“या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता!” “श्रीदेवी सूक्तम्”, ही मार्कंडेय पुराणातल्या देवीस्तुतीतील, ३० सामर्थ्यशाली ऋचांपैकी, बारावी ऋचा. हे, देवाधीदेवांनी, देवीचे कृतज्ञतापूर्वक केलेले नमन आहे. वेद-पुराणात देवीची अनेक रूपे वर्णिली आहेत. प्रेमळ, यशोदायी, बुद्धिदाता, रणरागिणी. या रुपाला अनेक छटा आहेत. प्रेम, माया, त्याग, स्वार्थ, अहंकार, मत्सर, बऱ्या-वाईट सुद्धा. परंतु या सगळ्यांचं एक रूप मात्र सारखंच असतं, ते म्हणजे “स्त्री” म्हणजेच “नारी”. ही “लढवैयी” असते. ठाकलेल्या संकटांचा, धैर्याने संहार करणारी, परिस्थितीला हार न मानणारी, अशी ही नारी शक्ती.
विदर्भ कन्या, जिजाऊ साहेब या उच्च्कोटीतील मातुश्री. मातृत्वाच्या महन्मंगल अविष्काराच्या परमोच्च क्षणाचा सुंदर रेखीव नमुनाच! युगपुरुष शिवराय घडले, वाढले आणि ‘निश्चयाचा महामेरू। बहुता जनांसी आधारू । श्रीमत योगी।’ असे ज्यांचे वर्णन केले जाते, ती सारी कुणाची पुण्याई? ध्येयवेड्या आईची, निराग्रही मातेची आणि वीरमाता, माँसाहेब जिजाऊंची! जिवंतपणा, जागेपणा, बाणेदारपणा, ईश्वराप्रती समर्पण वृत्ती, हा गुण समुच्चय म्हणजे जिजाबाई. अखंड स्वराज्याची माता म्हणजे राजमाता जिजाऊ. सिंदखेडराजा येथे जन्मलेल्या जिजाऊ या विदर्भकन्या. आज महाराष्ट्रात शिवनेरी, रायगड आणि सिंदखेडराजा ही तीन पवित्र शिवस्थाने आहेत.
१२ जानेवारी १५९८ मध्ये विदर्भातील सिंदखेडराजा येथे गिरिजाबाई व लखुजी जाधवांच्या पोटी पौषी पौर्णिमा म्हणजेच “शाकंभरी पौर्णिमेला”, जे अद्वितीय कन्यारत्न जन्माला आले ते म्हणजे जिजाऊ आणि ही गुणी पोर, वेरूळ गावातील मालोजी भोसले यांचे पुत्र शहाजी भोसल्यांची अर्धांगिनी झाली ती १६०५ च्या रंगपंचमीला अर्थात फाल्गुन वदय पंचमीला. राजमाता, जिजाबाई किंवा जिजाऊ या नावांनी त्या प्रचलित आहेत. अत्यंत हुशार, बोलण्यात धीटपणा. बालपणीच जिजाऊनी राजनीती, युद्धकलेत प्रावीण्य मिळवले. याचा उपयोग पुढे शिवरायांना शिक्षण देण्यासाठी कामास आला.
राजमाता जिजाऊ ह्या हिंदवी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत्या. त्यांनी तुळजाभवानीला प्रार्थना केली होती की कुळाला, देशाला, धर्माला अभिमान वाटेल असा पुत्र जन्माला येऊ दे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळ वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर इ.स. १६३० मध्ये त्यांनी शिवबांना जन्माला घातले. त्यांनी त्या पुत्राला राष्ट्रहितासाठी तयार केले. कुठलेही कार्य करण्यासाठी “शक्ती”ची आवश्यकता असते. मंगलाची केवळ कामना करून चालत नाही, तर मंगलाची पावलं आपल्या परसात आणण्यासाठी मनगटात ताकद हवी असते आणि तशी ताकद देण्याची किमया शक्तीच्या उपासनेतून येते. माता केवळ मायाळू नसून शक्ती असू शकते याचं सर्वात मोठं उदाहरण जिजाबाईचं. प्रचंड आत्मविश्वास शिवरायांच्या मनात त्यांनी निर्माण केला.
