मंकी बात…

नव्या वर्षात ‘वर्षा’ वर आणखी नवा सत्तांतराचा प्रयोग?, पहायला मिळू शकतो! याची चुणूक दाखविणारे हिवाळी अधिवेशन!

सन २०१९ मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाने अनपेक्षीत कूस बदलून महाविकास आघाडीला जन्म दिला. त्यानंतर जून २०२२मध्ये दुस-यांदा कूस बदलत बंडखोर गटासोबत भाजपचे महायुती सरकार सत्तेवर आले. मात्र सन २०२३मध्ये राज्याला तिस-यांदा राजकीय कूस बदलाचे वेध लागले आहेत, त्याच्या प्रसव वेदना विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या घडामोडीत जाणवल्या. त्याचे विश्लेषण करूया

महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन(Winter Session) सुमारे दोन वर्षांच्या खंडानंतर १९ ते ३० डिसें, २२दरम्यान नागपूरात पार पडले. हे अधिवेशन सर्वार्थाने ऐतिहासिक महत्वाचे अधिवेशन म्हणावे लागेल. त्याची कारणे अनेक आहेत .महाराष्ट्रात सन २०२ २च्या जून महिन्यात झालेल्या राजकीय भुकंपानंतर राज्यात स्थापन झालेल्या एकनाथ – देवेंद्र सरकारच्या सहा महिन्यांच्या कारकिर्दीचा हा टप्पा म्हणता येईल. तर उण्या-पु-या दहा दिवसांच्या (२ आठवडे) या अधिवेशनात ज्या राजकीय घडामोडी झाल्या त्यात पडद्यामागचे राजकारण काही थांबताना दिसले नाही.

सत्तेवर आल्यापासून शिवसेना (ठाकरे) आणि बंडखोर गट यांच्यातील कुरघोडीच्या राजकारणाची मालिका अधिवेशना दरम्यान सुरूच होती, आणि उध्दव सेनेकडून शाब्दिक घाव घालण्याचे तसेच त्याला हवेत झेलून प्रतिघाव घालण्याचे सत्र देखील सुरूच राहिलेच उलट त्यात भर कार्यालये ताब्यात घेण्याच्या घटनांनी घडली. तर ऐन अधिवेशनाच्या धामधुमीतही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याच्या दिल्लीवा-या सुरूच राहिल्या आणि महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाच्या मुद्यावरून दिल्ली बंगळुरू मुंबई लपाछपीच्या खेळात जराही कमी आल्याचे दिसले नाही. अधिवेशनात विरोधी पक्षांकडून मुख्यमंत्र्याच्या भुखंड भ्रष्टाचारापासून त्यांचे सहकारी मंत्री अब्दुल सत्तार,उदय सामंत यांच्यासह शंभुराज देसाई यांच्या भुखंड भ्रष्टाचाराच्या बातम्या आरोप आणि खुलाश्यांच्या घटना चवी पुरत्याच पहायला मिळाल्या. तर विधानसभा अध्यक्षांवर विरोधकांकडून अविश्वास प्रस्तावाची घाईने चर्चा आणि त्यातून विरोधकांतील बेकीचे दर्शनही पहायला मिळाले. एकूणच वेगवान घटना घडामोडीच्या या सत्रात नागपूरचे हवामान फारश्या थंडीचे नसले तरी राजकीय गारठा मात्र हवामान बदलाच्या काळात फारसा जाणवलाच नाही.

