मराठा, धनगर आरक्षणाच्या रेट्यात भाजपचा ‘गेला ‘माधव’ कुणीकडे?
फडणवीस डिट्टो पवारांसारखेच करताना का दिसत आहेत?
महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकीत भाजपला मराठा(Maratha) समाजाने मोठ्या प्रमाणात नाकारल्याचे दिसत आहे. तर धनगर (dhangar)समाजाची मतेही त्यांच्याकडे पूर्वीसारखी एकतर्फी आली नाहीत. याचे कारण गेली चार पाच वर्ष आरक्षण (reservation)विषयावर या पक्षाच्या नेत्यांनी जो कायदेशीर घोळ आणि गोंधळ घालून दिशाभूल करण्याचा सपाटा लावला हेच आहे, असे जाणकारांचे मत आहे. भाजपचा हक्काचा ओबीसी(OBCs) मतांचा ‘माधव पॅटर्न’ यावेळी चालला नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मराठा, धनगर आरक्षणाच्या रेट्यात भाजप आणि फडणवीसांना गेला माधव कुणीकडे? असा प्रश्न पडला आहे! या सा-याचे धनी फडणवीस आहेत हे कुणी म्हणायच्या आधीच त्यांनीच ते मान्य़ करून टाकले आहे, त्यामुळे ते मला मुक्त करा म्हणत असावेत असे आता बोलले जात आहे. मात्र फडणवीस यांना बाजुला केले तर कोण? असा प्रश्न निर्माण होतो त्याचे सध्या नेमके थेट उत्तर देता येत नाही, त्यामुळे शरद पवार(Sharad Pawar) यांनी आत्मचरित्राच्या कार्यक्रमात अध्यक्षपदावरून आता ‘मला मोकळं करा’ म्हणत जसे खुंटी हलवून बळकट केली तसेच फडणवीस डिट्टो पवारांसारखेच करताना दिसत आहेत!
अठराव्या लोकसभेसाठी चार जूनला मतमोजणी झाली त्यातून देशात दहा वर्ष स्वबळावर सत्ता राबविणा-या भाजपला मतदारांनी बेदखल करत आघाडी सरकार म्हणून जनादेश दिल्याचे दिसत आहे. त्याचवेळी दुबळ्या झालेल्या विरोधकांना देखील पुरेसे बळ देण्याचे काम मतदारांनी केले आहे. लोकसभेत एकतर्फी निर्णय सरकारला घेता येणार नाहीत असे संख्याबळ विरोधकांना देवून सत्ताधिशांवर अंकूश ठेवायचे काम मतदारांनी केल्याचे दिसत आहे. या निवडणूकांच्या हार जितीचे विश्लेषण आता होत आहे. त्यानंतरच्या राजकीय घडामोडींचा वेधही घेतला जात आहे.
या निवडणुकीत सपाटून मार खाणा-या भाजपच्या पराभवाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी घेतली असून त्यांनी आपल्याला सरकारमधून मुक्त करावे असे म्हटले आहे. २०२२ मध्ये आधी सेना आणि नंतर राष्ट्रवादी फोडून पायावर धोंडा मारून घेतल्याची ही अप्रत्यक्ष कबूली देतानाच फडणवीस(Fadnavis) यांची विधानसभेसाठी काहीतरी अजून ‘पक्षकार्य’ करण्याची इच्छा असल्याचे त्यानी बोलून दाखवले आहे. फडणवीस(Fadnavis) यांनी जाहीरपणे अश्रू ढाळल्याचे माध्यमांतून दाखविण्यात आले. पण या सा-या स्थितीला ते एकटेच कारणीभूत असल्याचे आता काही विरोधक आणि माध्यमांनी सांगणे त्यांच्यावर अन्याय करणारे असून हे तितकेसे योग्य नाही. सध्याच्या भाजपमध्ये दोन मोठे नेते केंद्रात बसले आहेत आणि त्यांच्या हुकूमशाही पध्दतीच्या वरवंट्याखाली फडणवीस यांच्यासारख्या हुशार नेमस्त राजकारण्याची फरफट झाली आहे हे देखील वास्तव समजून घ्यायला हवे. संघ आणि भाजपच्या शिस्तीत वाढलेल्या फडणवीस यांना या हटवादी नेत्यांच्या मागे फरफटत जावे लागले आहे. आज जर राज्यात पुन्हा ४०+ जागा आल्या असत्या तर फडणवीस यांच्यापेक्षा जास्त