तीन मुले हिंदूना नसतील तर त्यांची लोकसंख्या खतरे में? : गंभीर धोका आहे! लागा कामाला!
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक झाली, जे निकाल हाती आले त्यानंतर उमेदवार मतदार आणि माध्यमातील सारेच ‘भूत दिसल्यानंतर भयग्रस्त आणि आश्चर्यचकीत होतात तसे चेहरे’ करून एकमेकाना विचारू लागले. ये क्या हुआ? कब हुआ? कैसे हुआ? त्यानंतर मग नाक्या-नाक्यांवर माध्यमांतून, प्रवासात, अगदी पानाच्या गादीवर आणि भाजीबाजारातही चर्चा सुरू झाल्या आहेत. त्या ऐकण्यासारख्या आहेत. त्यात लोक एकमेकांना काय सांगत आहेत? त्याचे अनेक किस्से सांगता येतील पण काही निवडणूक आता पाहूया आणि नेमके काय होत आहे. जे लोकांच्या नजरेतून सुटले नाही त्याचा वेध घेवूया!
सारे काही दिल्लीच्या नेत्यांच्या स्क्रिप्टनुसार?
कलाकार असलेल्या एका मित्राने असेच एका चर्चेत सांगितले की, सध्या मराठी नाट्यसृष्टी राजकीय रंगमंचावर अवतरली आहे. त्यामुळे एकाच वेळी नटसम्राट, संशयकल्लोळ, मानापमान, तो मी नव्हेच, रायगडाला जेंव्हा जाग येते, गेला मोहन कुणीकडे?, असे नाट्यप्रयोग सुरू आहेत. याचे कारण असे आहे की, विरोधकांकडून आठ दिवस झाले तरी यंत्र आणि यंत्रणामध्ये घोळ झाल्याचे आरोप होताना दिसत आहे. निवडणूक निकालानंतर आश्चर्यकारक आकड्याचे खेळ पहायला मिळत आहेत. राजकीय विरोधकांना सत्ता आणि पैसा यांच्या बळावर महायुतीच्या घटकपक्षांनी जी धोबीपछाड पटकनी दिली आहे. त्यात सामान्य जनता देखील अवाक झाली आहे. हा जो काही खेळ करण्यात आला त्यात शिंदे-फडणवीसांचा भाजप आणि अजित पवार तिघांचा सहभाग आहे. शिकार तर आता झाली आहे आता त्याची वाटणी करण्यावरून वाद आहेत. निवडणुकांनंतर त्यांच्यात मग मुख्यमंत्रीपद मंत्रीपदे आणि सत्तेच्या वाटपावरून नुराकुस्ती लागल्याचा आभास निर्माण केला जात आहे. याचे कारण हा जनमतांवर टाकलेला दरोडा आहे हे त्यांनाही माहिती आहे. लोकांना सत्य समजायला नको, थोडं भांडल्याचे नाटक करूया. मग या मानसिक धक्क्यातून सावरण्यासाठी आणि त्यांचे लक्ष वळविण्यासाठी हा सत्तांतराचा आणि लुटूपुटूच्या भांडणाचा खेळ केला जात आहे. जेणेकरून विरोधकांचा हिशेब चुकता केलाच आता आपसातील हिशेबही खेळता खेळता चुकवता येतील आणि मुर्ख बनविलेल्या जनसामान्यांना देखील शांत करण्यास हातभार लागेल! एक मित्र म्हणाला की, एकनाथ शिंदे यांच्याकडे इतके साहस कुठले आहे की, ते दिल्लीला आपले डोळे वटारून काही मागतील. दिल्लीश्वर त्यांच्या पक्षातल्या पुढल्या टारगेटवर आता काम करत आहेत, त्यात शिंदेचा हातभार लागत आहे. कारण ही त्यांच्या दिल्लीच्या नेत्यांनी एक स्क्रिप्ट लिहिली आहे त्यानुसार ते आणि सारेच भुमिका करताना दिसत आहेत.
असा हा धर्मवीर-२!
