दिक्षाभुमी आणि संघभुमी : ‘प्रधानसेवक ते स्वयंसेवक’, साऱ्यांचेच ‘संघम् शरणम गच्छामी’!?
३० मार्च २०२५ हा दिवस ‘गोदी मिडिया’मध्ये ‘लाइव्ह बातम्यांच्या वार्तांकनाचा’ परमोच्च दिवस होता. या दिवशी बहुचर्चित संघ आणि सरकारच्या प्रमुखांची संघ (रेशीमबाग) मुख्यालयात आणि नंतर माधव नेत्रालयात एकत्र उपस्थिती होती. या कार्यक्रमाचा गाजावाजा खूप करण्यात आला. त्याचे कारणही तसेच होते. यंदा २०२५च्या विजयादशमीला (२ऑक्टोबर २५) संघ शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहे. तर सप्टेंबरच्या सतरा तारखेला प्रधानसेवक ७५व्या वर्षाचे होत आहेत. (त्यांनीच घालून दिलेल्या प्रथेनुसार मार्गदर्शक मंडली मध्ये जाण्याचा अमृतकाल!?) मग मात्र ‘झुकेगा नही साला’ च्या अविर्भावात असलेल्या प्रधानसेवकांना अकरा वर्षानंतर ‘साक्षात्कार’ झाला की ते ‘स्वयंसेवक’ आधी आहेत आणि ‘प्रधानसेवक’ नंतर आहेत म्हणे! त्या निमित्ताने मग पंतप्रधान नव्हे स्वयंसेवकाच्या कार्यक्रमाचे थेटप्रक्षेपण गोदी मिडियाकडून तर झालेच पण सोशल मिडीयामध्येही टिकाकारानी या विषयावर चर्वितचर्वण करून या विषयाच्या विश्लेषणाचा पार चोथा करून टाकला आहे!
‘संघम् शरणम गच्छामी!
मात्र संघ आणि त्यांच्या कार्याचा थेट अदमास कुणाला लागत नसतो असा अनेकांचा अनुभव आहे. किंवा तो असा समोर येवून कुणी सांगायचा नसतो. सारे कसे गुपीत असते! त्यामुळे सरसंघचालकांच्या आणि प्रधानसेवकांच्या या ‘भरतभेटी’मध्ये कोणत्याही ‘बंदव्दार चर्चा’ किंवा ‘गुफ्तगू’ न होताही, ‘आखो ही आखो मे इशारा हो गया, बैठे बैठे विश्लेषण का सहारा हो गया’ अशी अवस्था यच्चयावत पोटावळ्या पत्रकारांची झाली नाही का?
तर मग या विषयाचे जाणकार सूत्रांचे मत काय आहे? ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर दोन तीन महत्वाचे मुद्दे समोर आले आहेत. त्यात ‘नरेंदर हो गया सरेंडर’ आणि ‘संघम् शरणम गच्छामी’ असे दोन संदेश दिल्याचे नक्कीच सांगता येते, असे या जाणकारांच्या चर्चेतून स्पष्ट झाले. याचे कारण प्रधानसेवक यांनी दिक्षाभुमी आणि संघभुमी दोन्ही ठिकाणी जावून वाकून नमन करून आपल्या मनातील श्रध्दाभावना व्यक्त केली आहे.
स्वयंसेवक की प्रधानसेवक?
पंतप्रधान नरेंद्र मोदी(Prime Minister Narendra Modi) यांच्या या दौऱ्यात त्यानी स्वत:ला जाणिवपूर्वक ‘स्वयंसेवक’ म्हणायचा अट्टाहास केला, तर सरसंघचालकांनी त्यांचा उल्लेख कार्यक्रमाला ‘पंतप्रधान आले आहेत’ असे म्हणत वास्तविक परिचयाने उपस्थितांना संदेश देण्याचे काम केले. मोदी यांच्या या स्वयंसेवक म्हणून आलो आहे, शंभर वर्षाच्या सेवाकार्याचा अक्षयवट झाला आहे, इत्यादी शब्दांचा प्रभाव नंतर राज्याचे मुख्यमंत्री यांच्यावर देखील झाल्याचे पहायला मिळाले आणि त्यांनी देखील मग नेहमीप्रमाणे ‘नरेंद्र ते देवेंद्र’ या पारंपरिक थाटात स्वत:ला स्वयंसेवक म्हणून सहभागी झालो होतो असे म्हणून ‘संघ शरणं गच्छामी’ची साक्ष पटवून दिली आहे.
