‘मराठी असे आमुची मायबोली’, वृथा ही बढाई सुकार्याविणें! अभिजात मराठी भाषा आता ज्ञानभाषा व्हावी यासाठी मराठी माणसाने झटायला हवे!
मंडळी ‘माझीया मराठीची बोली कवतिके अमृतां तेही पैजा जिंके’ असे ज्या भाषेचे वर्णन संत ज्ञानेश्वर (Saint Dnyaneshwar)माऊलींनी करून ठेवले आहे, त्या मायबोली मराठीला सन २०२४मध्ये (शास्त्रीय भाषा) अभिजात भाषा म्हणून सांप्रत केंद्र सरकारच्या निकषानुसार मान्यता मिळाल्याची मधूरवार्ता आपण ऐकली असेलच. केवळ मराठीच नाही तर तिच्यासोबतच आसामी, पाली, बंगाली आणि प्राकृत अश्या अन्य चार भाषांना देखील केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. त्यापूर्वी तमिळ(Tamil), तेलगू(Telugu), कन्नड(Kannada), मल्याळम(Malayalam), संस्कृत(Sanskrit), ओडिया(Odia) या सहा भाषांना देखील अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. म्हणजे काय? तर मराठी भाषा विकासासाठी, तिच्यात दर्जेदार साहित्य कलाकृती साकारण्यासाठी या भाषेचा विकास करण्यासाठी संशोधन आणि शोध करण्यासाठी राज्य सरकारप्रमाणेच आता केंद्र सरकारकडूनही मान्यता आणि आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
खरेतर राज्यात पृथ्वीराज चव्हाण(Prithviraj Chavan) यांचे सरकार असताना रंगनाथ पठारे(Ranganath Pathare) यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून अभिजात मराठी भाषेसाठीच्या निकषांचा परामर्ष घेवून अहवाल तयार करण्यात आला आणि तो केंद्र सरकारकडे गेली दहा वर्षांपेक्षा जास्त काळ मान्यतेसाठी प्रलंबीत होता. आता या प्रस्तावाला मान्यता मिळावी यासाठी राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यातूनही आश्वासने देण्यात आली होती. तर मनसे सारख्या पक्षांकडून अगदी २०२४च्या लोकसभा निवडणूकीच्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्यासमोर प्रचार सभेत यासाठी राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी मागणी केली होती. तर अश्या या मराठी भाषेसाठी अनेक थोर साहित्यिक कवींनी भावना व्यक्त करताना वास्तवातील मराठी भाषेच्या स्थितीचे वर्णन केले आहे.
कवी माधव ज्युलियन यांच्या या कवितेचे सार पाहिले तरी त्याचा अंदाज येवू शकेल.
मराठी असे आमुची मायबोली जरी आज ही राजभाषा नसे
नसो आज ऐश्वर्य या माउलीला, यशाची पुढें दिव्य आशा असे
जरी पंचखंडांतही मान्यता घे स्वसत्ताबळें श्रीमती इंग्रजी
मराठी भिकारीण झाली तरीही कुशीचा तिच्या, तीस केवीं त्यजी ॥१॥
जरी मान्यता आज हिंदीस देई उदेलें नवें राष्ट्र हें हिंदवी,
मनाचे मराठे मराठीस ध्याती हिची जाणुनी योग्यता, थोरवी,
असूं दूर पेशावरीं, उत्तरीं वा असूं दक्षिणीं दूर तंजावरीं,
मराठी असे आमुची मायबोली, अहो ज्ञानदेवीच देखा खरी ॥२॥
मराठी असे आमुची मायबोली जरी भिन्नधर्मानुयायी असूं
पुरी बांणली बंधुता अंतरंगीं, हिच्या एक ताटांत आम्ही बसूं
हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडूं वसे आमुच्या मात्र हृन्मंदिरीं
जगन्मान्यता हीस अर्पूं प्रतापें हिला बैसवूं वैभवाच्या शिरीं ॥३॥
हिच्या लक्तरांची असे लाज आम्हां, नका फक्त पाहू हिच्या लक्तरां
