तुका म्हणे उगी रहावे जे जे होईल ते पहावे!
अमेरिकेचे अध्यक्ष ‘डोलांड’ ट्रम्प यांनी जुन्या यारान्याला तिलांजली देत अखेर भारताला ‘टेरिफ’ लावला आहे. तर खास मित्राचे लाडके उद्योगपती मित्र यांना अमेरिकन न्यायालयाने गुंतवणूकदारांच्या पैश्यातून भारतीय अधिकारी, राजकारण्यांना लाच दिल्याप्रकरणी समन्स बजावल्याचे वृत्त आहे. त्याशिवाय नागपूर आख्यानाच्या पुढील भागात भाजपचा नवा अध्यक्ष कोण? यावरून संघ आणि भाजप यांच्यातील धनुष्यांच्या प्रत्यंचा अधिक ताणल्या गेल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अश्या अप्रिय समाचारांना ‘डॉगी’ मिडियात स्थान मिळणार नसलेतरी अश्या अडचणीच्या विषयांचा विचार आणि चर्चा पोटावळे पत्रकार तर करणार आणि त्या घोंघावत राहणारच. मग त्यांना पूर्णविराम देण्यासाठी बासनात जाता जाता राहिलेल्या वक्फ सुधारणा विधेयकाचा(Waqf Amendment Bill) बागुलबुवा/ हव्वा करत मंजूरीचाही घाट घालण्यात आला म्हणे!? सूत्रांच्या माहितीनुसार बिहारच्या निवडणुकीत ‘सौगात ए मोदी’मुळे नितीश यांच्या बरोबरीने भाजपलाही मते मिळावी म्हणून रेवड्या वाटायची इच्छा नसताना त्या वाटाव्या लागल्या आहेतच. तर अश्या कठीण समयी देशातील जनतेला हिंदू मुस्लिमच्या वर्गीकरणात गुंतविण्याशिवाय अन्य कोणतेच ब्रम्हास्त्र कामी येणार नाही हे देखील खरेच नाही का?
महावितरणची एप्रिलफुल योजना
इकडे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीतील कर्जमाफी, लाडकी बहिणीचे २१०० रुपये, आनंदाचा शिधा, तिर्थ दर्शन, या योजना बंद झाल्या त्यावेळी वित्तमंत्री अजीत पवार यांनी माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री-१ यांच्या स्वप्नांना वेसण घातल्याची चर्चा होती. मात्र सध्या ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत तासभर अभ्यासपूर्ण(?) भाषण करून स्वत:च्या खात्यात केलेल्या अभूतपूर्व वीजदरशुल्क कपातीलाच वित्तमंत्री अजीत पवार यांनी कात्री लावली आहे. महावितरणची वीज १ एप्रिल ला स्वस्त होणार ही घोषणा एप्रिलफुल ठरल्याने सध्या महायुती सरकारचे पुरते हसे झाले आहे. पण हे सरकार मात्र तसे कधीच मान्य करणार नाही हा भाग वेगळा!.
दुर्दैवाचे दशावतार
दुसरे दुर्दैवाचे दशावतार म्हणतात तसे या सरकारमागे एक झाले की एक बालंट मागे लागण्याचे काही थांबत नाही. अगदी विधानसभा निवडणुकांच्या आधीपासून बदलापूर, मालवण पुतळा दुर्घटना, अक्षय शिंदे एन्काऊंटर, पासून विधानसभा निवडणूक घोटाळा त्यानंतरच्या नाराजी आणि रुसूबाईच्या घटनांपासून आर्थिक चणचण, बीड प्रकरण, मुंडे राजीनामा, औरंगजेब कबर(Aurangzeb Grave), नागपूर दंगल, कोरटकर, सोलापूरकर वाघ्या कुत्रा अश्या नामुष्कीच्या प्रसंगाची मालिका काही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. आता पुन्हा दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या निमित्ताने फडणवीस सरकार अडचणीत आल आहे. भाजपच्या आमदाराच्या स्विय सहायकाच्या पत्नीला त्यासाठी जीव गमवावा लागला आहे, आणि सरकारकडून मात्र जखम मांडीला मलम शेंडीला अश्या प्रकारची कारवाई केली जात असल्याचे ध्वनीत होत आहे. दिनानाथ मंगेशकर रुग्णालय(Dinanath Mangeshkar Hospital) हे धर्मादाय रूग्णालय आहे. अगदी काल परवापर्यंत उपमुख्यमंत्री असणारे फडणवीस यांच्या कार्यालयातून धर्मादाय रुग्णालयांच्या माध्यमांतून रुग्णांना मदत करणारा कक्ष चालविला जात होता. आता हा कक्ष उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे हस्तांतरीत झाला आहे. या कक्षांच्या माध्यमांतून आपत्कालिन स्थितीमध्ये भाजपच्या आमदाराच्या पत्नीला मदत मिळू शकली नाही. त्यामुळे मंत्रालयात मुख्यमंत्री सहाय्यता कक्षांच्या नावाखाली जे काही रुग्णसेवा केल्याचे रकानेच्या रकाने बातम्या म्हणून परोसल्या जात असतात त्यांचे ‘बुंद से गयी. . ‘ असे हसे झाले आहे.
