सर्वसामान्य जनता आबादी आबाद झाली असून आता केवळ लाडक्या बहिणी, भाऊ, काका ,मामा आत्या ताई माई अक्का अश्या नातेवाईकांचे भले करण्याची चढाओढ लागल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे मग आता कुणी शेतक-यांना मोफत वीज देणारी योजना जाहीर करत आहेत. तर कुणी मुलींना मोफत शिक्षण देणारी योजना लागू करत आहेत. तर कुणी बेरोजगारांना नोकरी न देता स्टायपेंड जाहीर करत आहेत. इतके करूनही मग काही तरी राहून जात असावे असे वाटल्याने मुख्यमंत्री तिर्थयात्रा योजना जाहीर करत आहेत. असे सगळे मिळून लोकांना माहितीच नसलेल्या कल्याणकारी कामात स्वत:ला गाडून घेत आहेत. जणू काही ‘राज्याच्या कल्याणा नेत्यांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे’ असेच संत तुकोबांना म्हणावेसे वाटावे. इतकी अजीजी इतका जनतेच्या हिताचा कळवळा या सा-या सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्याना आला आहे. पण कर्मदरिद्री जनता मात्र या सा-या उदात्त, निरामय आणि प्रामाणिक सात्विकपणाच्या कार्याकडे डोळेझाक करत महागाई, आरक्षण, भ्रष्टाचार, अत्याचार, बेरोजगारी स्पर्धा परिक्षांमधील काळाबाजार, इत्यादी इत्यादी वितंड वादांमध्ये धन्यता मानताना दिसते आहे. काय म्हणावे या करंटे लोकांना सा-या महाराष्ट्राचे नेते मंडळी जनकल्याणासाठी चंदनासारखे झिजण्यास त त्पर असताना हे लोक मात्र त्यांच्या नावाने समूह माध्यमांतून टिका करतात. आरोप आणि टवाळी करतात. हे सर्वथा अनैतिक आणि अस्विकार्य आहे. महाराष्ट्रात जन्मलेल्या या जनहितवादी नेत्यांच्या या लोक कळवळ्याची जनता दखल घेवो इडापिडा टळो अन सुखाचे दिवस येवो अशी प्रार्थना करणे तेवढेच आपल्या हाती राहते नाही का?
किशोर आपटे
(राजकीय विश्लेषक)