महाराष्ट्र पोलीस दलाच्या ‘त्या’ माऊलीला मानाचा मुजरा! कडक सॅल्यूट!!
अगदी महिनाभरापूर्वीची गोष्ट बदलापूरच्या(Badlapur) त्या आदर्श विद्यामंदिरात दोघा चिमुकल्यांवर अत्याचार झाला. त्यानंतर त्यांच्या पालकांनी पोलिसांकडे धाव घेतली तर तेथे कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस अधिकारीने अमानवी वर्तन केल्याने लोकक्षोभ अनावर होवून अनर्थकारी घटना घडल्या. आणि जवळपास महिनाभराने बातमी आली की, बुलढाण्यात(Buldhana) एका तान्हुल्याची भूक भागविण्यासाठी खाकी वर्दीतील महिला पोलीस शिपाई योगिता शिवाजी डुकरे यांनी स्वत: आईच्या मायेने स्तनपान दिले. या दोन घटना, पण त्यात एकाच पोलीस दलातील दोन टोकाच्या वृत्तीच्या कर्मचा-यांच्या वर्तनामध्ये जमीन अस्मानाचा फरक दिसतो .
“सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” हे घोषवाक्य मनात ठेवून लोकांच्या रक्षणार्थ पोलीस खाकी वर्दी घालून आपले कर्तव्य पार पाडत असतात. कधी-कधी पोलिसांना खाकी वर्दीचा दणकाही दाखवावा लागतोच, तरीही याच खाकीमध्येही एक मनुष्य एक वडील – आईची ‘ममता’ लपलेली असते. याचा प्रत्यय बुलढाण्याच्या या घटनेतून आला.
एक दिवसाच्या भुकेल्या अनोळख्या चिमुकलीला बुलढाणा(Buldhana) शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने चक्क आपलं स्वतःचं दूध पाजून चिमुकलीला शांत केलं. तिची भूक भागवत चिमुकलीला जीवदान देखील दिलं. या महिला कर्मचाऱ्याने केलेल्या या कार्यामुळे त्यांचे कौतुक तर होतच आहे. मात्र या प्रकारामुळे खाकीमधली ‘ममता’ देखील सर्वांसमोर आलीये. योगिता शिवाजी डुकरे असे महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्या बुलढाणा(Buldhana) शहर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की त्यांना कळलं की, ही चिमुकली उपाशी आहे. त्यांनी लगेच वरिष्ठांच्या परवानगीने या अनोळखी एक दिवसाच्या चिमुकलीला स्वतःचं दूध पाजून शांत केलं. विशेष म्हणजे महिला पोलीस कर्मचारी योगिता शिवाजी डुकरे यांना एक वर्षाचं बाळ असल्याने त्यांना ती चिमुकली उपाशी असल्याचे लक्षात आलं. सध्या या चिमुकलीवर बुलढाण्याच्या सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अश्या या महाराष्ट्राच्या पोलीस दलाचे सामान्य जनता क्वचितच आभार मानते! पण कर्तव्यावर असताना ज्यांच्यात आईचे प्रेम आणि बापाची माया देखील जागी असते त्या महाराष्ट्र (Maharashtra)पोलीसांच्या या माऊलीला मानाचा मुजरा कडक सॅल्यूट करावासा वाटेल की नाही?
शुष्क राजकीय चर्चा आणि चढाओढी कुरघोडींच्या धबडग्यात अश्या सह्रदयतेच्या सृजनशील बातमीने मानवी मन हेलावून जाते आणि शब्दच थिटे पडतात, नि:शब्द होतात!
किशोर आपटे
(राजकीय विश्लेषक)