. . पण खरेच सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून या राज्यात काही काम गेल्या पाच दहा वर्षात झाले का? यावर खूप मोठा तज्ज्ञांचा अभ्यास गट नेमून कधीतरी वास्तव समोर आणायला हवे नाही का? कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र?(Maharashtra) अशी जाहीरात करून २०१४ मध्ये जो पक्ष सत्तेवर आला. त्यालाच आता हाच प्रश्न सा-या जनतेने विचारावा अशी शोचनीय अवस्था महाराष्ट्राची सा-याच आघाड्यांवर करून ठेवण्यात आली आहे.
देवाच्या आळंदीत वारीच्या प्रस्थान यात्रेत राज्याच्या पोलीसांनी लाठीमार केल्याची अभूतपूर्व घटना घडल्याची अफवा उठवण्यात आली, काही माध्यमांतून याच्या चित्रीकरणाच्या बातम्या देण्यात आल्या नंतर त्या बाजुला करून बाचाबाची अशी बातमी देण्यात आली, त्यानंतर अगा जे घडलेची नाही असा खुलासा गृहमंत्र्यापासून पोलीस अधिका-यांपर्यत सा-यांकडून करण्यात आला. म्हणजे काही तास राज्यातील जनतेला व्हेंटीलेटरवर ठेवून त्यांच्या संयमाची जणू परिक्षाच घेण्यात आली म्हणायची का? ज्यातून हिंदू समाज(Hindu society) चिडून उठेल अशी काही धारणा ठेवून ही घटना घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. शांती क्षमा अहिंसा या त्रिसूत्रीचा पुरस्कार करणा-या वारकरी संप्रदायाच्या शतकानुशतकांच्या वारीच्या कार्यक्रमात पहिल्यांदाच अश्या प्रकारे पोलीसांचा हस्तक्षेप पहायला मिळाला. त्यावर राज्यभरातून तिव्र प्रतिक्रिया आल्या. राज्यात हिंसाचार व्हावा लोकांनी रस्त्यावर यावे, काचा फुटाव्या, डोकी फुटावी, त्याचे खापर कुठल्या तरी समाजवर्गावर फुटावे, त्यातून वोटबँकचे राजकारण करता यावे असा हा अटोकाट प्रयत्न सध्या राजकीय पक्षांच्या आशिर्वादाने सुरू आहे की काय? याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संशय व्यक्त केला आहे. राज्याचे जुने जाणते नेते शरद पवार यांनी तर स्वच्छ शब्दात या प्रकाराचा समाचार घेतला. त्यावर त्यांना औरंगजेब (Aurangzeb)या विषयावर दुषणे देण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षांकडून झाला.
त्या आधी महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar)येथे मंदिरात मुस्लिमांनी घुसण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेचा बागुलबुवा करण्यात आला. त्यातून हिंदू मुस्लिम(Hindu Muslims) वर्गीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण या देशात अब्दुल कलाम यांना मिसाईल मँन म्हटले जाते आणि त्यांनी निर्माण केलेल्या तंत्रज्ञानाची हेरगिरी शत्रूराष्ट्राला करण्यासाठी मदत करणारा एक मराठी हिंदू शास्त्रज्ञ हनीट्रँपमुळे सध्या अटकेत असल्याने चर्चेत आहे, हे विराट वास्तव आहे. त्यामुळे कोणत्याही विशिष्ट समाज घटकाला तो देशविरोधी आहे म्हणून शिक्का मारता येत नाही. अनेकदा चुका या व्यक्तिगत असतात, त्यात सामाजिक, राजकीय आशय असेलच तर सत्ताकांक्षी राजकारणी नेत्यांचा असतो. जो २०१९ पासून महाराष्ट्रात अगदी यथेच्छ पहायला मिळाला. केवळ ‘मी पुन्हा येईन’ या ध्यासासाठी काही नेते आपसात भिडले त्यांची राजकीय धुळवड झाली. संगीत खुर्ची असावी तसे मुख्यमंत्र्याच्या खुर्चीचे राजकारण करत इथल्या माणसा माणसात भेदाच्या भिंती निर्माण करण्यात आल्या. त्यातून बाहेरच्या राज्यातील लोकांनी या राज्यातील उद्योग, पैसा जमिनी, अस्मिता पळविण्याचा डाव साधला. आणि आम्ही मात्र आपसात कोंबड्या झुंजविण्याचा खेळ करत स्वार्थी राजकारणासाठी शिवरायाच्या रयतेची दौलत उधळून लावत राहिलो. त्याची ना खंत, ना खेद, उलटपक्षी कुणी चुकांवर बोट ठेवले तर त्यालाच ठेचण्याची भाषा? हा उर्मटपणा, हा सत्तापिपासूपणा औरंग्याच्या धाटणीचा हा लाजीरवाणा खेळ! या महाराष्ट्राच्या शिवरायांच्या मातीत सुरू आहे. पण भोगावे सोसावे लागते महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेला. जिला मताच्या अधिकारामुळे हे राजकीय नेते बांधिल आहोत असे तोंडदेखले का होईना म्हणताना दिसतात. पण खरेच सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून या राज्यात काही काम गेल्या पाच दहा वर्षात झाले का? यावर खूप मोठा अभ्यास गट नेमून कधीतरी वास्तव समोर आणायला हवे नाही का? कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र अशी जाहीरात करून २०१४ मध्ये जो पक्ष सत्तेवर आला. त्याला आता हाच प्रश्न सा-या जनतेने विचारावा अशी शोचनीय अवस्था महाराष्ट्राची सा-याच आघाड्यांवर करून ठेवण्यात आली आहे.
छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्रात सध्या काय सुरू आहे?
सत्ताकारणाच्या राजकारणासाठी तरुणांची माथी भडकवण्याचा उद्योग काही धर्मांध करताना दिसत आहेत. त्यांना या देशात या राज्यात हिंदू विरुध्द मुस्लिम अश्या वर्गवारीतून जातीय धार्मिक तेढ निर्माण करायची आहे हे यातून दिसून येत आहे. हे आताच कश्यासाठी? तर येत्या वर्षभरात या राज्यात देशात मोठ्या प्रमाणात निवडणुका(Elections) आहेत. त्या आपण आपल्या स्वबळावर कार्यकर्तृत्वार जिंकणार नसल्याचा विश्वास असल्यानेच मतांची विभागणी करून डाव साधण्याची खेळी करण्यासाठी तर नव्हे! जे कर्नाटकच्या जनतेने नुकतेच ओळखले आणि झुगारून दिले तेच हे राज का रण? त्यातून मतदान करताना ‘ते विरूध्द आम्ही’ अश्या त्या धार्मिक(religious) वर्गवारीतून व्हाव्या असा कुणाचा तरी मनसुबा आहे, हे आतापर्यंतच्या घडामोडीतून समोर आले आहे. पण हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र केवळ औरंग्याचे स्टेटस कुणी ठेवले म्हणून आपल्याच गल्ली, मोहल्यात, गावात, शहरात, आपल्याच भाईबंधाची घरेदारे पेटवापेटवी करणार नाही. कारण त्याच्या नसानसात भिनल आहे सामाजिक एकोप्याचे, सर्वधर्मसमभावाचे, बंधुत्वाचे, शाहू फुले आंबेडकरांच्या तत्वाचे विचार! भारतीय संविधानाच्या प्रतिज्ञेतील शब्द . . ‘भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. या संविधानाच्या स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या त्रिसूत्रीचा मी पाईक आहे. त्याच्या रक्षणासाठी मी कटीबध्द आहे.’
गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रात फक्त सत्तेसाठी वाटेल त्या प्रकारच्या घडामोडी होताना या देशातील जनतेने उघड्या डोळ्यानी पाहिल्या. ज्या संविधान आणि कायद्याच्या चौकटी तोडून मोडून केवळ कुठल्या तरी राजकीय पक्षाला त्याच्या नेत्यांना सत्ताकांक्षा आहे, म्हणून घडवून आणण्यात आल्या. त्यामागे या देशातील राज्यातील जनतेचे हित, कायद्याची रित आणि नैतिक भित या सा-या बाबी खुंटीला टांगून ठेवण्यात आल्या. हे सारे करणारे कर्तेकरविते नेते शेंडीला तूप लावून सुरूवातीला म्हणत होते की, ‘जे काही घडते आहे त्याच्याशी आमच्या पक्षाचा आमचा काहीच संबंध नाही’. मात्र नंतर त्यांनी जे काही घडवले त्याचा पर्दाफाश भर विधानसभेत मुख्यमंत्री शिंदे(Chief Minister Shinde) यांनी केल्यानंतर त्या पक्षाच्या नेत्यांनी ‘आम्ही बदला घेण्यासाठी’ हे सारे केले अशी कबुली जाहीरपणे दिली. अरे देवा, या महाराष्ट्रात मुंबईत ७० – ८० च्या दशकात गँगवॉर(Gangwar) आम्ही पाहिली होती. त्यात एक गुंड टोळी दुसरीच्या म्होरक्यांचे मुडदे पाडून ‘बदला घेतला’ असे म्हणत असे. पण यशवंतराव चव्हाण, यांच्या पंरपरेतील महाराष्ट्रात एका मंत्र्याने ‘राजकीय सामाजिक बदलासाठी’ राजकारण करणे अभिप्रेत असताना ‘राजकीय सूडासाठी बदला घेण्यासाठी राजकारण’ केल्याची किळसवाणी कबुली जाहीरपणे द्यावी. आणि त्या पक्षाच्या यच्चयावत विव्दानांना, नेत्यांना कार्यकर्त्यांना समर्थकांना अरे कुठे घेवून चाललो आहोत आपण महाराष्ट्र? असा प्रश्न पडला नाही, हे कश्याचे लक्षण समजायचे?
