मुंबई : 29 डिसेंबर 2021 रोजी महाराष्ट्र राज्य विधान सभागृहात भाजपा पक्षाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने सादर केलेल्या विद्यापीठ विधेयकाच्या संबंधित चर्चेमध्ये समलैंगिक (लैंगिक अल्पसंख्यांक) LGBTIAQ समुदायाच्या संदर्भात वापरलेली भाषा लैंगिक अल्पसंख्यांक समुदायाच्या घटनात्मक तसेच मानवी अधिकारांवर गदा आणणारी आहे. तसेच माणूस म्हणून त्यांच्या भावनांना दुखावणारी व सामाजिक भेदभावाला खतपाणी घालून समलैंगिक समुदायाच्या सामाजिक सुरक्षिततेला तडा देणारी आहे.
सुधीर मुनगंटीवार हे लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे भारतीय संविधान आणि समाजा प्रती त्यांची एक जबाबदारी आहे. परंतु विद्यापीठ विधेयकाच्या संबंधित चर्चेमध्ये त्यांनी वापरलेली भाषा अज्ञान मूलक, असंवेदनशील, आणि पुरुषी वर्चस्वाच्या गंडातून आलेल्या अरेरावीची आहे व महत्त्वाचे म्हणजे विद्यापीठ विधेयका द्वारे समलैंगिक ( लैंगिक अल्पसंख्यांक ) LGBTIAQ समुदायाला नागरिक म्हणून देण्यात येत असलेली समान संधी नाकारणारी आहे.
Content made on Kapwing
मुनगंटीवारांनी उभे केलेले प्रश्न व मुद्दे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित मनुस्मृतीच्या व्यवस्थेतील लिंगभेद आधारित विषमतेचा पुरस्कार करतात. भाजपची मुळातच संविधानातील स्वातंत्र्य, समता, लोकशाहीच्या मूल्यांना व त्यावर आधारित समाज निर्मितीला बांधिलकी (commitment) नाही. लोकप्रतिनिधी व राजकिय पक्ष म्हणून लोकांना जबाबदार असणाऱ्या व्यक्ती वा संस्था वा पक्षसंघटनांनी अशाप्रकारे लिंग,जाती, धर्म आधारित भेदभाव व विषमतेला खतपाणी घालणाऱ्या भूमिका घेणे चिंताजनक आहे.
वंचित बहुजन आघाडी लिंग,जाती, धर्म आधारित भेदभाव व विषमतेला नेहमीच विरोध करते व भारतीय राज्यघटनेने दिलेल्या नागरिकत्वाच्या अधिकारांचे संरक्षण व समर्थन करते. भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी लैंगिक अल्पसंख्यांक समुदायाच्या विषयी केलेल्या वक्तव्याचा वंचित बहुजन आघाडी तीव्र निषेध करते. लैंगिक अल्पसंख्यांक ( समलैंगिक समुदाया ) LGBTIAQ च्या हक्क अधिकारांच्या लढाईत वंचित बहुजन आघाडी सोबत आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी समलैंगिक ( लैंगिक अल्पसंख्यांक समुदाया ) LGBTIAQ ची जाहीर माफी मागावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी करत आहे.