महाविकास आघाडीच्या राजकारणात ‘जयचंद’ नव्हे ‘सेलजा’ कोण? आपसातील भांडणातून भाजपला दिलासा!?
हरियाणा विधानसभा निवडणूक(Haryana Assembly elections) निकालाच्या पार्श्वभुमीवर खडबडून जागे झालेल्या कॉंग्रेसपक्षाने महाराष्ट्रात निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच ‘जागते रहो’ चा पवित्रा घेतल्याचे भासवले जात आहे. चिखली मतदारसंघातील मतदार याद्यांमध्ये जसा घोळ सुरू आहे तसाच घोळ सत्ताधारी भाजप महायुतीने शासकीय यंत्रणा हाताशी धरुन बहुतांश मतदारसंघात घातल्याचा गंभीर आरोप कॉंग्रेसच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे केला आहे. या गैरप्रकाराची चौकशी करावी अशी मागणी देखील केली आहे.
या शिवाय निवडणुकीच्या तोंडावर सरकारकडून आमदारांना निधी देण्यापासून बदल्या नियुक्त्यांचे जे २०० पेक्षा जास्त शासन निर्णय (जीआर) निर्गमीत झाले त्यावरही आक्षेप नोंदवला आहे, नियुक्त्या, निविदा, योजना दूतांच्या नियुक्त्या रद्द करण्याची मागणी करताना कॉंग्रेसकडून महायुतीच्या प्रमुख घटकपक्ष राष्ट्रवादी आणि शिवसेना यांना देखील सोबत घेण्यात आले आहे. मात्र या बाबतच्या माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेतच कॉंग्रेसचे जबाबदार नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांनी सहकारी पक्षाचे नेते संजय राऊंतावर टिका टिप्पणी करत पत्रकार परिषदेतून निघून जाण्याचा प्रयत्न केल्याने कॉंग्रेसच्या या निवडणूक प्रक्रियेतील दोषांवरील आक्षेपांच्या मुद्दयाला बगल मिळाली. आणि प्रकर्षाने माध्यमातून हेच समोर आले की ‘हरियाणाची हार यांना ज्या ‘जयचंद’ प्रवृत्तीने मिळाली ती प्रवृत्ती कॉंग्रेसच्या नेत्यांमध्ये’ महाराष्ट्रातही कायमच आहे.
हरियाणाच्या नेत्यांमध्ये एकवाक्यता नसल्याने कॉंग्रेसमध्ये फूट होती, त्यामुळे त्यांनी इंडिया आघाडीच्या अन्य घटकपक्षांना सोबत घेतलेच नाही. पक्षांतर्गत हुडा, सुरजेवाला, सेलजा अश्या नेत्यांमध्ये व्यक्तिगत, जातीगत मतमुटाव होते. त्यातून ते वरवर एकत्र दिसले तरी आतून एकमेकां विरोधात होते. त्याचा भाजपने बखुबी फायदा घेतला. हरियाणात जाट राजकारणाला प्राधान्य देताना अन्य जातींना समानसंधी दिली नाही, तसेच येथेही आहे. कॉंग्रेसच्याच राजकीय वर्तुळाचा कानोसा घेतला तर प्रचंड गर्दी करून आलेल्या इच्छुकांकडून गमतीशीर किस्से सांगण्यात येत आहेत त्यात, हरियाणाशी तुलना करत सांगण्यात येते की, तेथे जाट तर येथे मराठा(Marathas), कुणबी(Kunbi), ओबीसी(OBCs) राजकारणांचा आब दिसत आहे, हुडा सारखे थोरात, पटोले वागताना दिसत आहेत, वडेट्टीवार, ठाकूर, नसीमखान सुरजेवाला आहेत? मात्र यातून महाराष्ट्रात सेलजा कोण ते निकालानंतरच समजणार आहे? जी भाजपमध्ये न जाता देखील कॉंग्रेसच्या विरोधात सक्रीय असल्याचे अजूनही मानले जात आहे. असे राजकीय वर्तुळात उघड बोलले जात आहे.