प्रभावी हिचे रूप चापल्य देखा पडावी फिकी ज्यापुढे अप्सरा
न घालूं जरी वाङमयातील उंची हिरे मोतियांचे हिला दागिने
‘मराठी असे आमुची मायबोली’, वृथा ही बढाई सुकार्याविणें ॥४॥
मराठी असे आमुची मायबोली अहो पारतंत्र्यांत ही खंगली
हिची थोर संपत्ति गेली उपेक्षेमुळें खोल कालार्णवाच्या तळीं
तरी सिंधु मंथूनि काढूनि रत्नें नियोजूं तयांना हिच्या मंडणीं
नको रीण, देवोत देतील तेव्हा जगांतील भाषा हिला खंडणी ॥५॥
कवीने म्हटले आहे की उपेक्षेमुळे या थोर भाषेची संपत्ती काळाच्या तळात गेली आहे. ज्यावेळी इंग्रजी सक्तीच्या प्राथमिक शाळा नव्हत्या त्याकाळात हे कवीने लिहिले आहे. त्यातून जे कवीचे द्रष्टेपण दिसले आहे ते कौतुकास्पद आहेच. मात्र आज ज्या सरकारकडून या मराठी भाषेच्या गौरवातून राजकीय पोळीवर तूप घालायचा प्रयत्न केला गेला आहे. त्या विद्यमान एनडीए सरकारने मराठी भाषेच्या शाळा बंद करून त्या अदानी सारख्या कॉर्पोरेटच्या घश्यात घालण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. इतकेच काय महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेतलेल्या सक्तीच्या मराठी भाषेच्या नियमांत बदल करून तो ऐच्छिक करण्याचा निर्णय घेवून अल्पसंख्याक शाळा संस्थाचालकांकडून अर्थपूर्ण मलिदा लाटला आहे. म्हणजे जे सरकार अभिजात मराठी भाषेचा दर्जा दिल्याची शेखी मतांसाठी मिरवताना दिसते त्याचे खायचे दात वेगळेच आहेत, बरे का? हे लक्षात घ्यायला हवे!
शिवसेना उध्दव ठाकरे(Uddhav Thackeray) गटाचे नेते आणि माजी मंत्री दिवाकर रावते(Diwakar Raote) यांनी अभिजात मराठीचा निर्णय झाल्यानंतर बोलकी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, जर महाराष्ट्रात लोकसभा निवडणूकीत(Lok Sabha elections in Maharashtra) भाजपचा पराभव झाला नसता किंवा देशात २४० इतक्या खाली भाजप घसरली नसती तर कदाचित अभिजात भाषेचा दर्जा देण्याची इच्छा गुजरातच्या दोन मराठी व्देष्ट्या नेत्यांना झाली नसती.
मुंबईत मराठी माणसाच्या गौरवाला धक्का लावायचा इथे येवू घातलेले उद्योग गुजरातला पळवायचे, इथल्या जनतेच्या पैश्याची लूट करत गुजरात्यांना मुंबईला येवून धंदे करायला शेअर बाजारात(Stock markets) सट्टे लावायला सोपे व्हावे म्हणून बुलेट ट्रेनचा(Bullet train) प्रकल्प हट्टाने राबवायचा, त्यासाठी बीकेसीमध्ये तीच जमीन हडपायची जिचा उपयोग मुंबईत आर्थिक विकास केंद्रासाठी केला जाणार होता. ते आर्थिक विकास केंद्र गुजरातला न्यायचे. या शिवाय राज्य सरकारच्या तिजोरीत हात घालायचा, पालघर जिल्ह्यातल्या आदिवासींच्या जमिनी बुलेट ट्रेनसाठी हट्टाने बळकावायच्या, इथल्या बॉलीवूडला पर्यायी व्यवस्था नोइडाला करायची आणि मुंबई (Mumbai)महाराष्ट्राचे महत्व कमी करण्यासाठी इथला हिरे बाजार गुजरातला न्यायचा असे उद्योग केल्यानंतर मग मुंबई महापालिका निवडणुका(Mumbai Municipal Corporation elections) तीन तीन वर्ष घ्यायच्याच नाहीत आणि तेथे जमा असलेल्या बँकांमधील ठेवीवर हात साफ करायचा हे सारे उद्योग महाराष्ट्र आणि मुंबईकर मराठी जनता विसरेल किंवा तीने ते विसरावे अश्यासाठी हा अभिजात भाषा