नरेंद्र मोदी प्रधानसेवक झाले त्यानंतर अकरा वर्ष पंतप्रधान होवून तिसऱ्यांदा ज्या पदावर बसले आहेत. मात्र त्यांच्या ‘जग घुमया’ कार्यक्रमात त्यांना संघ मुख्यालयात यायला वेळच मिळाला नव्हता म्हणे!. आता मात्र ‘जग घुमया थारे जैसा ना कोई’ असे म्हणायला त्यांना रेशिमबागेकडे आपले पोलादी मन वितळवून यावेच लागले असे या जाणकारांनी सांगितले. या मागच्या अनेक कारणांचा ‘ऊहापोह’ रतिब घातल्यासारखा माध्यमांतून होतच आहे. मात्र तेथे काही मुद्दे जाणिवपूर्वक मांडले जात नाहीत किंवा मांडता येत नाहीत असे या जाणकारांचे मत आहे. ते म्हणाले की, संघाच्या शंभर वर्षानंतर सुमारे सव्वा लाख कार्यक्रम अँक्टिव्हिटी जगभर सुरु आहेत. त्यात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अश्या सर्वच प्रकारच्या कामांचा समावेश आहे. अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर शंभर वर्षात पोहोचलेल्या या संघटनेच्या शाखा सध्या शंभर वर्षात ८० हजारच्या घरात पोहोचल्या आहेत. सध्या देशात संघाच्या वर्चस्वातून सत्तेवर आलेल्या विचारसरणीचे सरकार आहे. सुमारे २४ राज्याचे मुख्यमंत्री आणि २९ राज्यांचे राज्यपाल आहेत. मात्र या सरकारमध्ये बसलेल्या धुरीणांचा ‘सरोकार’ मात्र पहिल्यासारखा संघासोबत राहिला नसल्याचे शल्य बोचरे आहे, असे या जाणकारांनी सांगितले. त्यामुळे संघ हा आत्मा आहे, हृदय आहे, मस्तक आहे चेहरा आहे असे ठसवून देणे आवश्यक होते. त्यातच २०२५च्या लोकसभा निवडणुकीत रबरस्टँम्प भाजप अध्यक्ष जे पी नड्डांच्या मुखातून संघाची आता आवश्यकता नसल्याचे जाहीरपणे सांगण्यात आल्यानंतर संघाकडूनही मग निकालानंतर बहुमताच्या खाली चाळीस जागांवर राहिलेल्या गुजरातच्या प्रमुखांना संघाने ते ‘स्वयंसेवक आधी’ असल्याचे मागील नऊ महिन्यात आपल्या ठराविक पध्दतीच्या शैलीतून ठसवून दिले आहे. ते मान्य करत प्रधानसेवक यांना देखील ‘संघ शरमं गच्छामी’ म्हणत संघ मुख्यालयात येवून गुरुजी आणि डॉक्टरांच्या समाधीसमोर नतमस्तक व्हावे लागले!
