आता लवकरच येणार गल्लीपासून दिल्लीपर्यंत वन नेशन वन ऍडमिनिस्ट्रेशन? दिल्ली महापालिकेनंतर भाजपचे लक्ष्य मुंबई!
पत्रकारितेची दुनियादारी सोडून मित्राची दुकानदारी सुरू!
बहि-यांच्या देशात आम्ही तानसेन कुणासाठी होणार? मुर्खांच्या राज्यात सत्य कुणाला सांगणार? भित्र्यांच्या गावात पाठिंबा कुणाचा घेणार? आणि दाढी राखणा-यांच्या गावात हजामतीचे दुकान कसे थाटणार? हे असे विचित्र प्रश्न मला माझ्या पत्रकार मित्राने विचारले. त्याने बिचा-याने ‘आता गड्या या पत्रकारितेचे काही खरे नाही’ म्हणून गावात किराणा भुसार मालाचे दुकान सुरू केले. त्याचे म्हणणे अगदीच खोटे नव्हते तो म्हणाला दुकानदारीच करायची आहे तर ही खरीखुरी का करू नये?
पण त्याला कुणीतरी म्हटल दुकानात सुध्दा ‘आज रोख उद्या उधार’ या तत्वानेच धंदा करता येईल बरे का? तिथे ‘कुणी वाचा किंवा वाचू नका आम्ही तर लिहिणार’ अश्या थाटात वागून नाही चालणार. त्यावर तो म्हणाला ठिक आहे रे पण किमान तिथे कुणी मला दुकानदार म्हणून हिणवणार तर नाही ना? मी जे काम करतो तेच मला करू देणार यासारखे अजून काय हवे? इथे जरा कुणाच्या बाजूने लिहिले तर म्हणतात विकला गेला त्या पक्षाचा आहे, विरोधात लिहिले तर म्हणतात सुपारी बाज आहे सुपा-या घेवून लिहितो. आणि फारच कुणाच्या कच्छपी लागला तर म्हणायचे सेटर आणि ब्लँकमेलर असेल. त्यापेक्षा तर हे बरे असेल ना? उधारी काय पुढच्या वेळी नगदी घेवून सुधारी ! तर बिचा-यांचा असा हिरमोड झाला आणि म्हणाला स्तंभातून बाहेर पडून तराजू हाती घेतलेला बरा.
तसे पाहिले तर इथेसुध्दा त्याच्या हाती तराजू होताच नाही का? त्यात तो वाईट आणि चांगले तोलत होता, कुणाच्यातरी सत्याची बाजू बोलत होता, कुणाच्या खोट्याचा बुरखा खोलत होताच ना? पण त्याचे तसे वागणे सध्याच्या काळात सगळ्यांनाच रूचणारे नव्हते. त्याचा त्याला मनस्ताप होता. त्याने खरे बोलावे की खोट्याला खरे आहे म्हणून सांगावे हे त्याच्यापेक्षा इतरांकडून ठरविले जात होते. त्याला त्याचा कंटाळा होता. ‘सत्याला शब्दाची धार, आणि लिहिणा-याला नाही कुणाचाच आधार’ अशी त्याची पत्रकारिता सुरू होती. मग त्याचा कंटाळा येवून तो बाजुला गेला. आणि उदरनिर्वाहासाठी दुकानदार झाला. त्याच्या दुकानदारीच्या धंद्यातही खाचखळगे आहेत, पण तो समजतो की दगडापेक्षा विट मऊ या न्यायाने हे बरे. सुदैवाने त्याची दुकानदारी बरी चालू आहे, दिवसांला हजार बाराशेची कमाई आणि मनाला शांती आहे. आता तो न्यूज पहाताना तटस्थ नसतो. त्याला त्याचे विचार सांगता येतात. त्याच्या भावना मांडता येतात आणि दुकानात येईल त्या गि-हायकाचे ऐकत त्याच्या पुड्या तो बांधू शकतो. त्याच्यासाठी सगळे पक्ष चांगले आणि नेते तर फारच चांगले आहेत. जिएसटी महागाई उसने उधारी यासा-या गोष्टी असल्या तरी त्यावर भूक हा सगळ्यात मोठा उपाय आहे हे त्याला समजले आहे. कारण कुठल्याही पक्षाची सत्ता आली तरी त्याला दुकान चालवयचे आहे माल विकायचा आहे, नफा कमवायचा आहे. ग्राहकदेवाला खुश ठेवायचे आहे. पोट भरायचे आहे. आणि सुखाने जगायचे आहे. कारण त्याचे दुकान आहे पत्रकारिता त्याने सोडली आहे.