तर पत्रकारीतेच्या क्षेत्रातील मित्र म्हणाला की, जे उध्दव ठाकरे यांनी भाजप सोबत २०१९ला केले त्यापेक्षा वेगळे काय शिंदे करत आहेत? ते पण हेच म्हणत आहेत ना? मला मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता. निवडणुका माझ्यामुळे जिंकल्या आहात आता मला दिलेला शब्द फिरवता कामा नये. इत्यादी. किंवा भाजप तरी २०१९पेक्षा वेगळे काय करत आहे? मुख्यमंत्रीपद तुम्हाला देणार नाही, महत्वाचे विभाग देखील देणार नाही तुम्हाला यायचे असेल तर आमच्या अटींवर सोबत या अन्यथा आम्हाला वेगळा पर्याय आहे. जसे अजित पवार २३नोव्हे २०१९ला सकाळीच फडणवीसांसोबत शपथ घेवून मोकळे झाले होते तसे यावेळी सोबतच निवडणूक लढवून लगेच बिनशर्त (बिनशर्ट नव्हे बरं!) भाजप आणि फडणवीसांसोबत जावून बसले आहेत. मग पाच वर्ष इतके दोन पक्ष फोडून जनतेला फुकटचा सिनेमा दाखवून (असा हा धर्मवीर१-२) आता नव्याने काय झाले आहे? हे सगळे मुद्दाम घडवून आणले जात आहे, जनतेला ठगवले आहे आणि आता मुर्खात काढले जात आहे, असा निश्कर्ष त्याने काढला.
सरकार स्थापन होत आहे तर गावी जायचे नाही का?
अन्य एक शिंदे समर्थक रविवारी भेटला म्हणाला, बघा आठ दिवस होवून गेले. सरकार अजून स्थापन होत नाही, राज्यपाल आहेत की नाही तेच समजत नाही. कुणी सत्तेचा दावा करत नाहीत तरी भाजप प्रदेशाध्यक्ष विधीमंडळ पक्षाची बैठक न घेताच परस्पर राज्यपालांसारखे शपथविधीच्या तारखा सांगत आहेत. दुसरा समर्थक मित्र म्हणाला अरे नवनिर्वाचित संसदीय पक्षाची बैठक तर लोकसभेनंतर सहा महिने झाले तरी मोदी यांनी अजून घेतली नाही. पण त्यांचे सरकार स्थापन झाले, मंत्रिमंडळ झाले आणि दोन अधिवेशने देखील झालीच ना? हे नव्या संविधानानुसार कारभार चालवत आहेत.! पण मग नेमके घोडे अडले कुठे आहे. शिंदेचा अजून एक समर्थक तेथे होता. तो म्हणाला आहो १९९५ला सेना भाजप सरकार आले प्रथम तेंव्हा मुख्यमंत्री सेनेचा आणि गृहमंत्री उपमुख्यमंत्री भाजपचा झाला ना? तेच नंतर काँग्रेसच्या काळात होत आले. मुख्यमंत्री काँग्रेसचा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री राष्ट्रवादीचा, भाजपने तर २०१४ला सुध्दा मुख्यमंत्री होवून सुध्दा उपमुख्यमंत्रीपद सेनेला दिले नाही. पण शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी भाजपला उपमुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद दिले ना? मग आता भाजपने तसेच त्यांना देवून सन्मान राखायला हवा की नाही? अगदी बरोबर आहे. पण भाजपला आता देखील काहीच द्यायचे नाही पण महायुतीत सर्वांना सोबत राहायची सक्ती करायची आहे. शिंदे म्हणाले मी बाजुला राहतो मला काही नको मी तुमच्या सोबत आहे, माझा काही अडसर नाही तुम्हाला. मग ते गावी जावून बसले. त्यातच शनि अमावास्या आली. तसे ते नेहमीच गावाकडे जातातच त्यांच्या शेतीची पाहणी करतात. यावेळी तर ते गावी जावून आजारी पडले कारण सध्या गावाकडे खूप थंडी आहे. मात्र त्यांनी विचारले ना सरकार स्थापन होत आहे तर गावी जायचे नाही का? अगदी बरोबर आहे.
आढाव आणि आव्हाड!