शेकडो वर्षांपासून स्थिरावलेल्या यावनी आक्रमणामुळे हिंदुस्थान अंतर्बाह्य पोखरला गेला होता. म्लेंच्छ दैत्यांच्या आसुरी थैमानाची दाहकता जिजाऊ साहेबांनी स्वत: अनुभवली होती. निजामशहाने त्यांचे भाऊ व वडिलांची कत्तल करून, माहेर पार उद्वस्त केले होते. दुर्दैवाचे दशावतार त्यांच्या पाचवीलाच पुजलेले. राजकीय बेबनावामुळे लखुजी जाधव आणि शहाजी राजे भासले यांच्यात वैर निर्माण झाले.
ई.स. १६३७ ते १६५६ हा कालखंड जीजाबाईंच्या जीवनातील लक्षणीय कालखंड. ना माहेर, ना सासर, सांत्वन करणारे, दिलासा देणारे कुणी नाही, पती दूरदेशी, पुत्र अजाण. अशाही परिस्थितीत मा साहेब न डगमगता हिंदवी स्वराज्याचं ध्येय समोर ठेवून आपल्या शिवबाना घडवीत राहिल्यात. शहाजीराजे पराक्रमी असले तरी त्यांचे स्वत: चे साम्राज्य नव्हते. मराठ्यांचे साम्राज्य स्थापन करण्यासाठी शहाजी राजांनी केलेली धडपड जिजाऊनी स्वत: पहिली होती.
हिंदवी स्वराज्याची निर्मिती आधी जिजाऊंच्या मनोविश्वात झाली आणि लौकिकात पुत्राच्या सहाय्याने ते साकारले. शिवाजीराजे “हे श्रींचे राज्य”, “हे राज्य व्हावे, हे श्रीं च्या मनात फार आहे”, असं अगदी बालपणापासून म्हणायचे. “श्री” म्हणजे सुखदायिनी शक्ती, जगाला धारण करणारी भगवती म्हणूनच जगदंबा. म्हणजेच हे जगदंबेचे राज्य व्हावे. जिजाऊंना महाराज “जगदंबस्वरुपिनी”च मानत. जिजाऊंनी बालपणापासूनच शिवरायांवर अतिशय उत्तम संस्कार केलेत.
पुण्याची जहागीर मिळाली, तेव्हा राजे अवघे १४ वर्षांचे होते. लहान शिवाजीराजांना घेऊन जिजाबाई पुण्याला राहायला आल्या. तेव्हा पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. त्यांनी दादोजी कोंडदेव यांच्यासोबत पुणे शहराचा पुनर्विकास केला. शिवाजीराजेंना प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले. राष्ट्र आणि धर्म हे संस्कार करण्यासाठी जिजाऊ त्यांना महाभारत आणि रामायण यांतील कथा सांगत असत. जिजाऊंनी शिवरायांना गोष्टी सांगीतल्या त्या पारतंत्र्यात सुरू झालेल्या आणि स्वातंत्र्यात संपलेल्या. सीतेचे हरण करणार्याा दुष्ट रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता, बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता.
अशा प्रत्येक गोष्टीत त्यांनी पराक्रमी पुरुषाला भगवंताचे स्थान दिले, तर स्वातंत्र्याला ध्येयाचे स्थान दिले. ‘प्रत्येक पराक्रमी पुरुषाच्या जीवनाचे ध्येय एकच असते, जे पारतंत्र्यात असतात, त्यांना स्वातंत्र्य मिळवून देणे’, ही त्यांनी शिवरायांना दिलेली शिकवण होती. आणि त्यासोबत ‘आपण- समाज, तू आणि मीही – पारतंत्र्यात आहोत’, ही प्रत्येक कथेनंतर दिलेली जाणीव होती. कर्तृत्व गाजविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वराज्य स्थापन करणे ही शिवरायांची धारणा झाली, ती जिजाऊंच्या या संस्कारांमुळेच. न्यायनिवाडा करण्याचे धडे महाराजांना मातेकडून प्राप्त झाले. जिजाबाई शिवाजीमहाराजांच्या आद्यगुरू होत्या. शिवाजी महाराजांच आयुष्य पुस्तक असेल, तर जिजाऊ ते पुस्तक लिहीणारी शाई होती. जिजाऊ खरोखर आदर्श माता आहे.