महाराष्ट्रात कॉंग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदाचे सध्या चार पाच जण दावेदार आहेत, शिवाय या जागेसाठी शिवसेनेलाही ते त्यामुळे जुमानत नाहीत. नाना पटोले(Nana Patole) यांनी महाविकास आघाडीमध्ये असताना विधानसभा अध्यक्षपद सहकारी नेत्यांना विचारात न घेताच सोडले होते, जेणेकरून नंतर भाजपला पक्षांतराचे रामायण घडवायला मदत झाली, अश्या प्रकारचे आत्मघातकी वागणाऱ्या नेत्यांचा पक्षाने कितपत भरोसा करायचा असा प्रश्न दबल्या आवाजात रोज चर्चिला जातो, पण आता खूप उशीर झाला आहे. जागा वाटपामध्ये मोठा भाऊ म्हणत सहकारी मित्रपक्ष दावा करत असलेल्या अनेक जागाच कॉंग्रेसच्या जबाबदार नेत्यांनाही हव्याच आहेत. आणि त्या घेवून आपल्या मर्जीच्या कार्यकर्त्याना द्यायच्या आहेत, यामध्ये पक्षांतर्गत मोठा तिकीटांचा व्यवहार (काळाबाजार नव्हे हं!) सध्या सर्वच पक्षांमध्ये सुरू आहे ही लपून राहिलेली बाब नाही. त्यावरूनच हे जागांचे भांडण पक्षांतर्गत आणि आघाडी अंतर्गतही आहे. लोकसभेत १ वरून १४ खासदार झालेल्या महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचा शेअर यामध्ये सर्वाधिक वधारला आहे म्हणतात. तरी देखील २८८ पैकी जेमतेम १००-१०५ जागा लढायच्या असताना पक्षाकडे पाचशेपेक्षा जास्त इच्छूक खर्चासह उभे राहायला आग्रही आहेत. नेत्यांचा उत्साह वाढवणारेच हे चित्र आहे नाही का?
त्यामुळेच सध्या भाजपला हरवायचे आहे असे सगळे म्हणत आहेत. जनमत आघाडीच्या बाजूने आहे असेच सर्वांचे मत आहे , पण त्यातून जो मस्तवालपणा या तीनही पक्षांमध्ये आताच आला आहे तो स्पष्टपणे समोर आला आहे. जनतेला गृहित धरून महाविकास आघाडीचे नेते वागत आहेत. मग ती शिवसेना असो कॉंग्रेस असो की राष्ट्रवादी कॉंग्रेस. लोकसभेच्या निकालाचा जनमताचा कौल हा भाजपला घालवायची इच्छा देशात लोकसभेत जनतेच्या मनात होती, पण भाजपला हे घालवू शकले नाहीत याचे कारण भाजपला अन्योकतीने मदत करणारे हे नेतेच आहेत. येनकेनप्रकारेण भाजप आणि मोदी गेली दहा वर्ष टिकून राहिले त्याला कारण कॉंग्रेस आणि विरोधी आघाडीच्या पक्षांच्या नेत्यांचे सवतेसुभे, स्वार्थी राजकारण आणि राजकीय गर्वाची घरे हेच आहे. नाना पटोले, जयंत पाटील(Jayant Patil), संजय राऊत(Sanjay Raut) यांच्या बॉडीलँग्वेजमध्ये जो राजकीय अहंकार दिसत आहे त्याला कंटाळून जनता मतदानालाच आली नाही तर काय होईल? भाजपला मतदान नको म्हणून त्यांनी तुम्हाला लोकसभेत मतदान केले आहे. तुमच्याबद्दल विश्वास, प्रेम किंवा फारकाही चांगल्या भावना जनतेच्या मनात नाहीत ते या वाचाळवीर गर्विष्ठ नेत्यांना कुणीतरी सांगायला हवे आहे म्हणूनच हा लेखन प्रपंच आहे.