मान्यतेचा फार्स तर केला गेला नाही ना? अशी शंका आता जाणाकार मराठी माणसांकडून व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्र (Maharashtra)मेला तरी राष्ट्र मेले मराठ्याविना राष्ट्र गाडा न चाले या सेनापती बापटांच्या उक्ती प्रमाणे भारतीय जनता पक्षांच्या चाणक्यांना गेल्या पाच वर्षात केवळ सत्तालोभासाठी केलेल्या कुलंगड्या फसल्याची जाणिव झाली आहे. त्याचे पापक्षालन आणि मराठी माणसांला आता गोंजारण्याची शक्कल म्हणून हा अभिजात भाषा मान्यतेचा निर्णय इतक्या त्वरेने (चक्क दहा वर्षाची कैफातील सत्ता जाईपर्यंत) घेण्यात आला आहे. मराठी माणसाने त्याने सुखावून जाणे स्वाभाविक आहे, कारण मायबोली मराठीसाठी हा निर्णय होणे हा त्या भाषेच्या विकासाच्या मार्गातील आवश्यक टप्पा होता. मात्र ज्या राजकीय कारणांसाठी नाईलाजाने हा निर्णय घेण्यात आला, त्यावरून मराठीचा आकस असलेल्या मोरारजींच्या पिलावळीकडून या नंतर मराठीची गळचेपी करण्याची संधी मिळाली तर ते नक्कीच घेतील. कारण लोकसभा निवडणूकीत मराठी मुलूखात भाजपचे खासदार संख्या २३ वरून चक्क नऊवर येवून ठेपली आहे. अगदी साम दाम दंड भेद निती वापरली तरी मराठी माणसाने भाजपच्या ध्येय धोरणांच्या बाजूने जाण्यास नकार दिला आहे.
शेवटी कुसूमाग्रजांनी स्वातंत्र्यदेवीची विनवणी या कवितेत सांगून ठेवले आहे त्याचा विसर मराठी माणसाला पडता कामा नये. मराठी भाषा अभिजात भाषा झाली आता तिला ज्ञानभाषा करण्यासाठी मराठीत अन्य भाषांतील ज्ञान विज्ञान घेवून येण्यास सुरूवात केली पाहीजे. त्यासाठी परक्या भाषांचे ज्ञान घ्यावे लागणार आहे, ते करताना आपल्या मराठी भाषेची उपेक्षा संपवता आली पाहीजे हेच कुसूमाग्रजांनी या पंक्तीमध्ये सांगून ठेवले आहे.
परभाषेतही व्हा पारंगत ज्ञानसाधना करा, तरी।
माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपु नका।।
भाषा मरता देशही मरतो संस्कृतिचाही दिवा विझे।
गुलाम भाषिक होऊनि अपुल्या प्रगतिचे शिर कापु नका।।
कलम करी ये तरी सालभर सण शिमग्याचा ताणू नका।
सरस्वतीच्या देवळातले स्तंभ घणाने तोडू नका।।
मराठी भाषेच्या गौरवासाठी आता या भाषेला ज्ञान भाषा केली पाहीजे म्हणजे आपल्या रोजच्या दैनंदीन वापरात कामात मराठीचा अधिकाधिक वापर केला गेला पाहीजे, मराठी बोलणे लिहिणे याशिवाय अन्य भाषांमध्ये असलेले पाठ्यक्रम मराठीत अंगिकारले पाहीजेत. कामधंद्यात उद्योगात, अगदी संगणकांच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कटाक्षाने मराठीचा वापर अनिवार्यतेने व्हावा यासाठी आग्रह धरला पाहीजे. महाराष्ट्रात मुंबईत होणारे सारे व्यवहार अगदी परदेशातून आलेल्यांसह सर्वाना मराठीत करण्याची गरज पडावी अशी मराठी भाषा आपण समृध्द केली पाहीजे. त्यासाठी कवीवर्य सुरेश भट यांनी मराठी भाषेबद्दल जे सांगितले आहे त्याचा आपण अंगिकार केला पाहीजे त्यांनी म्हटले आहे
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी
आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी
आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी
येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी
पूर्ण