या साठी मागील पाच महिन्यांपासून संघाने भाजपच्या नव्या अध्यक्षांच्या निवडीमध्ये मनमानी करता येणार नसल्याचा पवित्रा घेवून आपल्या सहमतीशिवाय निर्णय घेता येणार नसल्याचे दाखवून दिले. त्यामुळे आता अनेक नावांची चर्चा सहमतीसाठी विचारणा झाल्यानंतर बंगळुरूमध्ये नुकत्याच संघाच्या प्रतिनीधीसभेत काही ठोस निर्णय आणि दिशा ठरविण्यात आल्या असे या जाणकारांनी सांगितले. दहा वर्षापूर्वी वाजपेयी-अडवाणी(Vajpayee-Advani) यांना बाजुला करत नवे मोदी-शहा(Modi-Shah) युग सुरू करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या मातृसंस्थेने आताही २०२९ चा प्लान तयार केला आहे. त्यात धर्म आणि विकास यांना सोबत घेवून जाणारा अजेंडा समान पातळीवर चालविण्याचा प्रयत्न केला जावू शकतो असे या जाणकारांचे मत आहे.
चिंतन मंथन करूनच मनोमिलनाचा सोहळा!
संघाला उच्चवर्णियांची मक्तेदारी असल्याचा जो शिक्का पडला आहे त्याकडेही हे करताना लक्ष दिले जात आहे, त्यामुळेच प्रधानसेवक स्वयंसेवकाला ‘जागो मोहन प्यारे’ म्हणत साद घालून जागे करण्यात संघ यशस्वी झाला आहे. त्याचाच परिपाक प्रत्येक मशीदीखाली शिवलिंग न शोधता ‘मोदी की सौगात’ म्हणत ‘पासमंदा मुस्लिम’ म्हणजे गरीबी रेषेखालचे मुस्लिम आणि नवबौध्द, दलित समाज जो बाबासाहेबांचा भक्त आहे यांना सोबत घेण्याचा शहाणपणा जोडला जात आहे. ‘संविधान बदलणार’ म्हटल्यानंतर त्या समाजाने सहजपणे इंडिया आघाडीमागे शक्ति उभी केल्याने भाजपला २०२४च्या लोकसभेत बहुमताच्या जादुई आकड्याकडे राजीवकुमारचा निवडणूक आयोग सेवेला हजर असूनही मजल गाठता आली नव्हती! याचे भान ठेवत अनेक महिन्यांपासून चिंतन मंथन करून शेवटी ३० मार्चला मनोमिलनाचा हा सोहळा घडवून आणत वेगळा संदेश देण्यात आल्याचे या सूत्रांचे मत आहे. त्यामुळे प्रधानसेवक पंतप्रधान झाल्यावर सर्वात प्रथम अकरा वर्षांनी संघ मुख्यालयात आले तसेच ते दिक्षाभुमीला जावून नतमस्तक झाले आहेत. २०२९च्या दिशेने नवी योजना जुन्या प्रधानसेवकांच्या उपस्थितीत स्वयंसेवक म्हणून सुरू करण्यात आली आहे. त्यात नवा दृष्टीकोण देणारा माधव नेत्रालयाचा योग जुळवून आणण्यात आला. त्याला हिंदू नव वर्षाच्या दिवसाचा सुमुहूर्त पकडण्यात आला आहे. योगायोगाने त्याच्या दुसऱ्याच दिवशी येणाऱ्या ईदच्या सणाला सौगात देत आक्रमक मुस्लिम भुमिका बाजुला करत नव्याने पाऊल टाकण्याचा संकल्प करण्यात आला आहे. अश्या प्रकारे प्रधानसेवकांना त्यांच्या राजकीय निवृत्तीसाठी नवी दृष्टी हवी असेल तर माधव नेत्रालय आणि रेशीमबाग मुख्यालय शिवाय तरणोपाय नाही हे मान्यच करावे लागले आहे! हे करत असताना शंभराव्या वर्षी नवबौध्द दलित आणि पसमंदा मुस्लिमांना सोबत घेत ईद आणि दिक्षा भुमीच्या माध्यमातून प्रधानसेवकांकडून संघानेही संघम शरणम गच्छामी म्हटले आहे! असे या जाणकारांनी सांगितले. आता येत्या काही महिन्यात या नव्या वर्षातील ‘संकल्प से सिध्दी’चा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला येणार आहेच तो पर्यंत आपण वाट पहायला हवी नाही का?
किशोर आपटे
(लेखक व राजकीय विश्लेषक)