मुंबई : अभिजात मराठी भाषेच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादीकडून जगविख्यात शिल्पकार डॉ. राम सुतार, पद्मश्री कविवर्य मधु मंगेश कर्णिक, पद्मश्री महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, प्रसिद्ध क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर, पर्यावरण प्रेमी सयाजी शिंदे, प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत, उद्योजक इंद्रनील चितळे या दिग्गजांचा अजितदादा पवार यांच्या हस्ते सन्मान…
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने ‘मराठी भाषा दिवस’ साजरा ;’मराठी पाऊल पडते पुढे’ कार्यक्रमाने वाढवली शान…
मुंबई : अनेक वर्षे सरकारे आली – गेली परंतु मराठी माणसाला अभिमान वाटेल असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्णय घेऊन १३ कोटी मराठी जनतेला आनंद होईल असा आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केंद्रसरकारला धन्यवाद दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण यावर काम सुरू आहे. शिव – शाहू – फुले – आंबेडकर यांच्या विचाराने पक्षाची वाटचाल सुरू आहे असे आवर्जून अजित पवार यांनी सांगितले.
वंदनीय, पुजनीय व्यक्तींचा गौरव करण्याचा सन्मान मला मिळाला आहे. महाराष्ट्रात अशी व्यक्तीमत्व जन्माला आली त्यामुळे महाराष्ट्र वेगळ्या उंचीवर जाऊन पोचला आहे. तरुणांनी या व्यक्तींचा आदर्श घेतला पाहिजे असे आवाहनही अजित पवार यांनी केले.
छावा चित्रपटामुळे आज देशाला छत्रपती संभाजी महाराज काय होते हे समजले आहेत. एकही लढाई आपला हा राजा हरला नाही. तुमच्या माझ्या महाराष्ट्राला असला राजा मिळाला हे आपले भाग्य आहे असेही अजित पवार म्हणाले.
कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करतो. कुसुमाग्रज हे मानवतेचे कवी होते. मराठी भाषा संवर्धनाचे काम त्यांनी केले असेही अजित पवार म्हणाले.
अनेक दिग्गजांनी दिलेल्या अनेक योगदानाबद्दल मराठी अस्मितेचे क्षण आज आपण अनुभवत आहोत. मराठीसाठी अशा दिग्गजांचे कार्य गौरवास्पद आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी गौरवोद्गार काढले.
मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा मिळत नाही तोपर्यंत मी लोकसभेत मराठी वगळता इतर भाषेत भाषण करणार जाहीर केले होते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला त्याबद्दल खासदार सुनिल तटकरे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अभिजात मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जगद्विख्यात शिल्पकार पद्मविभूषण डॉ. राम सुतार यांचा पहिल्यांदा सन्मान करण्यात आला. त्यानंतर पद्मश्री कविवर्य मधु मंगेश कर्णिक, पद्मश्री अशोक सराफ, क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर, पर्यावरण प्रेमी अभिनेते सयाजी शिंदे, प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत, युवा उद्योजक इंद्रनील चितळे आदींचा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शाल, मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी जगविख्यात शिल्पकार डॉ. राम सुतार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मी देशात आणि जगात खूप कामे केली आहेत. माझ्या कामाचा आदर केलात त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसला धन्यवाद दिले.
मधु मंगेश कर्णिक
मराठी भाषा अभिजात झाली असे आपण म्हणतो पण अभिजात दर्जा प्राचीन काळी मिळाला आहे. संतांनी साहित्यिक भाषेत अनेक काव्य निर्माण केली. त्यामुळे अभिजात भाषा नाही कोण म्हणेल. पण आता अधिकृत भाषा दर्जा मिळाला आहे.