भारतीय जनता पक्ष(BJP) हा बाराही महिने केवळ निवडणुक मोडवर काम करणारा आणि त्या जिकंण्याचे साम-दाम-दंड भेद असे अनेक नवेनवे हथकंडे वापरणारा पक्ष आहे हे वेगळे सांगायची गरजही नाही. सत्तेची चटक लागल्यानंतर या देशात गेल्या दहा वर्षात या पक्षाने भांडवलदारांना पायघड्या घालताना कायदा, नियम, संविधान इतकेच काय नितीमत्ता देखील पायदळी तुडवली आहे. हे भीषण वास्तव आहे याचा इन्कार कुणीही सुज्ञ नागरिक करणार नाही. व्हाइट कॉलर प्रज्ञावंत थिजले आहेत, सामान्य जनता भरडली आणि भरकटली जात आहे. समाजाचे जुने आदर्श आणि नितीनियम मागे पडले आहेत. देश कंगाली आणि एकचालकानुवर्तीत्वाच्या हुकूमशाहीच्या नव्या मॉडेलवर चालविला जात आहे. अश्या साऱ्या भीषण वास्तवात देशाच्या भवितव्याचे अस्तित्वच धोक्यात आहे. भुके कंगालीच्या वैश्विक यादीत झपाट्याने देश अव्वल पायदान गाठून पुढे जात आहे, हे दिसत असताना कॉंग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना जरा सत्ता येण्याची चाहूल लागली तरी ते हुरळून जावून इतके स्वार्थी मस्तवाल आणि बेदरकार वागत आहेत की त्यांना हरियाणात कॉंग्रेस हारली तरी आपले वास्तव मान्य करणे जड जात आहे. मग ते निवडणूक यंत्रणा, इव्हीएम, त्यातील भ्रष्टाचार आणि अन्य बाबींवर लोकांचे लक्ष वेधताना दिसत आहेत. पण ‘धूल चेहरेपर थी और मैं आइना साफ करता रहा’ अशी त्यांची गत आहे. हेच सध्या महाराष्ट्रात आघाडीत जो कलगीतूरा सुरू आहे त्यात दिसत आहे.
शिवसेनेचे संजय राऊत(Sanjay Raut) यांच्यासोबत सांगलीच्या लोकसभा उमेदवारीवरून कॉंग्रेसच्या विशाल पाटलांचे बिनसले होते. चंद्रहार पाटलांसाठी आग्रही राऊत यांची भुमिका ठाकरेंना मान्य करावी लागली होती. शेवटपर्यत सांगलीवर अडलेल्या शिवसेनेकडून अमरावती, रामटेक या त्यांच्या परंपरागत जागा कॉंग्रेसला देवून कधीच न लढलेल्या सांगलीसाठी आग्रह धरणे हे काय होते? बाळ हट्ट, स्त्री हट्ट की राज हट्ट होता हे अजूनही समजले नाही. पण त्या जागी कॉंग्रेसच्या विशाल पाटील यांना बंडखोरी करावी लागली. शिवसेनेला दुखावू नये म्हणून कॉंग्रेसच्या वरिष्ठांनी वरकरणी माघार घेतली तरी आतून विशाल पाटलांना जिंकून आणलेच. त्यानंतर संजय राऊत ठाकरे सेनेला हे सारे राजकारण बाजुला ठेवून विशाल पाटील यांचे आघाडीत स्वागत करावे लागलेच. पण जर विशाल पाटील आणि चंद्रहार दोघांच्या भांडणात पुन्हा संजयकाका विजयी झाले असते तर? शिवसेनेकडून कॉंग्रेसला आणि कॉंग्रेसकडून शिवसेनेला जे काही आहेर देण्यात आले असते त्याची कल्पनाच न केलेली बरी! असो.
आता सांगोल्यातही तसेच होताना दिसत आहे, शिवसेनेने तेथे गणपतराव देशमुख यांच्या पारंपरिक वारश्याला दुर्लक्षित केल्याने शेकाप दुखावली आहे. दिपक साळुंखेना शिवबंधन बांधून शहाजीबापूसमोर उभे केल्याचे चित्र निर्माण करताना गद्दारांना धडा शिकवण्याची भाषा राऊत यांनी केली आहे. २०१९ला अपघाताने शिवसेनेसोबत आलेल्या शहाजीबापूला जिरवण्यासाठी शिवसेना तेथे परंपरागत शेकापच्या असलेल्या वर्चस्वाकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे.शहाजी बापू(Shahaji Bapu) त्यावेळी शेकापच्या उमेदवाराकडून केवळ पाचशेपेक्षाही कमी मताने आमदार झाले होते. भाजपसोबत सेना असल्याने ते ‘जग घुमिया थारे जैसा न कोई’ म्हणत भाजपच्या वतीने सेनेत आले होते. पण आता त्या जागी शिवसेना केवळ बापूच्या गद्दारीचे गाणे गावून सहकारी पक्षांची जागा हडपण्याचा प्रयत्न करत आहे. किंबहुना शेकाप, सपा आणि कम्युनिस्टपक्षांसह समाजवादी विचारांचे जनतादल, कपिल पाटील इत्यादींना कसलीच मान्यता, दखल आणि राजकीय स्थान महाविकास आघाडीत नाही. तीन प्रमुख पक्षांचे नेतेच त्यातही शरद पवारांचे काम पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातही काही नेमक्या जागा समोर ठेवून एकमेकांना दंड बेडक्या दाखवत फुरफूरत आहेत. जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत त्या इतक्या लांबल्या आहेत की इतक्या वेळा चर्चा आणि बैठका भारताने चीन पाकिस्तान किंवा अन्य शत्रूराष्ट्रांसोबत केल्या असत्या तर दोन्ही देशांमधील वर्षानुवर्षाचे अनेक प्रश्न मार्गी लागले असते असे आता राजकीय वर्तुळात गमतीने सांगण्यात येत आहे. तरी देखील प्राथमिक जागावाटप जागांची संख्या उमेदवारांची निवड या गोष्टी या तीन पक्षांच्या नेत्यांना ठरविता येत नाहीत असे चित्र ताज्या भांडणाच्या अध्यायातून समोर येत आहे.