या अधिवेशनात विदर्भात नेहमीचा जो मागास भागांच्या विकासाचा मुद्दा चर्चेला येतो तो देखील काही प्रमाणात आला मात्र त्यावर चर्चा होताना अनुशेष दूर झाल्याच्या किंवा होण्याच्या चर्चा होताना दिसल्या आणि वेगळ्या विदर्भ मराठवाडा राज्याच्या चर्चेऐवजी समृध्दी महामार्गाच्या गेमचेंजर प्रकल्पाच्या चर्चा होताना दिसल्या. तर दुसरीकडे महाराष्ट्राचे तुकडे करण्याच्या कर्नाटक सीमावादाच्या आणि मराठी अस्मितेच्या मुद्यावर उध्दव ठाकरे यांच्या दोन तीन दिवसांच्या विदर्भातील भेटीत चर्चा होताना दिसल्या त्या पलिकडे फारसे काही होताना दिसले नाही. कर्नाटक सीमावादाचा मुद्दा ठाकरे यानी विधानपरिषदेत ज्या तडफेने मांडला तितका तो विधानसभेत जाणवला नाही. कर्नाटक च्या भुमिकेविरोधात सीमावासियांच्या सोबत संघर्षासाठी ठराव करण्यात आला मात्र त्यातही  सत्ताधारी पक्षाच्या वरिष्ठ  नेत्यांसाठीचे हे ‘कर नाटक ” असल्याचे जाणवत राहिले. याचे कारण सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचे या सत्रापूरते करण्यात आलेले निलंबन असल्याचे सांगण्यात येत आहे. तर विरोधीपक्षनेते अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील राजकीय मैत्रीचे कारण असेल, शेवटच्या दोन दिवसांच्या भाषणांपलिकेडे विरोधकांना अनेक मुद्दे असूनही सत्ताधारी पक्षाला फारसे कोंडीत पकडायचे नसावे असे जाणवत राहिले. किंवा कॉंग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांच्या राजकीय भुमिकांमध्ये समन्वयाचा आभाव किंवा नेत्यांच्या आपासातील राजकीय दृष्टीकोनातील तफावत यामुळे विरोधकांना मह्णावा तसा प्रभाव दाखवता आला नसावा. सर्वात भाव खावून गेले ते मुख्यमंत्र्याचेअंतिम आठवडा प्रस्तावाच्या उत्तरादाखल करण्यात आलेले भाषण. गेल्या सहा महिन्यात भाषणाच्या बाबतीत नेहमीच चेष्टेचा विषय ठरलेले  मुख्यमंत्री यावेळी नाव न घेता अगदी सराईत गोलंदाजासारखे त्यांच्या जुन्या काळातील भुमिकांचे समर्थन करताना दिसले, त्याचवेळी जुन्या पक्षप्रमुखांना कोसताना त्यांच्यात नव्याने काही बदल झाल्याचे दिसले. तरी देखील त्यांनी या भाषणाच्या अखेरीस संयतपणाने ‘मी शांत आहे हतबल नाही’ असे शेरो शायरी करत  साधेपणाने सांगितले. असे म्हणत असतानाच बाजुलाच बसलेल्या फडणवीसांना त्यांनी पेचात टाकणारे वक्तव्य त्यांच्याच शैलीत ऐकवले ते म्हणजे ‘हे सरकार हा कार्यकाळ पूर्ण करेल आणि आम्हीच पुन्हा येणार आहे!  त्यांच्या या उदगारांनी एकाच वेळी समोरच्या बाकावरच्या अजित पवार यांचे डोळे चमकले, तर विरोधी बाकांवरच्या अनेकांचे डोळे विस्फारले गेले.

