मुंबई : राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे लाखो हेक्टर वरील उभ्या पिकांना फटका बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी मंगळवारी सकाळीच मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून परिस्थितीची माहिती घेतली तसेच तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले. शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळाला पाहिजे. संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या सरकार पाठीशी आहे . यादृष्टीने महसूल यंत्रणेने लगेच कामाला लागावे व पंचनामे करावेत असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले
गेल्या दोन दिवसांत ठाणे, पालघरसह राज्यातल्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला. नागपूर नगर बीड जालना वाशीम, नाशिक, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), पैठण, गंगापूर परिसरातील अनेक तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने रबीच्या ऐन काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. मुंबई, ठाण्यासह उत्तर मध्य महाराष्ट्रावर ढगाळ वातावरण असल्याने बऱ्याच ठिकाणी आणखी अवकाळी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सूचनाही दिल्या आहेत.
दरम्यान अवकाळीच्या तडाख्याने शेतकरी हतबल झाले असून राज्यातील आठ ते दहा जिल्ह्यात दहा हजार हेक्टर पेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, त्यात उन्हाळी भात, गहू, हरभरा या पिकांसह द्राक्ष आणि डाळिंब शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाने ओलावा पकडल्याने कोकणात हापूस आंब्याच्या मोहरा सह काजू पिकाच्या फळांवरही किटक रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तर पपई, शेवगा या पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे. पालघर डहाणू भागात चिकू बागायतीला या पावसाचा फटका बसला असून शेतक-यांच्या हाताशी आलेल्या पिकांची भरपाई करण्याची मागणी शासनाकडे केली जात आहे.
प्राथमिक अंदाजानुसार राज्यभरातील जिल्हा प्रशासनाने सोमवारी वर्तवलिल्या अंदाजानुसार.दहा लाख हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावरील गहू तसेच द्राक्षबागांना फटका बसल्याने लाखो शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत. याशिवाय वीज अंगावर पडल्याने आता पर्यंत दहा जनावरांचाही मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे.
निर्यातदार द्राक्ष शेतीच्या नाशिक जिल्ह्यात निफाड, इगतपुरी, नाशिक, कळवण आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यांत पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला गहू, कांदा पिकांसह द्राक्षबागांची सर्वाधिक हानी झाली आहे. निफाडमध्येच ६६० तर नाशिकमधील ११७ अशा ७७७ हेक्टवरील द्राक्षबागा उद्ध्वस्त झाल्याची माहिती हाती आली आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्र्यानी जिल्हाधिकाऱ्यांसोबत केलेल्या आढावा बैठकीत बाधित शेतीचे तत्काळ वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत. बाधित एकही व्यक्ती सरकारी मदतीपासून वंचित राहू नये, नुकसानग्रस्तांना तत्काळ आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश दिले आहेत.