कॉलर ताठ करत भाजपचे तथाकथित ‘दिल्लीतील चाणक्य’ पुढे आले असते. त्याचे श्रेय त्यांनी घेतले असते, आता बळीचा बकरा म्हणून फडणवीस यांना लक्ष्य केले जाणे स्वाभाविक आहे. राज्यात ज्या जागा भाजपला मिळाल्या त्यात नागपूरात फडणवीसांविरोधात बरेच काही सांगण्यात येत आहे. तेथे गडकरी संघ आणि स्वत:च्या बळावर विजयी झाले असे मानले तर विदर्भ (Vidarbha)आणि मराठवाड्यात (Marathwada)भाजपचे पानीपत(Panipat) झाले आहे. मात्र संभाजीनगरसह शिंदे गटाला ज्या सात जागा मिळाल्या त्या भाजपच्या सोबतीमुळेच मिळाल्या आहेत असे आता भाजपकडून सांगण्यात येत आहे. त्यात कल्याण, ठाणे, मावळ, बुलडाणा, मुंबई उत्तर पश्चिम या जागा तर सरळपणे भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या मेहनतीवर आल्याचे दिसत आहे. तर रायगडची(Rayagada) एक जागाही पवार यांना भाजपमुळेच मिळाली आहे हे वास्तव आहे. त्यामुळे या जागांचे खरे श्रेय भाजप आणि फडणवीस यांचेच आहे, मात्र आता त्यांना त्याचे श्रेयही धडपणे घेता येत नाही अशी स्थिती आहे. पवार- शिंदेना सोबत घेवून फडणवीस यांनी स्वत:ची स्थिती ‘अगं अगं म्हशी मला कुठे नेशी’ या मराठीतील म्हणीसारखी करून ठेवली आहे. फडणवीस यांनी त्यांच्या राजकीय जीवनात अवमान सहन करत शिंदे – पवार यांचे नेतृत्व मान्य केले आणि उपमुख्यमंत्री राहिले. ज्या निवडणूकीसाठी त्यानी शिंदे पवार(Shinde-Pawar) यांना जोडले होते त्यामध्ये त्यांना दोघांच्या पक्षाचा काहीच फायदा झाला नाही. या दोन्ही नेते आणि पक्षांची मते भाजपकडे ज्या प्रमाणात जायला हवी होती तशी गेलीच नाहीत असे अनुमान आता काढले जात आहे. आता स्वत:च गळ्यात बांधून घेतेले लोढणे टाकूनही देता येत नसल्याने फडणवीस त्यांना ‘तुम्ही निघून जा’ म्हणून सांगू शकत नाहीत. कारण केंद्रातील सत्तेसाठी या दोघांना आता दिल्लीत वजन प्राप्त झाले आहे. त्यांचे दोघांचे मिळून आठ खासदार आहेत, शिवाय वेळ आली तर भविष्यात ते आघाडीच्या आणखी काही जणांची फोडाफोड करण्यासाठी कामी येवू शकतात. इतके ते सहकारी सत्तेला चिकटून बसले आहेत, त्यामुळे फडणवीस यांनाच ‘मीच पुन्हा येणार’ ऐवजी ‘मीच जातो, मलाच मोकळ करा’ म्हणायची वेळ आली आहे. हा काव्यगत न्याय म्हणायचा नाहीतर काय म्हणायचे?
‘कारण भटाला दिसली ओसरी’ . . ‘हात पाय पसरी’ या म्हणी प्रमाणे आता या दोन्ही पक्षांकडून विधानसभेत किमान ७०- ७५ जागांची मागणी होणार आहे. त्या दिल्या तर भाजपला ज्या २५०- २७५ जागा लढायची इच्छा आहे त्या कश्या आणि कुठून द्यायच्या हा प्रश्नच आहे. अश्यावेळी विधानसभेतही फडणवीस यांचा राजकीय कोंडमारा होणार हे स्पष्ट दिसत आहे. भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग झालेल्यां अनेकांना गेल्या अडिच वर्षात कोणतीच सत्तापदे दिली नाहीत, त्यांचा रेटा होणार आणि मूळचे जे भाजपनिष्ठ आहेत त्यांचा राग आताच दिसला आहे त्यामुळे त्यांना सामावून घ्यायचे तर भाजपला वेगळे लढावे लागणार आहे तरच किमान २२० २५० जागा लढता येणार आहे. त्यादिशेने फडणवीस बाहेर पडले तर भाजपचा प्रयत्न सरकारमध्ये राहून अपयशी कारकिर्दीचा ठसा पुसण्याचा राहणार आहे.