मुख्यमंत्री म्हणाले की, पुढची अडीच वर्ष झेंडा अजेंडा आमचाच असेल आणि त्यानंतर सुध्दा आम्हीच पुन्हा येणार आहोत मुख्यमंत्र्याच्या विधानसभेतील ‘मी पुन्हा येणार’ च्या ना-याने फडणवीसांसोबत त्यांचे छुपे राजकीय युद्ध सुरू असल्याचे स्पष्ट झालेच शिवाय त्यांच्या समोर उध्दव ठाकरे हे राजकीय लक्ष्य असल्याचे देखील स्पष्ट झाले. त्यामुळे या सत्रात मुख्यमंत्र्यावर नागपूर सुधार प्रन्यास मध्ये भ्रष्टाचार केल्याप्रकरणी भाजपच्या कार्यकर्त्याच्या  न्यायालयातील याचिकेवरुन राजीनाम्याची मागणी करत लक्ष्य केल्याचे दिसले . तरी दोन दिवसांनी फडणवीसांनीच मुख्यमंत्र्याची बाजू घेत त्यांना क्लिन चिट दिल्याचेही  दिसले. त्याचवेळी विधानसभेत फडणवीसांनी विरोधीपक्षनेत्याच्या मैत्रीच्या बळावर चर्चा न करताच विरोधकांकडून अन्य मुद्यावर सभात्याग झाला असताना घाईने लोकायुक्त विधेयक मंजूर करून घेतले. ज्यात मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनाही चौकशीच्या फे-यात घेण्याची तरतूद आहे. मात्र वरिष्ठ सभागृहात फडणवीसांना तसे करता आले नाही.

मागास भागांच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांच्या केंद्रीय निधी मदतीच्या आधारे घोषणा करताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी या सत्रात ५३ हजार कोटीच्या पुरवणी मागण्या मंजूर करून घेतल्या आहेत. तरी अगदी अधिवेशन संपताच त्याच दिवशी त्याच त्याच शासकीय सनदी अधिका-यांच्या बदल्याचे फेरआदेश काढण्यात आल्याने या सरकारचे निविदा आणि बदल्या या विषयांवरचे विशेष प्रेम असल्याचे पुन्हा उघड झाल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर दुस-या आठवड्यात शेवटच्या दिवशी आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यानी जिल्हा पातळीवर मुख्यमंत्री कार्यालय सुरू करण्याची घोषणा देखील याच प्रावादाला बळ देणारी असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्यामुळे लोकांचा मुंबईत येण्याचा त्रास वाचेल मुख्यमंत्री म्हणाले.

अधिवेशनात सुरुवातीला विरोधकांनी सीमाप्रश्नावर आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसले मात्र मध्येच मुख्यमंत्र्याच्या एनआयटीमधील; कथित भुखंड घोटाळ्याचे प्रकरण डोकावल्याने हा राजकीय योगायोग कसा जुळला त्याच्या चर्चा रंगल्या. त्यानंतर फडणवीसांची दिल्लीवारी आणि पाठोपाठ पंतप्रधानाकडे कार्यक्रमाच्या बैठकीचे निमित्त सांगत मुख्यमंत्र्याची दिवसभर दिल्लीवारी झाली आणि फडणविसांचा मुख्यमंत्र्याची बाजू मांडणारा खुलासाही आला. मात्र याच सत्तार मुख्यमंत्र्यासह मंत्र्याना त्यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी मंजूर करायच्या लोकायुक्त विधेयकाला विधानसभेत चर्चेविनाच मंजूरी देण्यात आली. त्यापूर्वी सांगलीच्या जयंत पाटलांना जे जत आटपाडी पासून एकनाथ शिंदेच्या बंडाच्या राजकारणापर्यंत राष्ट्रवादीची नेमकी भुमिका मांडतील या भितीतून सत्ताधारी बाजूने त्यांच्या निलंबनाचा ठराव मंजूर करून अधिवेशनातून बाजुला करण्यात आले.