मराठी भाषेला भक्कमपणे आधार दिला पाहिजे. ज्ञानेश्वर, तुकाराम आपले आहेत तोपर्यंत मराठी भाषा परकी होऊ शकत नाही. मराठी ही आपली आई आहे. केशवसुत महानकवी आहेत. त्यांचे घर बघायला गेलो होतो आणि सेक्सपिअर यांचेही घर बघायला गेलो होतो त्यांनी ते जपून ठेवले आहे. मी केशवसुतांचे घर दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवला होता. त्यावेळी अर्थमंत्री सुनिल तटकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माझा प्रस्ताव मान्य केला. अनेक कोटी रुपये मंजूर केले. आज केशवसुतांचे घरे उभे राहिले असल्याची माहिती मधु मंगेश कर्णिक यांनी सांगितली. भाषा मोठी होते तेव्हा साहित्य मोठे होते राज्य मोठे होते हे सांगतानाच मराठीला पुढे न्यावे. ज्यांनी महाराष्ट्र मोठा केला अशी माणसे इथे आणलात त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसला धन्यवाद दिले.
अशोक सराफ(Ashok Saraf)
मी इथपर्यंत पोचायला तुमची साथ मिळाली. मी जे काही केले ते गोड मानून घेतलात त्याबद्दल जनतेचे अशोक सराफ यांनी आभार मानले. मी इथपर्यंत पोचेन असं वाटलं नाही. मला अचिव्हमेंट करण्यात मजा आहे. अभिनय प्रांत असा आहे की तुम्ही लवकर समाधानी राहू शकत नाही असेही अशोक सराफ म्हणाले.
वयाच्या ७७ व्या वर्षी मालिकेत काम करतोय. रंगभूमीचा वरदहस्त असल्यावर सगळी दुःख विसरली जातात असा अनुभव सांगतानाच माझा सत्कार केलात तो माझ्या हदयात राहिल असेही अशोक सराफ यांनी आवर्जून सांगितले.
दिलीप वेंगसरकर(Dilip Vengsarkar)
आज मराठी भाषा दिवस असून या दिवशी मला सन्मानित केलात त्याबद्दल दिलीप वेंगसरकर यांनी धन्यवाद दिले. मला कर्नल म्हणतात पण मी कर्नल नाही. इराणी कप होता त्यात मला संधी मिळाली. त्यामध्ये ७० चेंडूमध्ये शंभर केले होते त्यावेळी मला ही पदवी मिळाली असा अनुभवही सांगितला. माझ्यासोबत काही मराठी खेळाडू होते. आमच्यामुळे कपिल देव मराठी शिकला आहे. त्यामुळे मराठी वाचा, ऐका, शिका असे आवाहनही दिलीप वेंगसरकर यांनी केले.
सयाजी शिंदे(Sayaji Shinde)
मराठी भाषा दिनानिमित्त माझा गौरव केलात त्याबद्दल धन्यवाद देताना मराठी भाषेचा ऋणी राहीन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमी माझा जन्म झाला याचा मला अभिमान आहे असेही सयाजी शिंदे म्हणाले.
वैशाली सामंत(Vaishali Samant)
हा सन्मान दिल्याबद्दल आभार मानतानाच ही दिग्गज मंडळी कलेची सेवा करत आहेत त्यांच्याकडून एनर्जी घेऊन जाणार आहे. ज्यांनी मला आत्मविश्वास दिला त्यांना हा सन्मान अर्पण करते असे सांगतानाच बाहेर जातो त्यावेळी महाराष्ट्र काय आहे हे मला समजते असेही वैशाली सामंत म्हणाल्या.
इंद्रनील चितळे(Indranil Chitale)
तीन पिढ्यांचे कष्ट या उद्योग समुहाला वाढवण्यात यश आहे. अशा पुरस्काराने आमच्यात बळ वाढते. हे बळ घेऊन पुढे उद्योगक्षेत्रात आणखी काम करण्याची संधी मिळते. मराठी बाणा चे सर्वेसर्वा अशोक हांडे यांचा सन्मान अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
चेंबुर येथील दि फाईन आर्ट सोसायटी, शिवा स्वामी ऑडिटोरियम, फाईन आर्ट चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा कार्यक्रम मोठया उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी भूषविले.
या कार्यक्रमाला माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे, आमदार शिवाजीराव गर्जे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, आमदार सना मलिक शेख, आमदार पंकज भुजबळ, मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
अशोक हांडे(Ashok Hande) प्रस्तुत ‘मराठी बाणा’ हा संगीत कार्यक्रमाने मराठी पाऊल पडते पुढे या कार्यक्रमाची शोभा आणखीन वाढवली.