मंकी बात…

प्रगतीशील महाराष्ट्र अंधारयुगात नेवून. शिवरायांचा अवमान करणाऱ्या अवलादी ओळखा!.

महाराजांचा महाराष्ट्र बटिक गुलाम होवू द्यायचा नसेल तर जागे रहा!

महाराष्ट्राच्या(Maharashtra) समाजकारण, अर्थकारण आणि राजकारणाचा गेल्या काही वर्षापासून अक्षरश: चोथा झाला आहे. निलाजरे, नालायक, सवंग लोक वाटेल त्या पध्दतीने राज्यघटना कायदा(Constitution Act) नितीमत्ता सारे काही खुंटीला टांगून सत्तेवर आले आहेत, आकंठ भ्रष्टाचार करूनही महाराष्ट्राची लूट केली आहे. त्यांचे कुणीच काही वाकडे करू शकत नाही या समज किंवा गैरसमजातून त्यांना सत्ता-पैसा- आणि स्वत:च्या नसूनही असलेल्या शक्तीचा माज आला आहे.

अजाण वयातील बालिकांवर लैंगिक अत्याचार(Sexual assault) झाले तर सत्ताधा-यांशी संबधित शिक्षणसंस्था आहे म्हणून त्या अबोध बालिकांच्या अन्यायाला काहीच अर्थ, किंमत, न्याय न देता चिरडून टाकले जात आहे. ज्यांना या देशाचे या समाजाचे आदर्श समजून शेकडोवर्ष आमच्या अनेक पिढ्या जगल्या त्या छत्रपतींच्या शिवप्रभूंच्या नावाचा राजकीय मलिदा खाण्यासाठी वापर करताना त्यांच्याच प्रतिमेची निर्लज्जपणे अवहेलना केली जाते? आणि यावर जाब विचारण्यास कुणी प्रयत्न केला तर त्याला उडवाउडवीची उत्तरे, अरेरावीची भाषा आणि मिजासखोरपणे माफी देखील मागण्याचा आव आणून शांत करायचा प्रयत्न केला जातो. जगण्याची सारी नैतिकता नितीमुल्य आदर्श पायदळी तुडवून या राज्यात सुल्तानी राक्षसी राजवट सुरू आहे? जणू बेबंदशाही, दुसरी मोगलाईच(Moghlai) आली आहे.

तरी बरे शहाण्या मराठी माणसाने अवघ्या चार महिन्यांपूर्वी या माजखोर सत्ताधिशांना लोकसभेच्या निवडणूकीत ४८ पैकी केवळ १७ गुण दिले आहेत. पण तरीही यांचा आवेश, आवेग अगदी असा आहे जणू आता विधानसभा नव्हे सारे जगच जिंकायला निघाले आहेत! म्हणूनच महाराष्ट्रात आता सुज्ञ सुजाण तरुणांना निवडणुकांच्या राजकारणात यावेच लागणार आहे. प्रस्थापित राजकीय पक्षांची भेंडोळी बाजुला करून आता विधानसभा निवडणूकांमध्ये (Assembly elections)प्रत्येक तालुका, गाव आणि मोहल्ल्यातील सुजाण, सुज्ञ, सुशिक्षितांना आपल्या हिताचा कुणी लोकप्रतिनीधी तयार करावा लागणार आहे. त्याला अपक्ष निवडणूकीत उभा करून निवडून द्यायला हवा आहे. प्रस्थापित एकाही राजकीय पक्षाला मते न देण्याचा संकल्प करून सध्याच्या सा-या नेत्यांना घरी पाठवायची हीच तर वेळ आहे.

सध्या या शिवप्रभूंच्या महाराष्ट्रात(Maharashtra) काय सुरू आहे? शाळेत गेलेल्या अजाण वयाच्या बालिकांना नराधम आपल्या वासनेची शिकार करताना जागोजागी दिसत आहेत. गेल्या पंधरा दिवसांत अश्या किती बातम्यांचा जणू पूर आलेला आपण पाहिला. या घटनांचे वार्तांकन प्रामाणिकपणे करणा-या महिलांना, पत्रकारांना गावगुंड धमकावत आहेत, आणि सरकार त्यांच्याच विरोधात गुन्हे दाखल करत आहेत. धमक्या देणा-या गावगुंडाना न्यायालयाने जामीन नाकारला तरी पोलीस अटक करताना दिसत नाहीत. यावरून सत्ताधा-यांची प्रशासन यंत्रणा(Administration agencies) बटिक झाल्याचे दिसून येत आहे.