हरियाणात विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने रडीचा डाव केला आहे. तसेच सध्या बुलढाणा(Buldhana) जिल्ह्यातील चिखली-23 या विधानसभा मतदार संघात समोर आले आहे असे विरोधकांचे मत आहे. भाजप विरोधी मतदारांची नावं काढून टाकण्याचा एक कलमी कार्यक्रम सुरू असून असून निवडणूक नोंदणी अधिकाऱ्याकडे अज्ञात व्यक्तींनी २,६०० पेक्षा जास्त फॉर्म सात अर्ज दाखल केले आहेत. निवडणुकीत हेराफेरी करून निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाचा हा रडीचा डाव सुरू झाला आहे. त्यामुळे राज्यात चिखली पॅटर्न सुरू असल्याचा जोरदार हल्लाबोल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. प्रत्यक्षात मात्र असे अर्ज-७ एकावेळी एकाच व्यक्तीला करता येतात आणि नाव का कमी करायची याची काही तर्कसंगत कारणे द्यावी लागतात त्यानंतर पडताळणी होते आणि नंतर नावे कमी केली जातात अशी प्रक्रिया असल्याचे निवडणूक यंत्रणाचे म्हणणे आहे. मात्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे(Ambadas Danve) यांच्या शासकीय निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चिखली-23 या मतदार संघात सुरू असलेले गैरप्रकार समोर आणला. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुतीवर सडकून टिका केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, भाजपा रडीचा डाव करण्याचे पाप करत आहे. मतदार यादी तपासून या षडयंत्रात सहभागी झालेल्यांची नावे तपासली पाहिजेत.
दुसरीकडे महाराष्ट्रात(Maharashtra) योजना दूत नावाने नेमणूक केल्या आहेत हे सगळे भाजपचे लोक आहेत. त्यामुळे योजना दूतांच्या नियुक्त्या रद्द करण्याची मागणी निवडणूक आयोगाला करण्यात आली आणि ती तातडीने मान्य करण्यात आली आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार(Vijay Wadettiwar) म्हणाले, लोकसभेत महाविकास आघाडीची अधिकची मतं आहेत. तिथे चिखली पॅटर्न सुरू आहे. जिथे आघाडीला लीड मिळाले तिथे २, ५०० ते दहा हजार मत कशी कमी करता येईल याचे नियोजन फडणवीस आणि शिंदे करत आहेत. फॉर्म ७ स्वीकारले जाऊ नयेत. महाराष्ट्रात महायुती घाबरली आहे. मतदारांचे नाव वेगळे फोटो वेगळे अशी परिस्थिती आहे. मग पारदर्शी निवडणूक कशी होणार असा देखील प्रश्न उपस्थित होतो. फॉर्म ७ घेणे बंद करा. निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या नियुक्त्या, जीआर, निविदा रद्द करा. याबाबत निवडणूक आयोगाने मुख्य सचिवांना पत्र पाठवले आहे. मी मुख्य सचिवांना फोन केला होता, पुन्हा त्यांच्याशी बोलणार आहे असे वडेट्टीवार म्हणाले.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, मागच्या तारखेने सरकारने आदेश काढले जात आहेत. दुपारी साडे तीन नंतर जे काही केले ते रद्द केले पाहिजे. त्यानुसार निवडणूक आयोगाने शंभर जी आर रद्द किंवा स्थगित केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)म्हणाले, फॉर्म ७ ऑनलाईन भरण्याची प्रक्रिया संशयास्पद आहे. सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली निवडणूक अधिकारी काम करत आहेत. मतदार यादीचे प्रिंटिंग घाणेरडे आहे. नाव वाचता येत नाही. पत्ता चुकीचा. फोटो चुकीचे आहेत. डिजिटल इंडिया(Digital India) म्हणतात आणि मतदार यादी नीट करता येत नाही. एका घरातील पाच माणसे वेगवेगळ्या केंद्रावर मतदान करायला जातात. हे सगळे मतदानाची टक्केवारी कमी करण्यासाठी केले आहे. महाविकास आघाडीच्या या आरोपांमध्ये तथ्य नाही असे नाही. कारण लोकसभा निवडणूकीत हे सारे गैरप्रकार समोर आले आहेत.