त्यानंतर दुस-या आठवड्यात शेवटच्या दिवशी आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यानी मी शांत आहे म्हणजे हतबल नाही खमोश हू मगर सब जानता हू बात निकलेगी तो बहोत दूर तक जायेगी. अश्या शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर नाव न घेता विधानसभेत अतिम आठवडा प्रस्तावाच्या भाषणात टिका केली. तर या सत्रात दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात सत्ताधारी भाजप सदस्यांच्या आग्रहवरून उपमुख्यमंत्र्यानी उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा केली आहे. यावेळी दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणी सीबीआयने कोणतीही चौकशी केली नसल्याचे सांगण्यात आले. तर भाजपचे अतुल भातखळकर यांच्या पुढाकारामुळे  माजी मंत्री सुभाष देसाई आणि त्यांचे चिरंजीव भूषण यांची चौकशी करण्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घोषित केले आहे. तर सिध्दिविनायक देवस्थानच्या अध्यक्षपदी असणारे आदेश बांदेकर आणि स्काऊट आणि गाईड संस्थेच्या नावे कथित भ्रष्टाचार केल्याच्या आरोपांवरून वरुण सरदेसाई यांच्या चौकशीची घोषणा विधानसभेत शिंदे – फडणवीस सरकारने केली आहे. याच सत्राच्या सुरूवातीला विधिमंडळ पक्ष  कार्यालयावर शिंदे गटाचा कब्जा करण्यात आला आहे, तर त्याचेवळी नव्या मुंबईतही कार्यालये ताब्यात घेण्यात आली याचे संकेत मुंबई महापालिका निवडणुकीची घोषणा झाल्यावर सेना भवनावरही बाळासाहेबांची शिवसेना कब्जा करत उध्दव ठाकरे यांचे लक्ष आणि वेळ निवडणुकां ऐवजी कोर्ट कचेरीत घालविण्याच्या विचारात आहे असे संकेत मिळत आहेत असे बोलले जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी विरोधीपक्षांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना विधानसभेत शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्यावर नाव न घेता घणाघाती टिका केली. यावरून भविष्यात ते शांतपणे ठाकरेंना टारगेट करायला मागेपुढे पहाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र मुख्यमंत्री म्हणून त्यावर आता फार लक्ष न देता राज्याच्या कल्याणाच्या प्रश्नांवर काम केले पाहीजे असे सांगत विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्याच्या उत्तरांने समाधान झाले नसल्याचे सांगितले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या काही दिवसांपुर्वी आम्ही नवे सरकार स्थापन केले. त्यानंतर सातत्याने आमच्यावर टिका केली जात आहे, तोंड आहे म्हणून कुणीही काहीही बोलत आहे. ते म्हणाले की मला ‘हेलिकॉप्टर मध्ये शेतावर जाणारा मुख्यमंत्री’ म्हणून हिणवले गेले, तर आता मला पण बोलायला हवे की ‘अडीच वर्ष लोकांना न भेटणारा मुख्यमंत्री दाखवा आणि एक लाख बक्षीस मिळवा’. पण आम्ही हे बक्षीस द्यावे लागू नये म्हणून काम न करणारा मुख्यमंत्रीच बदलून टाकला. ते म्हणाले की, आम्ही कोविडच्या काळात देखील रस्त्यावर होतो. आणि लोकांना मदत करत होतो. कारण आम्ही देणे जाणतो, आम्ही ‘देना बँक’ आहोत ‘घेना बँक नाही असे म्हणत त्यांनी ‘टोमणे सेनेला त्यांच्या शैलीत उत्तर देत हिणवल्याचे सांगितले’ तेंव्हा मुख्यमंत्री आता फॉर्मात असल्याचे जाणवले.