रुग्णसेवेचा धर्म जागा झाला नाही
मुख्यमंत्री कक्षाने कशी तत्परतेने मदत केल्याने प्राण वाचले, पैसे वाचले अश्या किमान चार पाच बातम्या दर सप्ताहात दिल्या जातात. मात्र भाजप आमदाराच्या स्विय सहायकाच्या पत्नी तनीशा भिसे हिला प्रसुतीच्या कठीण काळात या रुग्णालयातून तातडीने आवश्यक उपचार न मिळाल्याने तिला प्राण गमवावे तर लागलेच आहेत, पण तिने जन्माला घातलेल्या दोन जुळ्या अर्भकांच्या जिवीतासाठी त्यांच्या आईचे नसणे हे अतिशय भयावह धोकादायक आणि राज्य सरकारला पक्ष, कायद्याच्या पलिकडे माणुसकी म्हणून विचार करायला लावणारे आहे. प्रश्न असा आहे की सरकार तसे विचार करत आहेत का? की संघाशी संबंधित मंगेशकर कुंटूंबियांची संस्था, डॉ. घैसास आणि अन्य लोकांना पाठिशी घालण्यासाठी आता बदलापूर प्रकरणासारखे शॉर्टकट शोधले जाणार आहेत? पुण्याचे पालकमंत्री अजीत पवार(Ajit Pawar) यांच्यासह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांना संबधित कुटूंबियानी नुकतेच भेटून संपूर्ण प्रसंग सांगितला. अनामत रक्कमेचा काही भाग देखील देवू करण्यास तयारी दाखविल्या नंतरही धर्मादाय म्हटल्या गेलेल्या रुग्णालयाचा रुग्णसेवेचा धर्म जागा झाला नाही ही वास्तविक शोकांतिका आहे. हे सर्वत्र सुरू आहे. सरकारच्या हातात पैसा नाही, आहे तो चुकीच्या कामांत चुकीच्या पध्दतीने खर्च केला जात आहे. मात्र पुण्याचे पालकमंत्री वित्तमंत्री अजीत पवार असोत. त्यांच्याकडून जनतेने आता काही अपेक्षा बाळगाव्या अशी स्थिती नाही.
सरकारचे अच्छे आणि जनतेचे बुरे दिन
कारण पवार यांनी कर्जमाफी बाबत विधान केले ते हवेत विरले नाही तोच कृषीमंत्री कोकाटे यांनी कर्जमाफी कश्याला हवी साखरपुडा आणि लग्नात पैसा खर्च करण्याऐवजी शेतीच्या कामाला लावता का असा रोकडा की कोरडा सवाल केला. राज्यात शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही, अवेळी पावसाने नुकतेच नुकसान झाले आहे. त्यामुळे अधिक हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना अशी दु:खावर मीठ चोळणारी वक्तव्ये करण्याची स्पर्धा सध्या मंत्र्यानी सुरु केली आहे की काय? असा प्रश्न विचारावा लागेल. तर असे, या सरकारचे अच्छे आणि जनतेचे बुरे दिन काही संपण्याची चिन्ह दिसत नाहीत. नुकतेच शंभर दिवस पूर्ण केलेल्या सरकारच्या मधुचंद्राच्या काळात फारसे काही नेत्रदिपक हाती लागले नाही. आणि आता येणाऱ्या कालखंडात अर्थसंकल्पाला ३० टक्के कपातीचे धोरण लावण्यात आल्याने फारसे काही या वर्षभरात अपेक्षीत नाही. तेंव्हा आता तुका म्हणे उगी रहावे जे जे होईल ते ते पहावे हेच सूत्र जनतेसाठी महत्वाचे आहे.
In Maharashtra, during the Assembly elections, several schemes such as loan waivers, the “Ladki Bahini” initiative offering ₹2100, the “Anandacha Shidha” program, and pilgrimage tours were discontinued. At that time, there was speculation that Finance Minister Ajit Pawar had curbed the ambitions of the former Chief Minister and current Deputy Chief Minister-1.
Recently, Energy Minister Devendra Fadnavis delivered a lengthy and supposedly well-researched speech in the Assembly, highlighting unprecedented reductions in electricity tariffs under his department. However, Finance Minister Ajit Pawar reportedly intervened, cutting down these proposed reductions. The announcement that electricity rates would become cheaper from April 1 turned out to be an April Fool’s joke, leading to widespread ridicule of the ruling MahaYuti government. Despite this, the government is unlikely to acknowledge the situation openly.
किशोर आपटे.
(लेखक व राजकीय विश्लेषक)