तर दुसरा एक मित्र म्हणाला निवडणूकांच्या आधी मराठा समाजाची शक्ती घेवून जरांगे पाटील बसले होते, आता निवडणुका जे हरले ते राजकीय पक्ष दबल्या आवाजात कण्हत आहेत, पुन्हा कामाला लागूया हरलो नाही, घोळ आहे म्हणत आहेत. पण बाबा आढाव मात्र आता महात्मा फुले यांच्या वाड्यात आत्मक्लेशासाठी बसले आहेत म्हणजे आता मराठा जसा एकवटला तसे ओबीसी (जे महायुतीचे मतदार असल्याचे मानले जाते) पण एकटणार आहेत. फुले शाहू आंबेडकरांच्या राज्यात जातीय मानसिकेतून हिंदू मुस्लिम दूही होता कामा नये. राज्याला विरोधीपक्ष नेता नसला तरी राष्ट्रवादी पक्षात आता आव्हाड गटनेते आणि रोहित पवार, उत्तम जानकर प्रतोद झाले आहेत. पण प्रदेशाध्यक्षांनी अजून विधीमंडळ पक्षांचा नेता कोण ते ठरले नसल्याचे सांगितले आहे.
आघाडीतून बाहेर पडण्याचा ‘मनसुबा’
तिकडे दादरच्या टिळक भवनात काँग्रेसच्या नेत्यांकडून पराभवाचे विश्लेषण करण्यासाठी बैठकांचे सत्र चालविले आहे, आयोगाला मार्मिक पेच असणारे प्रश्न पाठवले जात आहेत. त्यातच काही पदाधिकारी पक्षातल्या नेत्यांवरच संघ भाजपची दलाली केल्याचे आक्षेप थेटपणे घेताना दिसत आहेत. तर राजगडावर अनाकलनीय निकाल लागल्याचे आकलन एका शब्दात प्रतिक्रिया देवून गूढ मौनात गेले आहे. पण सेना भवनातले सारे मातोश्रीवर बैठका करताना दिसत आहेत. पुन्हा टाळी द्यावी का? याचा विचार करताना आघाडीतून बाहेर पडण्याचा ‘मनसुबा’ व्यक्त करताना दिसत आहेत.
जनतेचा भाव घसरला!
जळगावचे गुलाबराव म्हणाले, अजित पवारांना आमच्यातील ५० जागा दिल्या नसत्या तर आमचे सुध्दा शंभर आमदार आलेच असते ना? मग मुख्यमंत्रीपदावर आमचा दावा का नको? तर जालन्याचे रावसाहेब म्हणाले की आज सोबत जर उध्दव असते तर ही वेळच आली नसती गोडीगुलाबीने सत्तेचे वाटप झाले असते. राजभवनावर आसाम आणि नागालँण्डच्या नागरिकांचे कार्यक्रम सुरू आहेत. पण मणिपूर देखील याच देशात आहे याचे विस्मरण दिल्लीच्या नेत्यांना झाले आहे. नव्हे महाराष्ट्रातल्या राज्यपालांना सध्या काहीच काम नसावे असे चिडीचूप झाले आहे. २६ तारीख उलटून गेली डिसेंबर उजाडला सत्ता स्थापनेचा दावा अजूनही कुणी का केला नाही? राज्यात लोकांचे सरकार येवू शकले नाही तर राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता व्यक्त करणारे घटना तज्ज्ञ गायब झाले आहेत. माध्यमांकडून कोण मुख्यमंत्री होणार यांची बिगब्रेकिंग दर तासाला बदलत आहे. एसटीचा प्रवास आता महाग होणार आहे. स्वयंपाकाचा गॅस महागला आहे. राज्यातील कारखान्यांच्या गाळपाचा ऊस परराज्यात गेल्याने त्यांच्यापुढे पेच निर्माण झाला आहे. सोयाबीन कपाशीचा भाव नसलेला शेतकरी त्याचा भाव देखील कोसळला आहे. आहो तेच कश्याला निवडणूकीत चमत्कार घडवून आणणाऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे कसे आले याची चौकशी सुरु झाली आहे. अनेक बहिणींची भाऊबीज आता बंद होणार आहे. तर काहींची वसूल होणार आहे.
हा तर प्रधानजी, काय खबर आहे.? काही नाही महाराज सारे काही आबाद आहे. राज्यात २३० आमदार एकाच महायुतीचे आले आहेत पण प्रश्न असा आहे की, तीन मुले हिंदूना नसतील तर त्यांची लोकसंख्या धोक्यात येण्याचा गंभीर धोका आहे! तर आता लागा कामाला. तीन तरी हवीच बरे!
किशोर आपटे
(लेखक व राजकीय विश्लेषक)
सत्तास्थापनेला जेवढा उशीर, तेवढी घटकपक्षांची बार्गेन शक्ती कमी होणार?
करेक्ट विश्लेषण
उत्तम विश्लेषण केले आहे
छानच