सामान्य माणूस हे सारे पाहतो आहे, वाचतो आणि अनुभवतो आहे. पण ‘आपल्याला त्याची झळ लागली नाही ना?’ असा मुर्ख विचार करून काणाडोळा करून आपण असे पंढासारखे किती दिवस जगायचा प्रयत्न करत राहणार आहोत? सारीकडे जात(Caste), आरक्षण(reservation) आणि भ्रष्ट राजकीय पुढारी आणि त्यांचा गुंडाचा हैदोस सुरू आहे. ते अरेरावी करून ‘माझ्या ऐरियात येवू देणार नाही’ अशी भाषा करत आहेत. अरे पंढानो, छत्रपती शिवरायांनी जहागीरी, वतने देण्याची प्रथा त्याकाळीच बंद केली ते का? मुर्खानो समजले का? तुमच्या सारख्या माजोरड्या राजकारण्यांना महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वीच ओळखले होते. पण तरीही तुम्ही त्यांच्या पूत्राला वतनदारीच्या मोहापायी मुघलांच्या हाती फंदफितूरी करून पकडून दिलाच. पण तरीही या महाराष्ट्राने त्या पापी औरंग्यासमोर आपल्या शिवरायांच्या स्वराज्याचे इमान विकले नाही हे लक्षात असू द्या. त्या औरंग्याची कबर याच महाराष्ट्रात खोदली आणि दिल्लीच्या तख्तावर जावून याच महाराजांच्या वंशजानी राज्य केले. हा या गौरवशाली स्वराज्याचा इतिहास(history) आहे. हे विसरून चालणार नाही.

म्हणून आता प्रस्थापित राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांच्या भुलथापांना बळी पडायचे नाही. आघाडी असो की पिछाडी यांची जातकुळी एकच आहे. आता जे भांडून ऊणीधुणी करताना दिसत आहेत ते सत्तेच्या लोण्याचा गोळा मटकावताना एकमेकांची कशी साथ देतात? ते आपण सध्या पाहतोच आहोत. त्यामुळे महाराष्ट्राच्या मतदारांनी यावेळच्या विधानसभेत प्रस्थापित पक्षांऐवजी नव्या दमाच्या अपक्ष आणि बंडखोर नेत्यांना निवडून देण्याचा निर्धार केला आहे. सुराज्य आणायचे असेल तर आपल्याला आता स्वराज्य आणायला हवे. छत्रपती महाराजांचा अवमान करणाऱ्या, त्या घटनेचे राजकारण करणाऱ्या निर्लज्ज राजकारण्याना आता खड्या सारखे बाजुला फेकले पाहिजे.

त्यांच्या लाभाच्या योजना, लाडक्या बहिण भावाच्या घोषणा यांना बळी पडू नका, हा देश इथली दोनवेळचे अन्न मिळवू न शकणारी जनता यांना गुलाम करायची आहे. आणि त्यांच्या मतांच्या आधारावर पुन्हा सत्तेवर येवून लूट करायची आहे, हे सांगायची, ओळखायची हिच वेळ आहे. साऱ्या यंत्रणा, प्रशासन, माध्यमे यांच्या कच्छपी असल्याने ख-या खोटयाची इतकी बेमालूम भेसळ केली जात आहे की, सामान्य माणसाला त्याच्या जगण्याच्या प्रश्नात या देशात राज्यात काय सुरू आहे ते समजूच दिले जात नाही. संभ्रम पसरवून, अमिषांच्या घोषणांच्या गदारोळात मतांचा बाजार उघडण्याचा प्रयत्न केला जात आहे.