राज्यातून उद्योग गेल्याच्या ठाकरेंच्या टिकेला यावेळी नाव न घेता उत्तर देताना  ‘त्या काळात उद्योजक येत नव्हते कारण त्याकाळात राज्यकर्ते असलेल्यांचे अन्य इंटरेस्ट असल्याने उद्योजकांना त्रास होत होता. त्यामुळे उद्योग राज्याबाहेर जात होते’ असे त्यांनी सांगून टाकले. मुख्यमंत्री म्हणाले की, त्यामुळे एकनाथ चुकू शकेल पण आम्ही निर्णय घेणारे ५० लोक चुकू शकत नाहीत, आम्हाला अंधश्रध्दा वगैरे म्हणतात आणि प्रबोधनकारांचे वारसदार असल्याचे सांगणारे वर्षा बंगल्यातून गेले तेंव्हा घमेलेभर लिंबू सापडले असा उल्लेख मुख्यमंत्र्यानी केला तेंव्हा विधानसभा अवाक झाली. शरद पवारांच्या राजकीय अजेंड्यावर शिवसेना (ठाकरे) काम करते असे सांगताना ते म्हणाले की आम्ही रेशीम बागेत गेलो तर टिका करता पण तुम्ही गोविंदबागेत जाता त्याचे काय़? आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात  आमची हिंमत काढतात आणि स्वत: घरात बसतात असे ते म्हणाले. आम्ही जर बोलायचे ठरवले तर सगळी ‘अंडी पिल्ली माहिती’ आहेत, पण आम्ही ते करत नाही. बाळासाहेबांचा वारसा सांगणारे आम्ही आहोत ‘तुम लडो हम कपडे संभालेगे’ असे बाळासाहेब नव्हते जे केले त्याचे समर्थन करणारे होते असे मुख्यमंत्री म्हणाले. ते म्हणाले की आमच्यावर टिका करणारे स्वत: मात्र बाळासाहेबाना अटक करणा-यांच्या मांडीला मांडी लावून बसतात आणि आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करताना त्यांच्याच सरकारमध्ये गृहमंत्री तुरुंगात गेले आणखी एक मंत्री दाऊद सोबत संबंध असल्याने आंत आहेत त्यांचा राजीनामा यानी का घेतला नाही?

मुख्यमंत्री म्हणाले की यांनी देवेंद्र फडणवीस यांना देखील अडकविण्याचा प्रयत्न केला, पत्रकारांवर कारवाया केल्या अभिनेत्री कंगना अगदी केंद्रीय मंत्री राणे खासदार आमदार राणा यांच्यावर कारवाई केली आणि त्यावेळी जे केले तो सत्तेचा माज नव्हता काय? हा केवळ पदावर असल्याने केलेला ह्ट्ट होता की नाही? असे म्हणत त्यानी ‘राणे राणावत राणा, हाच आमचा हिंदुत्वाचा कणा’ असल्याच्या सहयोगी पक्षांच्या भुमिकेचे अप्रत्यक्ष समर्थन केले. शेवटी मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही लोकायुक्त कायदा करण्याची हिंमत दाखवली पण तुम्ही भ्रष्टाचा-यांना पाठिशी घातले. ते म्हणाले की मी  शांत आहे म्हणजे हतबल नाही खमोश हू मगर सब जानता हू बात निकलेगी तो बहोत दूर तक जायेगी. असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्याच्या भाषणावर राईट ऑफ रिप्लाय देताना  विरोधीपक्षनेते अजित पवार म्हणाले की, सहा महिन्यापूर्वी काय झाले ते सर्वाना माहिती आहे, त्यानंतर तुम्ही ज्या पक्षात होता त्यांची टिका होणे स्वाभाविक आहे. मात्र तुम्ही आमच्या प्रश्नाची उत्तरे न देता बाहेर कुणी काय बोलतो त्यावर येथे भाषण केले हे करू नका. १३ कोटी जनतेने तुम्हाला संधी दिली आहे त्याच्या कल्याणासाठी काय केले ते सांगा. तुम्ही मुख्यमंत्री आहात याचे भान ठेवा आणि तुमच्या मुलाच्या वयाच्या लोकांच्या टिकेवर लक्ष देवून राज्याच्या जनतेच्या हिताच्या मुद्यावरून लक्ष ढळू देवू नका हे तुमचा जुना सहकारी आणि मित्र म्हणून सांगतो असे पवार म्हणाले. छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्राचा देशात मोठा मान आहे तो वाढवण्यासाठी काम करा असे सांगत अजित पवार यानी नजिक भविष्यात राजकीय पटलावर आणखी नवा सत्तांतराचा प्रयोग देखील पहायला मिळू शकतो याची चुणूक दाखविल्याचे आता बोलले जात आहे.

के शू भाई.


मंकी बात

मं की बात

 

Social Media