या देशात लोकशाही आहे. सामाजिक राजकीय बदलासाठी लोकांचे मत विचारात घेतले जाते. बहुमताने या देशात बदल केला जातो तो सामाजिक राजकीय आणि अन्य सा-याच बाबतीत ग्राह्य समजला जातो. त्यासाठी घटना कायदा यामध्ये नियम परंपरा आणि प्रथांचे पालन केले जाते. नैतिक आचारसंहिता ज्याला ‘मनाची नाही पण जनाची’ म्हणतात ती भिती नितीमत्ता! गृहीत धरली जाते. मात्र इथे २०१९पासून काय सुरू आहे? दोन पक्षांच्या सर्वोच्च नेत्यांच्या व्यक्तिगत महत्वाकांक्षा इतक्या मोठ्या समजल्या गेल्या की त्या भोवती राज्याचे देशाचे राजकारण १८० डिग्री फिरवण्यात आले. राजकीय पक्ष फोडण्यासाठी साम दाम दंड भेद निती वापरण्यात आल्या. जनतेच्या पैश्याचा अपव्यय होत असताना तो न थांबविता ‘अनितीने सत्तेला दासी बनविण्याचा खेळ’ करण्यात आल्याने ‘असंगाशी संग’ करण्यात आला. वैचारीक, सामाजिक, आशय लक्षात न घेता युत्या आघाड्या करण्यात आल्या. यातूनच जनकल्याण होत असल्याच्या गप्पा सांगण्यात आल्या. जनतेच्या भल्या बु-याचा विचार न करता निर्णय घेण्यात आले. राज्याच्या तिजोरीवर कर्जाच्या डोंगराचा भार देवून लुटमार बिनदिक्कत केली जात आहे. लोकशाही म्हणजे लोकांचे लोकांनी लोकासाठी चालविण्यात आलेले राज्य ही संकल्पना बाजुला ठेवून ‘मुठभरांनी मुठभरांसाठी केलेल्या उचापतीचे कुलंगड्याचे आणि कुरापतीचे बेभानपणे केलेले समर्थन म्हणजे लोकशाही’? अशी कुजट कुबट व्याख्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ‘या भुमंडळाचे ठायी धर्मरक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे’ असे म्हटले गेलेल्या शिवप्रभूंच्या या राज्यात महाराष्ट्रात काहीच सांगायची सोय देखील ज्यांच्या या सत्तासैतानाने ठेवली नाही. असो.
त्या पलिकडे जावून ज्यांच्या मनातील सत्ताकांक्षा शमली नाही अश्या सैतानी डोक्याच्या औरंगजेबी सत्तापिपासू नेत्यांच्या डोक्यातून या शिवशंभूच्या राज्यात हिंदू मुस्लिम असे वर्गीकरण करून जनतेत फूट पाडून सत्ता मिळवण्यासाठी लोकांचे रक्त सांडायचे मनसुबे आखले जात आहेत. राज्याची भाबडी तरूण पिढी सडविण्याच्या तिच्या हाती भिक्षेचा कटोरा देण्याच्या या मतलबी राजकारणाचा कठोर शब्दात समाचार म्हणूनच घेतला पाहीजे. या देशात राज्यात लोकांच्या मुलभूत विकासाचे स्वप्न दाखवून त्यांची लुटमार सुरू आहे. महागाईच्या मुद्यावर भ्रष्टाचाराच्या मुद्यावर सत्तेवर आलेल्या पक्षाच्या नेत्यांकडून सत्ता मिळाल्यानंतर ज्या प्रकारचे वर्तन आणि भाषा सुरू आहे ते पुन्हा त्यांच्या कच्छपी सामान्य माणूस लागणार नाही अश्या प्रकारचे आहे.
पूर्ण.
के. शू. भाई.