वन नेशन वन इलेक्शन, सारेच कसे विलक्षण नाही कां?(One Nation One Election)
मागील वर्षी हैद्राबादच्या महापालिका निवडणुका झाल्या त्यामध्ये ओवेसी आणि भाजप यांनी ज्या प्रकारे वर्गीकरण करून निवडणुकांच्या प्रचाराचा धुमाकूळ घातला तसाच धुमाकूळ आता दिल्लीत सुरू आहे आणि मुंबईत महापालिका निवडणुकीत होणार आहे. दरम्यान गुजरात मध्ये भाजपला घेरण्यासाठी उतरलेल्या आम आदमी पक्षाला हुसकावण्यासाठी भाजपच्या धुरंधर कर्णधारांनी अनेक महिने रखडवून ठेवलेल्या दिल्ली महापालिकेच्या निवडणुकांसाठी गुजरातच्या विधानसभे सोबतच मतदान घेतले आहे. जेणे करून केजरीवाल यांचे लक्ष्य गुजरातवरून कमी व्हावे आणि त्यांना दिल्लीत गुंतवावे असा भाजपचा विचार असावा. अगदी मुंबईत सुध्दा राज्य सरकारने गेल्या वर्षभरापासूनम महापालिका निवडणुकांचे मतदान टाळण्याचा प्रयत्न केला आहे आणि महाराष्ट्रात विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ज्या पक्षाना लोकांचे समर्थन आहे पण त्यांच्याकडे एकाचवेळी सगळ्या पातळ्यांवर उमेदवार उभे करण्यासाठी यंत्रणा माणसे पैसा यांची टंचाई असेल. पण या सा-या गोष्टी एका पक्षाकडेच असतील. मग त्या पक्षाकडून आयारामांना सगळ्या पातळीवर सरंजाम मिळतील आणि एकाच पक्षाची सत्ता खालपासून वरपर्यत असेल. वन नेशन वन इलेक्शन, सारेच कसे विलक्षण नाही कां? यालाच म्हणायचे लोकशाही.
दिल्ली एमसीडीच्या निवडणुकीत हेच पहायला मिळते आहे. तीन महापालिकाचे एकत्रीकरणा नंतर पहिल्यांदाच महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान आहे. देशाच्या राजधानीत गेल्या अनेक महिन्यापासून सत्ताधारी पक्षाने सत्ता जाण्याच्या भितीने निवडणुकां टाळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आपला प्रतिस्पर्धी गुजरातला घराच्या निवडणुकांत दारात येवून डोकावून त्रास देवू लागला तेंव्हा त्याला पळविण्यासाठी महापालिकेच्या निवडणुका आयत्यावेळी घोषित करण्यात आल्या. तीन महापालिका एकत्र केल्याने आयत्या वेळी उमेदवारी आणि निवडणुकांची तयारी यावरून विरोधकांचा गोंधळ उडेल आणि गुरातमधून ते दिल्लीच्या गल्लीतल्या निवडणुकीत पळ काढतील असे समजून खेळ खेळला गेला आहे. दिल्ली महानगरपालिकेच्या २५० प्रभागांमध्ये १३४९ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. भाजप, काँग्रेस आणि आप अशी तिरंगी लढत हेात आहे. दिल्लीत तीन महानगरपालिका होत्या. उत्तर दिल्ली महानगरपालिका, दक्षिण दिल्ली महानगरपालिका आणि पूर्व दिल्ली महानगरपालिका असे तीन भागात विभागणी झाली होती. त्या तीन महानगरपालिकांची एक महापालिका करण्यात आली आहे. या तिन्ही महापालिका भाजपच्या ताब्यात होत्या तर दिल्लीत आपची सत्ता आहे त्यामुळे भाजप विरूध्द आप असा सामना रंगला आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक महत्वाची ठरत आहे. एकूण १३ हजार ६६५ मतदान केंद्रे उभारण्यात आले असून, १ कोटी ४६ लाख ७३ हजार ८४७ मतदार आहेत. या निवडणुकीचा निकाल ७ डिसेंबरला लागणार आहे त्यामुळे या निकालाकडे सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
दिल्ली देशाची राजधानी आहे तर मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, यावेळी मुंबई काबीज करण्यासाठी भाजपची दिल्लीतून रणनिती आखली जात आहे. त्यामुळे दिल्ली महापालिकेच्या निकालासोबतच गुजरातच्या निवडणुकीत भाजपचा आम आदमी पक्षाकडून रसभंग झाला तर भाजप मुंबईत अधिक जोमाने मुसंडी मारेल आणि भाजप दोन्हीकडे किंवा गुजरातमध्ये सत्तेवर आली तर मुंबईत आत्मविश्वासाने मोठा धमाका घडवून आणेल. कारण २०२४च्या लोकसभेचा आर्थिक मार्ग मुंबईतून जातो. मुंबईत धारावी विकास प्रकल्प नुकताच अदानी यांच्या कंपनीला विकासासाठी देण्यात आला. बुलेट ट्रेन मुंबई मेट्रो हे प्रकल्प येत्या वर्षभरात कार्यान्वित होत आहेत. मुंबई महापालिका हाती आल्यावर मुंबईच्या रियल इस्टेट व्यवसायापासून विकास प्रकल्पांवरचा सरकारी सर्व प्रकल्पांचे नियंत्रण एकाच पक्षाकडे असेल जो दिल्लीच्या केंद्र सरकारपासून राज्य आणि महापालिकेपर्यंत राज्य करेल यालाच म्हणायचे नव नेशन वन ऍडमिनिस्ट्रेशन मुंबई महापालिकेच्या कामकाजाची दिशा दिल्लीतून ठरवली जाईल. यालाच म्हणायचे का लोकशाही?
के शू भाई