या शिवाय आरक्षण, शासकीय नोकरभरती, उद्योगधंद्याची पिछेहाट, दुष्काळीस्थिती, शेती आणि शेतक-यांचे प्रश्न सोडविताना आलेले अपयश अश्या अनेक बाबीचे अपयश सरकारमध्ये राहून भाजपला पचवावे लागणार आहे, त्याला सामोरे जाताना जनतेच्या रोषाने धनी व्हावे लागू नये असा फडणवीस यांचा प्रयत्न आहे. शेतकरी, बेरोजगार, धनगर आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न नव्याने उचलला जाणार आहेच शिवाय केंद्रात मोदी पुन्हा सत्तेवर आल्याने केंद्रातून याचे निर्णय यावे असा रेटा विरोधक तयार करतील. सध्या आघाडीच्या सरकारमध्ये मोदी शहा फडणवीसांचे किती ऐकतील? हा सुध्दा प्रश्न आहे त्यामुळे राजकीय घुसमट झालेल्या फडणवीसांनी मला मोकळं करा म्हणायचे हे देखील कारण आहे.
महाराष्ट्राची या वेळच्या निवडणूकीतील कामगिरी निर्णायक राहिली आहे. देशाच्या स्वातंत्र्य़ुध्दात बंगाल(Bengal), पंजाब (Punjab)आणि महाराष्ट्र (Maharashtra)निर्णायक भुमिकेत राहिले होते, तसेच यावेळी देखील या तीन राज्यातील जनतेने आपली पारंपरीक ओळख कायम असल्याचे दाखवून दिले आहे. महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकीत भाजपला मराठा समाजाने मोठ्या प्रमाणात नाकारल्याचे दिसत आहे तर धनगर समाजाची मतेही त्यांच्याकडे पूर्वीसारखी एकतर्फी आली नाहीत. याचे कारण गेली चार पाच वर्ष आरक्षण विषयावर या पक्षाच्या नेत्यांनी जो कायदेशीर घोळ आणि गोंधळ घालून दिशाभूल करण्याचा सपाटा लावला हेच आहे, असे जाणकारांचे मत आहे. भाजपचा हक्काचा ओबीसी मतांचा माधव पँटर्न यावेळी चालला नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या रेट्यात भाजप आणि फडणवीसांना गेला माधव कुणीकडे? असा प्रश्न पडला आहे! या सा-याचे धनी फडणवीस आहेत हे कुणी म्हणायच्या आधीच त्यांनीच ते मान्य़ करून टाकले आहे, त्यामुळे ते मला मुक्त करा म्हणत असावेत असे आता बोलले जात आहे. मात्र फडणवीस यांना बाजुला केले तर कोण? असा प्रश्न निर्माण होतो त्याचे सध्या नेमके थेट उत्तर देता येत नाही, त्यामुळे शरद पवार यांनी आत्मचरित्राच्या कार्यक्रमात अध्यक्षपदावरून आता ‘मला मोकळ करा’ म्हणत जसे खुंटी हलवून बळकट केली तसेच फडणवीस डिट्टो पवारांसारखेच करताना दिसत आहेत!
आजच्या स्थितीत भाजपला फडणवीसांशिवाय पर्याय नाही यावर शिक्कामोर्तब झाले तर त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना गप्प बसावे लागेल आणि पुन्हा सुकाणू त्यांच्या हाती द्यावे लागतील, मग त्यांना हवे तसे निर्णय पुन्हा ते घेवू शकतील असा राजकीय डावपेचही या निवृत्तीच्या हाकाटीमागे असू शकतो असे राजकीय जाणकार मानतात. काहीही असो आता राज्यात अंगावर घेतलेली राजकीय बांडगुळे केंद्रातील सत्तेसाठी देखील अनिवार्य झाल्याने भाजपची अवस्था ‘हात दाखवून अवलक्षण’ अशी झाली आहे. फडणवीस काय मोदी शहा देखील आता शिंदे पवारांना नकार देवू शकत नाही इतकी त्या दोघांची गरज भाजपसाठी महत्वाची झाली आहे, म्हणजे आधीच स्वत:ची किंमत कमी करून घेतलेल्या फडणवीसांना आता या दोघांच्या लेखी दिल्लीत किंमत राहणार नाही शिवाय विनोद तावडेंसारखे नेते केंद्रात आहेतच आणि खडसे मुंडे सारखे असंतुष्ट आता त्यांना सतावणार आहेत. त्यामुळे यातून दिलासा मिळवण्यासाठी अधीच बाजुला होणे त्यांना योग्य वाटले असावे. त्यामुळे देवंद्र फडणवीस यांचा हा राजकीय प्रवास ‘मी पुन्हा येईन पासून मी पुन्हा येणार नाही’ असा ३६० अंशात झुकला आहे!
पूर्ण
किशोर आपटे
(राजकीय विश्लेषक)