पश्चिम बंगालमध्ये पोलीस डीजीना हटवले जाते. मात्र महाराष्ट्रातील पोलीस डीजी बाबत निवडणूक आयोग कारवाई करत नाही. कारण ‘लाडकी बहिण’ योजना गृहमंत्र्याकडून सर्वात आधी येथे लागू झाली आहे असे सांगण्यात येत आहे म्हणे! निवडणूक आयोगाने पारदर्शक राहिले तरच निवडणूक पारदर्शी होईल असे या नेत्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मंत्रालयात मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची भेट घेऊन निवदेन दिले. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक कामकाजात होत असलेला हस्तक्षेप चोक्कलिंगम यांच्या निदर्शनास आणून दिला. यावेळी काँग्रेसकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार सतेज पाटील, नसीम खान, नाना गावंडे, शिवसेनेकडून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खा. अनिल देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसकडून जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.
चोकलिंगम(Choklingam) सध्या महाराष्ट्राचे सिंघम आहेत, केंद्रीय मुख्य आयुक्त राजीव कुमार यांच्यापेक्षा जास्त ते लवचिक अधिकारी आहेत अशी चर्चा आहे. मात्र निवडणुकांची तयारी कशी सुरू आहे हे सांगण्यासाठी त्यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली त्यात मतदानाची आकडेवारी अजिबात वाढू शकत नाही असे छातीठोकपणे सांगत त्यांनी मतदानाच्या दिवशी रात्री बारापर्यंत पोलींग पार्टीकडून येणारी आकडेवारी निश्चित अधिकृतपणे सांगायला ४८ तास लागतात असा नवा जावईशोध लावला आहे. तेही मोदीसाहेबांच्या डिजीटल इंडियाच्या जमान्यात बरे! या शिवाय भाजपकडून वारंवार उच्चारला जाणारा ‘व्होट जिहाद’ (Vote jihad)शब्द प्रतिबंधीत करण्याबाबत कानावर हात ठेवत त्यांनी चेंडू दिल्लीत सी ई सी कडे टोलवून दिला आहे. मशीनच्या बॅटरीवरही ते काहीच व्यक्त झाले नाहीत कारण यावर तांत्रिक खुलासे इलेक्ट्रॉनिक तज्ज्ञांकडून सी ई सी करत आहेत. इतकेच नाही तर एका मतदाराचा मतदान केंद्रावर मतदानाच्या प्रक्रियेत पोलींग बूथच्या आत गेल्यानंतर मतदानाचा प्रमाणित वेळ किती असायला हवा ये देखील त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगायचे टाळले आहे. थोडक्यात काय? तर या देशात बलाढ्य राजकीय पक्षच नव्हे तर या देशाची लोकशाही व्यवस्था देखील सध्या रामभरोसेच आहे. तिला आपल्या काम भरोसे करायचे असेल तर ‘मतदार राजा जागा रहा’ नाहीतर पुढल्या पाच वर्षानंतर तुला मतदानाची संधी देखील मिळणार नाही कारण ही व्यवस्थाच आता संपण्याच्या दिशेने वेगाने जात आहे. खडबडून जागा रहा, ‘जागते रहो!’ तूर्तास इतुकेच!