जिजाऊं अत्यंत मुत्सद्दी होत्या. जिजाऊंच्या सल्ल्यानुसार शिवाजी महाराजांनी मोगलांचा दक्षिणेतील सुभेदार मुराद बक्ष यांच्याशी संधान साधले व आदिलशाहीला मोगलांकडून फर्मान आले “ शहाजीराजे भोसले आमचा माणूस आहे, शिवाजी भोसले आमच्या सेवेत आहे, त्याचे वडील शहाजीराजे यांना तातडीने मुक्त करावे”. त्यामुळे शहाजीराजेंची सन्मानपूर्वक सुटका करण्यात आली. जिजाऊ जेवढ्या हळव्या होत्या, तितक्याच त्या कणखरही होत्या. शिवाजी महाराज आग्रात कैद होते तेव्हा देखील स्वराज्याची सूत्रे जिजाऊमातेंच्या हाती होती. जिजाऊंमधील हळवी आई आणि कणखर राहून राज्यकारभार करणारी राज्यकर्ता अशा दोन्ही जबाबदाऱ्या त्यांनी एकाच वेळेस समर्थपणे पार पाडल्यात.
जिजाऊ मा साहेबांचे संघटन कौशल्य दृष्ट लागावे असे होते. मा साहेबांच्या नुसत्या शब्दावर प्राण ओवाळून टाकणारी मंडळी इतिहासाने पहिली आहेत. बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, नेताजी पालकर, मोरोपंत पेशवे ही त्यातली काही मंडळी. ६ जून १६७४ रोजी हिंदवी स्वराज्याचे पहिले छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. या स्वर्णिम क्षणाच्या राजमाता जिजाऊ साक्षीदार होत्या. याची देही याची डोळा आपण बघितलेलं स्वप्न पूर्ण होताना त्यांनी अनुभवलं. आपल्या मुलांना धैर्य, परोपकार, आत्मविश्वास, शौर्य, न्याय, निर्भय, राष्ट्र प्रेम या सर्वांचे धडे देण्याचे व त्यांच्यात संस्कार देण्याचा सामर्थ्य प्रत्येक आईमध्ये असतं. स्त्रीने आपली शक्ती ओळखून उज्ज्वल भविष्य निर्मितीसाठी प्रयत्न केलेच पाहिजे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत देवीचे महात्म्य हे अनन्यसाधारण आहे. स्वराज्य संस्थापनेचा वा.डनिश्चय या आदिशक्ती भवानी मातेच्या साक्षीने शिवरायांनी घेतला आणि तिच्याच कृपेने राजे सिंहासनारूढ झालेत.
संपूर्ण जग आज ज्या भारताकडे विश्वगुरु म्हणून बघत आहे, त्या भारताची निर्मिती विश्व शक्तीनेच केली आहे. मानवी जीवनाची विविध क्षेत्रे पादाक्रांत करणारी आमची आजची मातृशक्ती देशाच नाव उज्वल करती आहे. आजही शक्तिरूप नारी आपल्याला कार्यरत दिसतात. “सुशीला: सुधीर: समर्था समेत:” अशी सर्वगुण संपन्न स्त्री मातृशक्ती म्हणून कोणत्याही बाबतीत कमी नाही. जिजाऊंनी ठरवलं म्हणून शिवबा घडला. शिवाजी खूप मोठे झाले कारण जिजाऊ त्यांच्याहून मोठ्या होत्या.
शिवरायांच्या राज्याभिषेकाचा सुवर्णाचा क्षण पाहिल्यानंतर अवघ्या बारा दिवसांतच १७ जून १६७४ रोजी त्यांनी देह ठेवला.
जिजाऊंमुळे महाराष्ट्राला शिवराय लाभले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. विदर्भाच्या कुशीत जन्माला आलेली ही विदर्भ कन्या हिंदवी स्वराज्याची अधिष्ठात्री आदिशक्ती म्हणून मान्यता पावली. पुत्राच्या कर्तृत्वावर वेळोवेळी मायेची, प्रोत्साहनाची, मार्गदर्शनाची फुंकर घालत त्याला राजसिंहासनावर अधिष्ठित झालेला बघेपर्यंत लढणाऱ्या राजमाता जिजाऊंना मानाचा मुजरा.
Tag-Mansaheb Jijau
श्रीकांत भास्कर तिजारे
9423383966