महाराष्ट्राच्या(Maharashtra) राजकारणाचा गेल्या पाच वर्षात अगदी धंदा झाला आहे, अगदी ‘रेडलाईट’ (Redlight)म्हणावा तसा! हा बाजार काही अती महत्वाकांक्षी गुन्हेगारी विचारसरणीच्या नेत्यांनी केला आहे. शिवरायांचा सुबुध्द सुजाण पुरोगामी विकासशील, नितीवान आणि प्रगतीशील महाराष्ट्र अंधारयुगात नेवून टाकायचा चंग बांधला आहे. शिवरायांचा अवमान करणा-या याच त्या अवलादी आहेत. ज्यांना महाराजांचा महाराष्ट्र स्वत:चा बटिक गुलाम करायचा आहे. हे ओळखून माध्यमांचे सर्वे काहीही सांगत असले तरी जनमानसाचा कौल सध्या विधानसभेला ना आघाडी ना बिघाडी असाच राहणार आहे, त्यामुळे विधानसभेला ४५ – ५० टक्के जेमतेम मतदान होणार असून मोठ्या प्रमाणात सुजाण मतदार मतदानाकडे पाठ फिरवणार आहे. तसे न करता आपल्या मतांची ताकद दाखवून शिवरायांच्या अवमानाचा बदला घ्यायला हवा. त्यासाठी राज्याच्या हिताचे कोण? आणि असंविधानिक पध्दतीने कुणी हा महाराष्ट्र लुटायचा धंदा केला आहे ते समजून घ्यायला हवे! आता आपल्याला जागरूक नागरिक, मतदार म्हणून आपल्या कर्तव्याची जाण ठेवायची वेळ आहे.

याचे कारणही तसेच आहे. आपल्या येणाऱ्या पिढ्यांना या देशात राज्यात सन्मानाने जगायचे असेल तर सध्याच्या बरबटलेल्या यंत्रणा कामास येणार नाहीत! अगदी न्यायालये, साऱ्या प्रशासकीय यंत्रणा अगदी निवडणूक आयोगाची (Election Commission)सध्याची निष्पक्षपातीपणाची भुमिका राहिली नाही हे देखील दिसत आहे. हरियाणा(Haryana) आणि काश्मीरमध्ये(Kashmir) निवडणूका(Elections) जाहीर करणारा आयोग महाराष्ट्र(Maharashtra) आणि झारखंडमध्ये(Jharkhand) मात्र निवडणूका घोषित करण्यासाठी थातूरमातूर कारणे देतो. याच मुख्यनिर्वाचन अधिकारी राजीवकुमार यांच्यावर लोकसभा निवडणूकीत मतांची टक्केवारी वाढवून भाजपला अतिरिक्त शंभर जागा जिंकून दिल्याबाबतचा खटला सध्या सर्वोच्च न्यायालयासमोर आहे.

त्यामुळे चारही बाजुला अंधारयुगाच्या पाऊलखूणा दिसत असल्यातरी संविधानाच्या मताच्या अधिकाराला प्रत्येक नागरिकाने सचोटीने हाताळून आपल्या खऱ्या शक्तीचा परिचय द्यायाला हवा. या अराजकातून बाहेर पडायचे असेल तर प्रस्थापित राजकीय पक्ष त्यांचे नेते आणि बगलबच्चे यांना बाजुला सारून नव्या दमाच्या पक्षविरहीत तरुणांना राजकारणात संधी दिली पाहिजे. असे करताना जात, धर्म, व्यक्तिगत लाभ, आरक्षण अश्या अमिषांना बळी न पडता या देशाला आणि या राज्यातील भावी पिढीच्या भविष्याला वाचविण्यासाठी पैसा, सत्ता आणि मनी मसल पावरला बळी न पडता खऱ्याखुऱ्या जनतेच्या सेवकांना निवडून देण्याची जबाबदारी प्रत्येक तालुका गाव आणि जिल्ह्यातील सुजाण सुज्ञ सुशिक्षितांना घ्यावी लागणार आहे. तूर्तास इतकेच!

 

किशोर आपटे
(राजकीय विश्लेषक)

 

मंकी बात…


मंकी बात…

Social Media